अजित गुप्ते
बर्लिनमधली एक रम्य संध्याकाळ… जूनच्या अखेरीस, पॉट्सडॅममधील भव्य सँसोसी राजवाडा…. ( Sanssouci Palace) युनेस्को जागतिक वारसा स्थळातील उद्यानांमध्ये एक अद्भुत संगम घडून आला- पूर्व आणि पश्चिमेच्या कलेचा मिलाप… म्युझिकफेस्टश्पिले पॉट्सडॅम सँसोसी ( Musikfestspiele Potsdam Sanssouci) या युरोपातील नावाजलेल्या शास्त्रीय संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या संध्येला जर्मनीतील दोन हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर ‘इंडियन स्वान लेक’ ( Indian Swan Lake) रंगमंचावर अवतरला.
युरोपीय परीकथेची ओळख असलेल्या ‘स्वान लेक’ ( Swan Lake) या कथेला महाभारतातील नल-दमयंती यांच्या प्रेमगाथेशी जोडून सादर केले गेले. ओदिशातील ओडिसी नृत्यशैली आणि चायकोव्हस्की ( Tchaikovsky) यांच्या संगीताला भारतीय रागदारी आणि सूरतालाचा साज चढवण्यात आला. चायकोव्हस्की हे एक प्रसिद्ध रशियन संगीतकार. ज्यांना अभिजात संगीताच्या इतिहासातील सर्वात महान कलावंतांपैकी एक मानलं जातं. भारतीय आणि युरोपीय नर्तक, संगीतकार तसेच नृत्यदिग्दर्शक यांनी एकत्र येऊन ही कलाकृती साकारली. भारतीय दूतावास, टागोर सेंटर आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ( ICCR – Indian Council for Cultural Relations) तसेच जर्मनीतील सांस्कृतिक संस्थांच्या सहकार्याने हा योग जुळून आला.
नल-दमयंती कथा ही महाभारतातील ‘वनपर्व’ या भागात उल्लेखली गेलेली अजरामर गोष्ट. निषद देशाचा नल राजा आणि राजकुमारी दमयंती यांच्या प्रेमाची, जीवनातील दु:खाची आणि पुनर्मिलनाची पुराणकथा विविध काळातील कवी आणि कलाकारांनी नव्याने रचली. नल द्याूत खेळात सर्वस्व हरवतो, दमयंती त्याला सोडून जंगलात जाते. अखेरीस दोघे भेटतात. नल राज्य पुन्हा मिळवतो. सारे कुुशल घडते. स्वान लेक जर्मन-रशीयन परंपरांना सामावणारी परीकथा. यातली नायिका जादूगाराच्या शापाने हंसात परावर्तित होते. दिवसा हंस आणि रात्री मानवी शरीर तिला लाभते. १८७७ साली चायकोव्हस्की यांनी हे पहिल्यांदा रंगभूमीवर आणले. या दोन्ही कथांचे संमिलन असा ‘इंडियन स्वान लेक’ यानिमित्ताने तयार झाला.
जॅस्पर हॉल ( Jasper Hall), सँसोसी पॅलेस ( Sanssouci Palace) येथे झालेल्या स्वागत समारंभात भारताचे राजदूत अजित गुप्ते आणि प्रीती गुप्ते तसेच ब्रँडेनबुर्गच्या सांस्कृतिक मंत्री डॉ. मान्या शुले आणि पॉट्सडॅमच्या उपमहापौर ब्रिगिट मायर यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
या सादरीकरणाचे वैशिष्ट्य फक्त नृत्य-संगीतात नव्हते, तर युरोपातील प्रेक्षकांना भारतीय पुराणकथेची ओळख त्यांच्या परिचित कलेच्या चौकटीत करून देण्याचा प्रयत्न होता. नल-दमयंतीची कथा – राजवैभवापासून वनवासातील दैवी संकटे आणि नियती-विवेकाच्या संघर्षापर्यंत ही एक हृदयस्पर्शी कहाणी. स्वान लेक ( Swan Lake) मधील शारीर रूपांतर, फसवेपणा आणि प्रेमाचा संघर्ष यात सहज गुंफला गेला.
अनेक जर्मन रसिकांसाठी भारतीय पुराणकथेचा हा पहिलाच परिचय होता. भारतीय महाकाव्ये भव्य आणि गुंतागुंतीची असली तरी त्यांच्या गाभ्यातील निष्ठा, तळमळ या भावना कालातीत आहेत. युरोपीय प्रेक्षक ग्रीक पुराणातील नायक-नायिकांशी जोडले जातात,तितकीच त्यांना नल-दमयंतीची गोष्ट भावली.
