उदारीकरणानंतर भारतीय मध्यमवर्ग बऱ्यापैकी देशाटनाच्या मागे लागला. पुढे दहाएक वर्षांनी अमेरिका, युरोपमधील पारंपरिक पर्यटनस्थळांना पाहून कंटाळल्यानंतर लोकप्रिय आशियाई देशांतील भटकंतीचा नाद सुरू झाला. पुढल्या दोन दशकांमध्ये त्याचा पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तारला. पूर्वापारच्या हौशींप्रमाणेच समाजमाध्यमांत छायाचित्र झळकविण्याच्या ओढीने गर्दी करणाऱ्या तसेच इतर देशांतील संस्कृती-इतिहास-नैसर्गिक सौंदर्य यांची खरोखरची अनुभूती मिळविण्याची इच्छा बाळगणाऱ्या गंभीर वृत्तीची भर जागतिक पर्यटकांच्या ताफ्यात होत आहे. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे आपल्या जवळचे देश द्रुतगतीने पर्यटनाच्या पटलावर ओळखले जात आहेत, त्यांच्या तपशिलासह यातील एका देशाच्या स्वतंत्र भटकंतीचा अनुभव. त्याचबरोबर जग पाहायला निघालेल्या आपल्या पर्यटकांच्या बदलत्या चेहऱ्याचे विश्लेषण…
भारतीय लोकांचे देशाटन गेल्या वीसेक वर्षांत विस्तारले. नव्वदीच्या अखेरीस नव-मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गासह श्रीमंतांना आकर्षण होते ते युरोप आणि अमेरिकेच्या पर्यटनाचे. त्यानंतर मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या देशांच्या एकत्रित ‘पॅकेज टूर्स’ हळूहळू लोकप्रिय बनत गेल्या. गेल्या दशकापर्यंत म्हणजे अगदी करोनापर्यंत हे चित्र कायम होते. मात्र जवळजवळ दोन-तीन वर्षांच्या घरकोंडीने एकदम चित्र पालटले. बाहेर जाण्यासाठीची उत्सुकता वाढली. दोन हजारच्या दशकात फक्त अमेरिकेला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मदतदूत म्हणून निघालेल्या सशुल्क ऑनलाइन यंत्रणा पुढल्या दहाच वर्षांत सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि दुबई यांच्या वाऱ्या करण्यासाठी सरसावल्या. आज ‘मेक माय ट्रिप’च्या धर्तीवर डझनाहून अधिक ऑनलाइन सेवा भारतीय पर्यटक वापरतात. त्याशिवाय स्थानिक पातळीवर टूर कंपन्यांचे जाळे प्रचंड वाढले. (स्वतंत्ररित्या संशोधन करून आणखी कमी खर्चात प्रवास करणारे धाडसी देखील आहेतच) गेल्या तीनेक वर्षांत कझाकस्तान, उझबेकिस्तान, अझरबैजान याआधी आपल्यासाठी फार माहिती नसलेल्या मध्य आशियातील राष्ट्रांनी पर्यटन व्यवसायात प्रगती केली. पैकी कझाकस्तान आणि उझबेकिस्तान भारतीयांसह जगातील अनेक नव्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. तेलसमृद्ध असलेल्या या देशांचा नव्याने झालेला पर्यटन विकास कुणाच्याही डोळ्यात भरणारा असाच.
पर्यटन आणि पर्यटकांचा भारतासह जगाच्या दृष्टीने ढोबळमानाने करोनापूर्व तसेच करोनापश्चात असा फरक करावा लागेल. आता देशाबाहेर जाण्याची इच्छा आणि क्रयशक्ती असलेले पर्यटक कमीत कमी खर्चात आपल्याला परमोच्च आनंद देऊ शकणाऱ्या ठिकाणांचा शोध घेताना सजग झालेला पाहायला मिळतो. पूर्वीसारखा पर्यटन नियतकालिकांमधील ग्लॉसी छायाचित्रांना पाहून किंवा पर्यटनकेंद्री मालिका-चित्रपट पाहून तो एखाद्या लोकप्रिय स्थळाला सुट्टीकाळात भेट देण्याचे नियोजन करीत नाही. केवळ महागडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात फिरायला जाण्याबाबत असलेली सामाजिक प्रतिष्ठा आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. त्या देशात जातानादेखील सुविधांसह थोडे स्वस्त ‘पॅकेज’ कोण देऊ करतेय, याचे पर्याय शोधण्याची वृत्ती आता तयार झाली आहे. ब्लॉगर्स -व्लॉगर्सच्या भेटींचे तपशील पाहून, यूट्यूबवरून राहण्या-भटकण्याच्या स्थळांची पडताळणी करून, एखाद्या ठिकाणी पूर्वी गेलेल्या आप्तांकडून माहिती मिळवून, विविध टूर पॅकेजेसमधील फरक तपासून, त्यांना इतरांनी दिलेल्या रेटिंग्जचे तपशील पाहूनच मग आपली सुट्टी कुठे उत्तम घालवता येईल हे ठरवतो. खूप गर्दीच्या, गजबजलेल्या आणि पर्यटकांनी गच्च झालेल्या ठिकाणांऐवजी शांतता असलेल्या ठिकाणांची निवड करताना दिसतो.
