scorecardresearch

Premium

ज. द. जोगळेकर : चालते-बोलते संदर्भ ग्रंथालय

ज्येष्ठ सावरकरवादी लेखक ज. द. जोगळेकर यांच्या ‘समीक्षा-संचित’या पुस्तकाचे प्रकाशन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे उद्या, ५ मे रोजी होत आहे.

ज. द. जोगळेकर : चालते-बोलते संदर्भ ग्रंथालय

ज्येष्ठ सावरकरवादी लेखक ज. द. जोगळेकर यांच्या ‘समीक्षा-संचित’या पुस्तकाचे प्रकाशन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे उद्या, ५ मे रोजी होत आहे. यात सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना उपयुक्त असणाऱ्या निवडक ६३ ग्रंथपरीक्षणांचा समावेश आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख..

१९९८ मध्ये ज. द. उर्फ जयवंत दत्तात्रय जोगळेकर यांना स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने एक पुरस्कार देऊन सन्मानित केले. या प्रसंगी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे तत्कालीन संपादक गोिवदराव तळवलकर विशेषत्वाने उपस्थित होते. तळवलकर म्हणाले की, ‘ज. द. जोगळेकर म्हणजे एक व्यासंगी विद्वान, कधीही मदतीला धावून येणारा मित्र, लिखाणाला पूर्णता आणण्याकरिता भरपूर कष्ट उपसणारा एक जिद्दी लेखक व चालताबोलता संदर्भग्रंथ आहे.’ तळवलकर पुढे म्हणतात, ‘आम्हा दोघांत वैचारिक मतभेद असले तरी ज. द. जोगळेकर यांच्यातील वरील गुणांमुळे आमच्या दोन दशकांहून अधिक काळाच्या मत्रीत कधीच व्यत्यय आला नाही उलट ज. द. जोगळेकर यांच्यासारखा अष्टपैलू गृहस्थ आपला मित्र आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो.’
एके काळी गोिवद तळवलकर, विद्याधर गोखले, दि. वि. गोखले व जयवंतराव यांच्या बौद्धिक मत्रीची कुतूहलाने चर्चा होत असे. तळवलकरांनी ज.दं.विषयी काढलेले उद्गार त्यांच्या कर्तृत्वाची व वैचारिक उंचीची साक्ष पटवून देतात. जयवंतराव हे ज्येष्ठ सावरकरवादी चिंतक व भारतीय राष्ट्रवादाचे गाढे अभ्यासक व एक विचक्षण समीक्षक म्हणून सर्वाना परिचित आहेत. गेली अनेक वष्रे ते राष्ट्रीय विचारांची कास धरून, वैचारिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ लेखन करीत आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर, १९२१ साली मुंबईत चिखलवाडीत झाला. जयवंतराव केवळ सहा महिन्यांचे असताना, वडिलांनी त्यांना बडोद्यास नेले. त्या काळी िहदुस्थानात, सयाजीराव गायकवाडांच्या बडोदे संस्थानाचा एक लौकिक होता. अशा प्रगतिशील संस्थानाच्या शिक्षण खात्यात जयवंतरावांच्या वडिलांनी नोकरी मिळविली व ते तिथेच स्थायिक झाले. जयवंतरावांचे शालेय शिक्षण बडोद्यात झाले. शाळेत असताना त्यांचा ओढा अभ्यासापेक्षा, खेळ व अवांतर वाचनाकडे अधिक असायचा. लहानपणापासूनच स्वतंत्रपणे वागण्याची व विचार करण्याची सवय त्यांना होती याचा परिणाम असा झाला की, पुढील काळात जयवंतराव एक स्वतंत्र, प्रतिभाशाली विचारक बनू शकले. चरित्रवाचनाची आवड त्यांना शालेय जीवनातच लागली. त्याचे श्रेय ते आपल्या वडिलांना देतात. शिवाजी, नेपोलिअन, बाजीराव, सीझर यांची चरित्रे सुरुवातीस त्यांनी वाचली. जयवंतराव पुढील शिक्षणासाठी पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयात दाखल झाले. वाचनाचा नित्य परिपाठ इथेही चालू राहिला. अॅबटचा नेपोलियन, गॅरिबाल्डी, डीव्हॅलेरा, मॅझिनी इ. चरित्रे त्यांनी त्या काळात वाचली. फग्र्युसनमध्ये असताना युनिव्हर्सटिी ट्रेिनग कोअरमध्ये ते दाखल झाले. त्या वेळी