या नृत्यनाट्याने ओडिसीला केवळ ‘परदेशी कला’ म्हणून सादर केले नाही. उलट भारतीय आणि युरोपीय नृत्यशैलींची सांगड घालून एक नवा मिलाफ घडवला गेला. मुद्राभिनय आणि दरबारी हावभावांची अचूकता,ओडिसीतील गोलाकार चक्रे आणि युरोपीय नृत्याची सूक्ष्म रेखीवता- हे सर्व एकमेकांचे प्रतिबिंब वाटावे, इतका हा सोहळा रंगला. संगीतामध्येही उत्तम संगती दिसली. चायकोव्हस्की ( Tchaikovsky) यांच्या सुरांची पखरण करणाऱ्या विदेशी वाद्यावृंदासह पखवाज आणि तबल्याच्या लयीत नवा रंग चढला. परिणामी हा प्रयोग ‘फ्युजन’ न वाटता दोन संस्कृतींमलधला संवाद असल्याचे वाटत राहिले.
युरोपात भारतीय पुराणकथा साहित्य, तत्त्वज्ञान आणि चित्रकलेतून याआधी पोहोचल्या होत्या; परंतु रंगभूमीवर अशा भव्य स्वरूपाच्या सादरीकरणाचा अभाव होता. महाभारतासारख्या ग्रंथातून निवडक नल-दमयंती कथा घेऊन ती नव्याने सादर करणे म्हणूनच अधिक प्रभावी ठरले.
सँसोसीच्या ( Sanssouci) बगीच्यातील संध्याकाळी हा प्रयोग जणू काळाच्या सीमा ओलांडत होता. महोत्सवाच्या अखेरीस तीन जर्मन शहरांमध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला आणि सर्वत्र हाऊसफुल्ल झाला. प्रत्येक सादरीकरणात प्रेक्षकांनी उभे राहून किती तरी वेळ टाळ्यांचा वर्षाव केला.
सांस्कृतिकदृष्ट्या हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे. भारतीय शास्त्रीय कला अनेकदा ‘वारसा’ म्हणून सादर केल्या जातात- त्या सुंदर असतात, पण भूतकाळात अडकलेल्या वाटतात. येथे मात्र त्या जिवंत आणि आधुनिकतेशी सुसंगत भासल्या.
या सहकार्यात अनेक महिन्यांची मेहनत व समन्वय होता. भारतीय तालचक्रातील गोलाई आणि कल्पनाशक्तीची भर आणि पश्चिमी संगीताची प्रगतिशील रचना यांना एकत्र आणणे, तसेच युरोपीय रंगमंचावर ओडिसीच्या प्रतीकात्मक मुद्रांना स्थान देणे – हे मोठे सांस्कृतिक संमीलन होते.
या सादरीकरणातून पुराणकथा या केवळ परंपरेच्या चौकटीत बंदिस्त नसतात; त्या नवनिर्मिती व सांस्कृतिक देवाणघेवाणीचे सक्षम साधन असतात, हे अधोरेखित झाले. नल-दमयंती आणि स्वान लेक ( Swan Lake) यांची सांगड घालताना कोणत्याही कथेला कमी लेखले गेले नाही; उलट दोन्ही कथांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व राखत, एकत्र येऊन मानवी जीवनातील सार्वत्रिक सत्यांचे दालन उघडले.
या यशस्वी प्रयोगानंतर भारतीय पुराणकथांचे नाट्य युरोपियन रंगमंचावर अधिक प्रभावीपणे दिसेल, याची आशा निर्माण झाली. मग ते नृत्य असो, रंगभूमी, ओपेरा किंवा इतर आधुनिक कलाप्रकार. कारण पुराणकथा या केवळ भूतकाळाचे प्रतिबिंब नसून, योग्य पद्धतीने नव्याने सांगितल्या तर त्या वर्तमानाशी संवाद साधतात आणि भविष्यालाही दिशा देतात.
सॅसोसीच्या ( Sanssouci) बगिच्यात, ओडिसी नर्तकांच्या फिरत्या वलयांमध्ये आणि पाश्चात्त्य सुरांच्या लहरींवर गुंफलेली ही महाभारतातील कथा जर्मनीच्या रम्य उन्हाळी संध्याकाळी एक अविस्मरणीय ठसा उमटवून गेली. ही ना फक्त भारतीय पुराणकथेची ओळख होती, ना युरोपीय शास्त्रीय कलेचे नवे रूप; हा होता जगातील दोन महान पुराणकथांचा अद्वितीय संगम.
-अजित गुप्ते avgupte7@yahoo.com