मौतुषी मुखर्जी
भारतीय भाषिक साहित्याच्या इंग्रजी अनुवाद प्रक्रियेत गेल्या दशकभरात साधारणत: दोन लक्षणीय बदल झाले. सर्वात मोठा बदल म्हणजे अनुवादक स्वत: प्रकाशकांशी संपर्क साधू लागले आणि ग्रंथांच्या अनुुवादात जबाबदारीपूर्ण सहभाग ठेवू लागले. पूर्वी हे होत नसे. म्हणजे दहा वर्षांपूर्वी प्रकाशक प्रादेशिक भाषांतील लेखक शोधायचे, त्यासाठी यथायोग्य अनुवादक निवडायचे, यांत प्रकाशकांपर्यंत मूळ भाषिक पुस्तक आणि अनुवादक यांच्याबाबत प्रसृत झालेली माहिती महत्त्वाची ठरायची. कारण इंग्रजी प्रकाशकांना भाषिक साहित्यातील सारे तपशील माहिती असू शकण्याचे कारणच नव्हते. प्रादेशिक भाषेतील एखाद्या उत्तम कथेविषयी ऐकले (word- of- mouth) की लेखक शोधण्यापासून तिच्या अनुवादाची वेळखाऊ प्रक्रिया सुरू व्हायची. आता मात्र आपल्याकडे एजंट्स, अनुवादक आणि देशातील छोट्या-बड्या प्रकाशकांशी थेट संपर्क करणारी यंत्रणा तयार झालीय. एकाच उद्देशासाठी म्हणजेच प्रादेशिक भाषेतले उत्तमोत्तम साहित्य इंग्रजीत यावे, यासाठी या साखळीतले लोक काम करतात. अर्थातच ते निवडीमध्ये निष्णात असून झपाटल्यासारखे शोध घेत राहतात.
देशी भाषांतील साहित्य प्रकाशित करणाऱ्या इंग्रजी प्रकाशनविश्वातला आणखी एक बदल म्हणजे अनुवादकांना आता अधिक प्रसिद्धी आणि श्रेय हवे असते. ते त्यांना मिळतेही. पूर्वी आपल्याला जपानी लेखक हारुकी मुराकामी किंवा इटालियन कादंबरीकार एलेना फेरांते यांचे अनुवादक कोण, याची कल्पना नसे. आता मात्र त्यांच्या अनुवादकांच्या नावांनाही वलय प्राप्त झाले असून पुस्तक विकत घेताना वाचक अनुवादक कोण, याकडे लक्षपूर्वक पाहतो. वाचकांचा पैस आणि दृष्टिकोन बदलला असून डेजी रॉकवेल, दीपा भास्ती किंवा अरुणवा सिन्हा यांसारखे अनुवादक मूळ लेखकांइतकेच ओळखीचे झाले आहेत.
आपल्या देशात अनुवादाचे एक भक्कम वातावरण आधीपासून आहे. २०२२ च्याही बऱ्याच आधीपासून. मात्र चार वर्षांत दोन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारांमुळे आपल्या प्रादेशिक साहित्याला पाश्चात्त्य देशांत वजन मिळाले. भारतातल्या देशी भाषेतही उत्तम कथा दडल्या आहेत आणि त्यांनाही वैश्विक परिमाण आहे, हा शोध गीतांजली श्री आणि बानू मुश्ताक यांच्या साहित्यातून भारतेतर जगताला झाला. त्यामुळे अनुवादकांसाठी बरीच दारे उघडली गेलीत. हा नवा प्रवाह तयार झाला असला तरी भविष्यात याहून उत्तम घडण्यासाठी वाव आहे.
‘पेंग्विन इंडिया’चे काम हे प्रामुख्याने ‘कमिशनिंग एडिटर ऑफ ट्रान्सलेशन’ यांच्यावर अवलंबून असते. भारतातील प्रादेशिक भाषेतील कथनात्मक आणि अकथनात्मक साहित्यातील सर्वोत्तम निवडण्याची जबाबदारी या संपादकांवर पूर्णपणे असते. तिथल्या साहित्य प्रवाहांची दखल ठेवत त्यांचा शोध सुरू राहतो. एखाद्या स्थानिक भाषेतील कादंबरी अथवा पुस्तक इंग्रजीत पोहोचून मोठा वाचक घडवू शकेल, हे लक्षात आल्यावर आमचा लेखक, एजंट्स, भाषिक प्रकाशक आणि अर्थातच अनुवादकांशी संवाद सुरू होतो. त्यातून चर्चेच्या अनेक फैऱ्या झडत अनुवादाची प्रक्रिया पुढे सरकते. ते ठरवताना माझी भूमिका ही असते, की शक्य तितक्या अधिक भाषांमधून इंग्रजीत अनुवाद प्रकाशित करायचे आणि अर्थातच सर्वोत्तम कथांच्या शोधात कायम राहायचे.
