नीमा पाटील
‘रिपोर्टिग पाकिस्तान’ हे ‘द हिंदू’च्या पत्रकार मीना मेनन यांनी त्यांच्या पाकिस्तानातील, खरं तर इस्लामाबादमधील वास्तव्यावर लिहिलेलं पुस्तक. व्हिसाच्या मर्यादेमुळे लेखिकेचं वास्तव्य इस्लामाबादपुरतंच सीमित राहिलं; पण त्यातही एके काळी आपला भाग असलेल्या आणि नंतर शेजारील राष्ट्र झालेल्या पाकिस्तानचे निरनिराळे पैलू समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांना तिथे जेमतेम नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला.
त्यापूर्वी त्यांना प्रेस क्लबतर्फे कराची आणि हैदराबाद या शहरांना भेट देण्याची संधी मिळाली होती. तेव्हा आलेल्या अनुभवांचा त्यांना वार्ताकन करताना काही प्रमाणात उपयोग झाला असावा असं जाणवतं.
लेखिका पाकिस्तानात असताना तिथलं वातावरण पत्रकारांसाठी, विशेषत: भारतीय पत्रकारांसाठी तितकंसं अनुकूल नव्हतं. पत्रकारांना धमक्या मिळणं, अपहरण होणं आणि हल्ले होणंही सर्रास घडत होतं. अनेक पत्रकारांनी जीवही गमावला. अशा काळात पाकिस्तानात राहून वार्ताकन करणं हे सोपं काम नाही. सरकारी दबावतंत्र, हेरगिरीचे संशय आणि आरोप, पाळत ठेवली जाणं अशा रोजचं जगणं कठीण करणाऱ्या अनेक अनुभवांना लेखिकेला सामोरं जावं लागलं.
बलुचींच्या हक्कांसाठी लढणारे ज्येष्ठ नेते मामा कादीर बलुच यांची मुलाखत घेण्याचं निमित्त होऊन लेखिकेची पाकिस्तानातून हकालपट्टी करण्यात आली. मार्च २०१३ मध्ये कादीर बलुच यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर परराष्ट्र विभागाने लेखिकेची चौकशी सुरू केली. अखेर त्यांना भारतात परत पाठवण्याचा निर्णय झाला आणि त्या मे २०१३ मध्ये भारतात परतल्या.
त्यापूर्वी नऊ महिन्यांमध्ये पाकिस्तान कसा दिसतो, कसा आहे, लोकांचं आदरातिथ्य, आपुलकी, संशय, द्वेष या सगळय़ा गोष्टी त्यांना जवळून पाहता आल्या. अर्थातच हा अनुभव मर्यादित आहे, कारण त्यांना राजधानीबाहेरचा पाकिस्तान पाहता आला नाही, अनुभवता आला नाही. ते शक्यही नव्हतं, कारण त्यांना फक्त इस्लामाबाद शहरापुरता व्हिसा देण्यात आला होता. त्यांना इस्लामाबादमध्ये राहून सरकारी पत्रकार परिषदा, न्यायालयीन कामकाज आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहता आलं. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळताही आलं. त्यामध्ये अगदी आठवडी भाजीबाजारामध्ये भाजी विकायला येणारे शेतकरी ते जिवाच्या भीतीने नाव न सांगण्याच्या अटीवर भेटणारे शिया अथवा अहमदी नागरिक.