दर सहा महिन्यांनी परेडचा भत्ता म्हणून पंधरा रुपये मिळत. जयवंतरावांनी पहिल्या हप्त्याचा उपयोग हिटलरचे आत्मचरित्र ‘माईन काम्फ’ हे विकत घेण्यासाठी केला होता. त्यांच्या वाचनप्रेमाचा यापेक्षा उत्तम दाखला तो कोणता? बुद्धीच्या विकासाला वाचनाने हातभार लागतो याची प्रचीती जयवंतरावांना महाविद्यालयीन जीवनात आली. अनेक विषयांचा अभ्यास करण्याच्या त्यांच्या इच्छेचा पाया बहुधा त्या वेळी घातला गेला. १९३८च्या उत्तरार्धात द्वितीय जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले होते. महायुद्धाविषयी उत्सुकता वाढीस लागल्याने जोगळेकरांनी चíचल, रुझवेल्ट, हिटलर या नेत्यांविषयी वाचलेच. परंतु वेव्हेल, ऑकिन्लेक, माँटगॉमारी, मॅकआर्थर, मार्शल, रुन्स्टेड, रोमेल इ. देशोदेशीच्या सेनानींच्या चरित्रांचाही त्यांनी तितक्याच जिज्ञासेने अभ्यास केला. यातूनच पुढे ‘भारतीय युद्धशास्त्राची उपेक्षा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
तरुण वयात माणसाचा स्वभाव थोडा धाडसी असतो असे म्हणतात. जयवंतरावही यास अपवाद नव्हते. १९५२मध्ये खिशात दमडी नसताना मित्रांकडून उसने पसे घेऊन त्यांनी युरोपचा दौरा केला. हे त्यांच्या दृष्टीने जीवनातील एक अविवेकी धाडस होते. लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी याच वास्तव्यात त्यांनी वृत्तपत्रांना लेख लिहून पाठविण्यास सुरुवात केली. एका अर्थाने पुढील काळात त्यांच्या हातून झालेल्या वृत्तपत्रीय लिखाणाचा श्रीगणेशा होता. भारतात परत आल्यानंतर डोक्यावर कर्जाचा आíथक बोजा असल्यामुळे जयवंतरावांनीही नोकरी शोधण्यास प्रारंभ केला.
बडोद्यात असताना काही काळ त्यांनी वकिली केली. याच काळात िहदू महासभेचे कार्यही त्यांनी नेटाने केले. ३ मे १९५७ रोजी मुंबईत बेस्टमध्ये त्यांनी नोकरीस सुरुवात केली. जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी तब्बल २१ वष्रे बेस्टमध्ये काम केले. नोकरीत असतानाही जयवंतराव यांनी त्यांच्या रजांचा उपयोग लेखन, वाचन, जगप्रवास यासाठी केला हे त्यांचे आगळे-वेगळे वैशिष्टय़च!
त्यांच्या या यशस्वी जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी स्व. डॉ. शोभा जोगळेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. डॉ. शोभा यांनी जयवंतरावांना लिखाणासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले, इत्केच नव्हे तर मानसिक आधाराबरोबर आíथक पाठबळही दिले हे नमूद करावेसे वाटते. आपल्या पत्नीच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जयवंतरावांच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे.
राष्ट्रवादाविषयी मनात असलेली स्वच्छ धारणा व त्यावर असलेली अपरंपार निष्ठा हा जोगळेकरांचा एक विशेष. जीवनात कोणत्या गोष्टी करावयाच्या नाहीत हे त्यांनी मनात पक्केठरवले होते. त्यामुळे नेमके काय करावे हे त्यांना पक्के ठाऊक झाले.
भावनेला आवर घालणे, वस्तुस्थितीचा स्वीकार करणे नि अहंकाराला चार हात दूर ठेवणे, या गोष्टी केल्या तर कोणीही बुद्धिवादी होऊ शकतो यावर जोगळेकरांचा विश्वास आहे. टिळक, केळकर, सावरकर यांच्या साहित्याबरोबरच शॉ, वेल्स, रसेल यांचे साहित्य व युरोपीय वैचारिक साहित्याने ‘रॅशनल’ विचार करण्यास आपण शिकलो असे जयवंतराव सांगतात. अचाट स्मरणशक्ती, प्रशासकीय निपुणता, हजरजबाबीपणा, स्पष्टवक्तेपणा, मिश्कीलता (जी िहदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये खचितच आढळते) हे जयवंतराव यांचे आणखी काही स्वभाव विशेष!