सध्या आम्ही दक्षिण भारतातील सर्व भाषा, मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी, उर्दू, संस्कृत, आसामी, मणिपुरी, भोजपुरी, नेपाळी, सिंहली, काश्मीरी आणि पंजाबी या भाषांमधून अनुवाद करीत आहोत. मणिपुरी, सिंधी आणि कोंकणी भाषेतून इंग्रजी अनुवादातही आम्हाला रस आहे.
भारतीय भाषांमधून मल्याळम, तमिळ आणि बंगाली ग्रंथच सर्वाधिक इंग्रजीत अनुवादित होतात, हा प्रवाद मानला जातो. तो खरा असेल तर त्याचे कारण इंग्रजी प्रकाशकांचे केवळ याच भाषांवर प्रेम आहे असा नाही. इंग्रजी प्रकाशकांचा नक्कीच या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांतील साहित्याचा शोध सुरू असतो. पण तुम्ही या भाषिक राज्यांचे आपल्या साहित्याला असलेले पाठबळ पाहिले, तर इंग्रजी अनुवादात त्यांची पुस्तके पुढे का त्याचे उत्तर सापडेल. तमिळ साहित्याला तमिळनाडू सरकारची मोठी आर्थिक मदत होते, मल्याळम साहित्याला डीसी बुक्स (deecee books) , मातृभूमी यांसारख्या प्रादेशिक प्रकाशकांचे बळ मिळते. केवळ त्यामुळेच हे प्रकाशक आपले स्थानिक लेखक पुढे नेतात, नवीन अनुवादकांना प्रोत्साहन देतात. या कारणांमुळे त्यांची रूपांतरे इंग्रजीत तातडीने आणि सहज होतात.
‘हार्ट लॅम्प’ या बानू मुश्ताक यांच्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाल्यानंतर कन्नड साहित्य सध्या खूपच चर्चेत आहे. पण मला स्वत:ला कोंकणी आणि काश्मिरी भाषेतही अधिक रूची आहे.
आंतरराष्ट्रीय पटलावर जपान आणि कोरियातील पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद तिथल्या मूळ प्रकाशकांसोबत एकाचवेळी ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये देखील प्रकाशित होतात. त्यानंतर त्याच्या प्रसिद्धीची यंत्रणा कार्यरत होते. ‘हार्ट लॅम्प’साठीदेखील आम्ही तसेच केले. म्हणजे हे पुस्तक भारतात पेंग्विन रँडम हाउसकडून आणि ब्रिटनमध्ये तिथल्या प्रकाशकाकडून प्रकाशित करण्यात आले. त्याचा फायदा काय झाला, तो आता जगाला दिसत आहे.
युरोप, अमेरिका अगदी आफ्रिकेतही भारतीय कथा वाचक आणि प्रकाशकांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे प्रादेशिक भाषांतील उत्तम साहित्याला जगभरात पोहोचण्यासाठी सध्या सुवर्णसंधी आहे. नजिकच्या भविष्यात त्यामुळे प्रादेशिक भाषांतील तारे लखलखू लागतील.
प्रादेशिक भाषांमधील अभिजात साहित्याऐवजी अधिकाधिक समांतर काळातील कलाकृती इंग्रजीत अनुवादित होत आहेत, याला इंग्रजी अनुवादाची दुसरी लाट म्हणावी का, हे माहीत नाही, पण सध्या आपण अनुवादाबाबत सर्वात चांगल्या स्थितीत आहोत. अनुवादाचे हे गतिमान वातावरण टिकवून ठेवायला हवे आणि इथल्या मातीतले सर्वोत्तम साहित्य इंग्रजी वाचकांसमोर आणायला हवे. आपल्याकडे पूर्वापार काळापासून विलक्षण कथा आहेत. गरज आहे ती त्यांचा योग्य अनुवाद होण्याची.
पेंग्विनचे ताजे सर्वोत्तम…
पेंग्विनच्या आघाडीच्या पुस्तकांत सध्या मराठीतून सचिन कुंडलकर यांच्या पुस्तकाचा आकाश करकरे यांनी केलेला ‘सिल्क रूट’, मल्ल्याळम लेखक बेन्यामिन यांच्या कादंबरीचा अनुप प्रथापन यांनी केलेला ‘सायलंट जर्नीज’, तमिळ लेखक पेरूमल मुरूगन यांच्या ग्रंथाचा ‘स्टुडण्ट्स इच्ड इन मेमरी’, असामीतून अरुपा पाटंगिया कलिता यांचा मित्रा फुकान यांनी केलेला ‘द ओल, द रिव्हर, द व्हॅली’ आणि बानू मुश्ताक यांच्या कन्नड कथांचा दीपा भास्ती यांनी केलेला ‘हार्ट लॅम्प’ या अनुवादांचा समावेश आहे.
(लेखिका ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’ प्रकाशन संस्थेतील अनुवाद विभागाच्या प्रमुख आहेत.)