पाकिस्तानच्या सुन्नीबहुल कर्मठ राज्यसत्तेत शियांना कमअस्सल मुस्लीम समजलं जातं आणि अहमदींना तर केव्हाच धर्माबाहेर काढण्यात आलं आहे. शिया आणि अहमदींबरोबरच अल्पसंख्याक असलेल्या हिंदू धर्मीयांच्या समस्याही लेखिकेने मांडल्या आहेत. मात्र, इथेही व्हिसाची मर्यादा आड आल्याचे जाणवते. इस्लामाबादमध्ये काही प्रमाणात हिंदू आहेत आणि त्यांच्या काही समस्याही आहेत. त्यांना मंदिर बांधून हवं होतं आणि स्मशानभूमीचीही मागणी होती; पण इस्लामाबादमधले हिंदू तुलनेने आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत आहेत. अनेक जण व्यापार आणि स्वतंत्र व्यवसाय करणारे आहेत. सिंध आणि पंजाबमधील हिंदू समाजाला मात्र छळ म्हणावा अशा समस्या भेडसावत होत्या. जबदरदस्तीने धर्मातर, मुलींना पळवून नेणं आणि त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह करणं, सण-समारंभ साजरे करण्यावर निर्बंध आणायचा प्रयत्न करणं.. सामाजिक कार्यक्रमांवर हल्ल्याच्याही घटना घडल्या होत्या; पण या घटना इस्लामाबादबाहेर घडत होत्या. त्यामुळे त्यांचं थेट वार्ताकन करणं लेखिकेला शक्य झालं नाही. मात्र काही प्रमाणात त्यांना त्या दाहक घटनांची माहिती मात्र देता आली. व्हिसाचं बंधन नसतं आणि लेखिकेला आणखी काही वेळ मिळाला असता तर आणखी किती तरी घटनांचे वार्ताकन, अनुभव वाचायला मिळालं असतं.
या पुस्तकाच्या निमित्ताने दोन्ही देशांमधील तणाव, सर्वसामान्य भारतीयांना पाकिस्तानचा आणि सर्वसामान्य पाकिस्तानींना भारताचा व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, वैयक्तिक हेवेदावे चुकते करण्यासाठी ईशिनदासारख्या कठोर कायद्यांचा गैरवापर, धर्माच्या आधारावर उभारलेल्या राष्ट्रामधील कमालीची आर्थिक विषमता, धर्मवेडेपणा, स्त्रियांवर असणारी बंधनं, दहशतवाद, दहशतवादी संघटना, आत्मघातकी हल्ले, अल्पसंख्याकांच्या नागरी हक्कांवरील गदा अशा अनेक गोष्टी वाचकांसमोर येतात. यातील काही गोष्टी भारतीयांना माहीत असतात, किंबहुना त्यांनी त्या गृहीत धरलेल्या असतात. सगळीच गृहीतकं खरी नाहीत आणि खोटीही नाहीत. वास्तव त्याच्या मधोमध कुठे तरी असावं असं वाटत राहतं.
इंग्रजीमध्ये हे पुस्तक २०१८ मध्ये प्रकाशित झालं. मेहता पब्लिशिंग हाऊसने पाच वर्षांनंतर ते मराठीमध्ये आणलं आहे. काही त्रुटी वगळता मुक्ता देशपांडे यांनी व्यवस्थित अनुवाद केला आहे. अनुवाद ज्या भाषेत झाला आहे, त्याच भाषेत मूळ लिखाण झालं आहे असं वाचकांना वाटणं हे अनुवादकाचं यश म्हणता येतं. त्या आघाडीवर काही प्रमाणात उणीव जरूर भासते. काही ठिकाणी संदर्भ लक्षात न घेतल्यामुळे भाषांतराच्या चुकाही जाणवतात. उदाहरणार्थ, इंग्रजी क्लर्क हा शब्द धर्मगुरू या अर्थाने वापरला जातो. मात्र, त्याचं भाषांतर कारकून असं करण्यात आलं आहे. शब्दश: भाषांतर केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासाठी शिखर न्यायालय, गृह मंत्रालयासाठी अंतर्गत व्यवहार मंत्रालय असे वाचताना खटकणारे उल्लेख आहेत. असे काही अपवाद वगळता मीना मेनन यांना जे सांगायचं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवण्यात मराठी आवृत्तीला यश आलं आहे असं म्हणता येईल.
‘रिपोर्टिग पाकिस्तान’ – मूळ लेखिका़- मीना मेनन, अनुवाद- मुक्ता देशपांडे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने- ३८६,
किंमत- ६०० रुपये.
nima.patil@expressindia.com