जयवंतराव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांकडे राष्ट्रवादाच्या संदर्भात बघणारा थोर विचारवंत आहे. त्यांच्याकडे बोलताना आधुनिक काळातील संदर्भाची परिभाषा असते त्यामुळे त्यांच्या बरोबरच्या प्रत्येक भेटीत नित्यनूतन गवसते. त्यांच्याशी बोलताना बिस्मार्क, केमाल पाशा, चíचल, रुझवेल्ट, स्टॅलिन या पुस्तकातील व्यक्ती राहत नाहीत. जणू काही जयवंतराव स्वत: त्या प्रसंगी उपस्थित होते अशा आविर्भावात त्यांचे एकपात्री इतिहासकथन सुरू असते. आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारा तो एक विलक्षण अनुभव असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादात किती आणि कसा वेळ जातो याचे आपणांस भानच राहत नाही.
जयवंतरावांचे बहुतांशी लिखाण हे युरोपमधल्या गेल्या चार-पाचशे वर्षांत ज्या घटना घडल्या त्यांच्याशी संबंधित राहिले आहे. या काळात युरोपमध्ये आधुनिकतेचे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यांतील आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या प्रवाहांसंदर्भात जयवंतरावांइतके सातत्याने लिखाण मराठीत तरी कोणीही केलेले नाही. सांप्रदायिक वर्चस्वापासून आपली मुक्ती करून घेऊन ऐहिक ज्ञानाच्या बळावर युरोपमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया कशी घडली हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी फ्रान्सचा रिशेल्यू, इटलीतील काहूर, फ्रान्सचा तालेराँ, जर्मनीचा बिस्मार्क, हंगेरीचा कोसूथ, अमेरिकेचा जेफर्सन, तुर्कस्थानचा केमाल पाशा आदींच्या राष्ट्रउभारणीच्या कार्याचे महत्त्व सांगणारा ‘निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार’ असा ग्रंथ लिहिला. राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया जटिल असते, अनेक हितसंबंधांना राष्ट्रहिताशी जोडून ती करावी लागते याची माहिती देण्याकरिता ही उदाहरणे त्यांनी अभ्यासकांपुढे ठेवली. युरोप जेव्हा चर्चच्या सांप्रदायिक सत्तेच्या अधीन होता तेव्हा तिथे अंधारयुग होते व जसजसा युरोपला ग्रीक बुद्धिवादाचा व ऐहिक ज्ञानशाखांचा परिचय झाला तेव्हा युरोपमध्ये पुनरुत्थानाचे पर्व सुरू झाले. ज्या अरब देशांकडून युरोपला हा ज्ञानलाभ झाला त्या अरबस्थानने जेव्हा या ऐहिक ज्ञानापेक्षा इस्लामी सांप्रदायिक वर्चस्वाला मान्यता दिली तेव्हापासून अरबस्थानचे बौद्धिक मागासलेपण सुरू झाले.
सांप्रदायिक विचारांचा प्रभाव, राष्ट्रवाद व आधुनिकता यांच्या परस्परसंबंधांचा एवढा मूलगामी वेध मराठीत तरी क्वचितच कोणी घेतला असेल. त्यामुळे या संबंधात जगभरात घडणाऱ्या घटनांवर त्यांचे चौफेर लक्ष असे व त्या घटना ते लगेच वाचकांपुढे ठेवीत. आजच्या घडीसही हा त्यांचा परिपाठ चालू आहे. ‘युगप्रवर्तनाच्या उंबरठय़ावरचे अरब जग’ हे मध्य पूर्व देशांतील अलीकडच्या घडामोडींवर त्यांचे प्रसिद्ध झालेले पुस्तक हे त्याचे उदाहरण. जयवंतराव हे प्रागतिक विचारांचे आहेत. भारतीय इतिहासाकडे डोळसपणे बघण्याची त्यांची दृष्टी आहे. म्हणूनच त्यांनी भारतात युद्धशास्त्राची उपेक्षा कशी झाली हे सांगणारे पुस्तक लिहिले. भारताच्या इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या अलेक्झांडर व पोरस, पृथ्वीराज चौहान व महंमद घोरी, राणा संग व बाबर, विजयनगरचे राक्षस तागडी येथील रामराया विरुद्ध दक्षिणेतील सुलतान, सदाशिवराव भाऊ व अब्दाली यांचे पानिपत आणि