करोनाआधीपासून कझाकस्तान, उझबेकिस्तान या देशांनी पर्यटनामधून उभारता येणाऱ्या परदेशी चलनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो. या दोन्ही देशांनी आपल्या देशातील मूलभूत यंत्रणांना, निसर्गस्थळांना आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रांच्या तोडीचे करण्यावर भर दिला. परदेशी गुंतवणुकीला वाव दिला. वाहतुकीच्या यंत्रणांमध्ये सुसूत्रता आणली, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणाऱ्या हॉटेल्स, मॉल्सची निर्मिती केली. आपल्या देशातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जगातील पर्यटक आकर्षित होतील या दृष्टीने आकर्षक अर्थस्नेही धोरणे आखली. कझाकस्तानमध्ये पावसाळा आपल्यासारखा ऋतू म्हणून नसतो. मात्र नोव्हेंबर ते मार्च तिथे बर्फवृष्टी होते. त्या दृष्टीने पर्यटकांसाठी रिसॉर्ट, बर्फातील खेळ (आईस स्केटिंग) आणि विविध महोत्सव (विंटर फेस्टिव्हल्स) येथे भरविण्यात येतात. रेशीम मार्ग म्हणजेच ‘सिल्क रूट’वर असलेल्या उझबेकिस्तानने २०१७ नंतर व्हिसाबाबत मोकळी धोरणे आखली. आपल्या इतिहाससमृद्ध शहरांचा कायापालट केला. समरकंद, खिवा, ताश्कंद या साऱ्याच परिसरांत ‘सिल्क रोड रेस्तराँ’, ‘सिल्क रोड शॉप्स’, ‘सिल्क रोड टूर्स अॅण्ड एजन्सीज’ अशी नामावली पाहायला मिळते. ‘डिस्नेलॅण्ड’च्या धर्तीवर थीम पार्क्स कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांत दिसतात. कॅफे आणि नाइटलाइफ संस्कृतीदेखील नव्याने विकसित होत असल्यामुळे भारतीयांसाठी थायलंड-मलेशियापेक्षा वेगळ्या अनुभवाचे हे नवे पर्याय बनत चालले आहेत.
पर्यटनवाढीसाठी प्रयत्न…
दहा वर्षांपूर्वी कझाकस्तानने पर्यटन क्षेत्रात वृद्धीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. जुलै २०२२ नंतर या देशाने भारतीय पर्यटकांना व्हिसामुक्त केले. सध्या या देशाने ५४ राष्ट्रांसाठी व्हिसामुक्त धोरण ठेवले आहे. देशात असलेल्या नैसर्गिक सौंदर्यस्थळांना, भेटीयोग्य स्थळांना अधिकाधिक आकर्षक करण्यावर भर दिला जातोय.
एप्रिल ते मे हा आपल्याकडचा उन्हाळसुट्टीचा कालावधी तिथला वसंत ऋुतू. हा त्यांचा पारंपरिक पर्यटन हंगाम नसल्याने तुलनेने इतर राष्ट्रांतील पर्यटक या काळात कमी असतात. त्यामुळे भारतीयांना इथे बऱ्यापैकी स्वस्तात सहल आखता येते. निसर्ग सौंदर्यासह आरामदायी राहणीमानाचा आस्वाद घेता येतो. जून ते ऑगस्ट हा कझाकस्तानमधील उन्हाळा. मात्र, २० ते २८ अंश इतके कमाल तापमान असल्याने बराचसा सुसह्य. त्यामुळे पर्यटकांची गजबज या काळात असते. भारतासह चीन आणि तुर्कीये या देशांतील नागरिकांची गेल्या दोन वर्षांत पसंती या देशाला मिळाली. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये शरद ऋुतू असल्याने या काळात बऱ्यापैकी थंडी होते आणि पर्यटकांची गर्दी कमी व्हायला लागते. त्यामुळे बऱ्याच सवलती आणि पॅकेजेस इथल्या पर्यटन उद्योगाकडून दिल्या जातात. नोव्हेंबर ते मार्च या काळात कडक हिवाळा सुरू होतो आणि बर्फाची चादर भूभागावर पसरते. बर्फावरील खेळ आणि हीमवृष्टी अनुभवण्यासाठी पुन्हा नव्या पर्यटकांचा जथ्था इथे येतो. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये कझाकस्तानमध्ये दीड कोटीहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. कझाकस्तान पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतातून एक लाख ४६ हजार पर्यटकांनी या देशाला भेट दिली. (२०२३ मध्ये हा आकडा २८,३०० इतका होता. एका वर्षातली भारतीयांची वाढलेली संख्या यातून लक्षात येते.) सर्वाधिक चीन (सहा लाख ५५ हजार) आणि आपल्यानंतर तुर्कीयेमधील पर्यटकांनी (एक लाख ३० हजार) या देशात हजेरी लावली. त्यानंतर जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जगभरातील अनेक देशांतील लोकांचा राबता होता. गेल्या वर्षी पर्यटन उद्याोगाने राष्ट्रीय उत्पन्नात ९६.