दौलतराव िशदे व वेलस्ली अशा सहा निवडक लढायांचे विश्लेषण केले. या सर्व युद्धांत हत्तीदलाचा हल्ल्यासाठी वापर करणे, घोडदलाच्या गतिमान युद्धांशी परिचय नसणे, कमी दर्जाची शस्त्रास्त्रे राखीव सन्यदल नसणे आदी त्याच त्याच चुका या सहाही युद्धांत कशा केल्या गेल्या हे त्यांनी अधोरेखित केले. युद्धशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास न केल्याने असे घडले हे त्यांचे त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिपादन.
जयवंतराव स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुढील वाक्य नेहमी सांगतात- ‘इंद्रपद जरी माझ्याकडे येत असले तरी पहिला अिहदू म्हणून जगण्यापेक्षा शेवटचा िहदू म्हणून मी मरण पत्करीन.’ जोगळेकर बोलण्याच्या ओघात सांगतात की, ‘मी राष्ट्रवादाचा अभ्यासक आहे नि सावरकर विचारांचा प्रचारक आहे.’ जयवंतराव यांनी राष्ट्रवादावर जितके साहित्य लिहिले ते पाहिल्यावर कोणीही म्हणेल की, त्यांनी केलेले स्वत:चे वर्णन यथार्थ आहे.
‘लोकसत्ता’च दिवंगत संपादक व नाटककार विद्याधर गोखले हेही जयवंतराव यांचे स्नेही होते. ज.दं.नी ‘सावरकर एक वादळी जीवन’ हे पुस्तक लिहिले त्या वेळी गोखले म्हणाले की, ‘जणू गगनदीप हे झळकतात मोजू किती? स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कर्तृत्वसंपन्न महापुरुषाच्या बहुरंगी जीवनाकडे पाहताना आपली अशीच काहीशी स्थिती होते. महाभारतासारखेच त्यांचे चरित्र, त्यातील प्रत्येक पर्व रसोत्कट आणि नानाविध घटनांनी, विचारांनी खच्चून भरलेले!.. असे हे चरित्र अवघ्या २२५ पानांत कोणतीही उल्लेखनीय गोष्ट न वगळता साधार, सप्रमाण कथन करणे आणि या चरित्राला अथपासून इथपर्यंत उजाळा देणारे लोकोत्तर चारित्र्य पानोपानी प्रकट करणे हे सोपे काम नव्हे. आमचे स्नेही नि धुरंधर लेखक ज. द. जोगळेकर यांनी हे उत्तम प्रकारे केले आहे.’
जयवंतराव आज शरीराने थकले आहेत. अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत तरीसुद्धा त्यांची लेखन व वाचनाबद्दलची तळमळ वाखाणण्यासारखी आहे. भारतीय युवकांमध्ये वाचन संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे; परंतु त्यासाठी भारताचा व जागतिक इतिहास, जागतिक युद्धे, क्रांत्या, युद्धशास्त्र हे विषय, बाजारात नवनवीन येणारी इंग्रजी भाषेतील पुस्तके तसेच शिवाजी, बाजीराव, नेपोलियन व वॉिशग्टन इ.च्या नेतृत्वाचा अभ्यास आवश्यक आहे, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.

marathi bhasha din 2024 vishnu vaman shirwadkar Why did accept nickname kusumagraj read kusumagraj 5 famous poems in marathi
मराठीसाठी झटणाऱ्या वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव का स्वीकारले?
Muslim Marathi Literary Conference
“मुस्लिमांचे संस्कृती, नाट्य, साहित्यात मोठे योगदान,” फरझाना म. इकबाल डांगे यांचे प्रतिपादन; पहिले मुस्लीम मराठी साहित्य संमेलन उत्साहात
manohar shahane marathi news, manohar shahane literature marathi news, manohar shahane loksatta article, manohar shahane loksatta marathi news
माणसांत राहूनच ‘कोऽहम’चा शोध घेणारा लेखक…
ramkrishna naik founder of goa hindu association
रामकृष्णबाब!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: J d gojlekar samiksha sanchit

First published on: 04-05-2014 at 01:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×