५ कोटी डॉलर (५०० अब्ज टेंगे) इतकी विक्रमी भर आणि तब्बल पाच लाख नागरिकांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे पर्यटन उद्योगाची कक्षा हरतऱ्हेने रुंदाविण्यासाठी कझाकस्तान सक्रिय दिसते. अस्ताना आणि अल्माटी ही दोन्ही शहरे पर्यटनकेंद्री असली तरी अल्माटीभोवती कझाकस्तानचा पर्यटन व्यवसाय केंद्रित झालाय. अगदी या महिन्यापर्यंत कझाकस्तानमध्ये विमान प्रवासासाठी केवळ दिल्लीवर अवलंबून राहावे लागे. या महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईमधूनदेखील आठवड्याला तीन विमानसेवा (मुंबई ते अल्माटी) सुरू झाल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांना मुंबई-दिल्ली वारी करावी लागणार नाही. पर्यटन विस्तारासाठी परदेशी गुंतवणूक कझाकस्तान मोठ्या प्रमाणावर आकर्षित करीत असून, याच महिन्यात त्यांनी विदेशी गुंतवणूकदारांसाठी दहा वर्षांचे व्यवसाय व्हिसा धोरण आखले.
उझबेकिस्तानची डॉलर धडपड…
ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वास्तू असलेल्या या देशाने २०१७ पर्यंत आपले व्हिसा धोरण मुक्त केले नव्हते. तोवर वर्षभरात केवळ २० ते २४ लाख पर्यटक या देशाला भेट देत असत. २०१८ ते २०२४ या काळात पर्यटन विकासासाठी जी गुंतवणूक आणि सुधारणा करण्यात आली, त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षात (२०२४) एक कोटी २० लाख पर्यटकांची विक्रमी नोंद येथे झाली. यात भारतीयांचा वाटा ८२ हजार इतका तुरळक असला, तरी तो एका वर्षात दुपटीने वाढला असल्याचे पर्यटन विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून कळते. सध्या या देशाचा भारतीय नागरिकांनादेखील व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. भारतीय पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी २०३० पर्यंतचा पर्यटन कार्यक्रमदेखील या देशाने आखला आहे. भारतीय पर्यटकांना येथे जाण्यासाठी तीन दिवसांसाठी वीस डॉलर (दीड हजारच्या आसपास) व्हिसा फी असली, तरी उझबेकिस्तानने जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, तुर्किये या राष्ट्रांसाठी व्हिसामुक्त प्रवेश आहे. गेल्या वर्षात कझाकस्तानमध्ये चिनी पर्यटकांची विक्रमी संख्या होती. ते पाहूनच कदाचित येत्या एक जूनपासून उझबेकिस्तानमध्येदेखील चिनी पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेश मिळेल. याशिवाय किरगिस्तान या शेजारी राष्ट्राशी पर्यटन सहकार्याचे विविध करार केले असल्याने पुढील काळात या देशाबरोबरच किरगिस्तानभेट देखील भारतीय पर्यटकांना सुकर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांत उझबेकिस्तानमध्ये ६.५ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक फक्त पर्यटनवृद्धीसाठी करण्यात आली. आधी असलेल्या हॉटेलयंत्रणेमध्ये एक लाख तीस हजार निवासाच्या (हॉटेल रूम्स) सुविधा फक्त पर्यटकांसाठी तयार करण्यात आल्यात. गेल्या चार वर्षांत ३७५ राष्ट्रीय स्मारकस्थळांजवळ पुनर्विकासावर भर देण्यात आला. कझाकस्तानप्रमाणेच येथेही विंटर रिसॉर्ट्स आणि त्याभोवतीचे पर्यटन लवकरच पाहायला मिळणार आहे. विमानसेवा आणि तिकीट-व्हिसा अधिकाधिक ऑनलाइन करण्यावर पुढील काळात भर असणार आहे.
अत्यंत आक्रमक पर्यटन धोरणांमुळे आणि अर्थातच येणाऱ्या लोकांना पर्यटनाचा परमोच्च आनंद पुरविल्यामुळे कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या देशांकडे भारतासह अधिकाधिक देशांतील लोक वेगाने आकर्षित होतायत. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक आशियाई राष्ट्रांची पसंती बदलत चालल्याचे चित्र त्यामुळे लख्ख झाले आहे.