प्रख्यात पुरातत्त्ववेत्ते डॉ. शंकरराव साळी यांनी महाराष्ट्रात पुरातत्त्व संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले असले तरी त्यांच्या या कार्याची दखल मात्र म्हणावी तशी घेतली गेली नाही. त्याविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुधा ते १९५० साल असावे. पुणे-नाशिक हमरस्त्यावरील संगमनेर गावातील एक तिशीतला तरुण छोटय़ाशा वार्तेने जवळच प्रवराकाठी असलेल्या जोर्वे या गावी गेला. तीन वर्षांपूर्वी प्रवरेला मोठा पूर येऊन गेला होता. त्या पुराने जोर्वे गाव आणि शिवारात बरीच उलथापालथ झाली होती. गावाच्या उगवतीला असलेल्या लहान टेकाडाचा मातीचा वरचा थर पुराने मोकळा झाला होता. त्यात जुनी मातीची भांडी, रंगीबेरंगी खापरे, उत्तम नक्षीकाम केलेले पात्र, तोटी असणारे भांडे आदी पुराणकालीन संस्कृतीचे अवशेष आढळून आले होते. हा खजिना पाहून तो तरुण हरखून गेला. कितीतरी वेळ तो तिथे भटकत होता. वैशिष्टय़पूर्ण भांडी व खापरे गोळा करत होता. आपल्या आवडीच्या गोष्टी सापडल्याचे अनामिक समाधान घेऊन तो संगमनेरला परतला. या पुरातन भांडय़ांचा कालावधी काय असेल? कोण कारागीर असतील? काय नाव असेल त्या संस्कृतीचे? आधुनिक साधने नसताना इतकी उत्तम कारागिरी करणारे हे लोक  मोहेंजोदडो व हडप्पा या सिंधू नदीकाठच्या आद्य संस्कृतीशी संबंधित असतील का? अशा नाना प्रश्नांनी फेर धरला होता. प्रवरेकाठी सिंधू संस्कृतीसारखीच एखादी मानवी वसाहत नांदत असली पाहिजे अशी त्या तरुणाची खात्री झाली. चौकशीअंती त्याला या विषयातील एका तज्ज्ञ व्यक्तीविषयी कळले. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत असलेले पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. ह. धी. सांकलिया यांना त्याने गाठले आणि जोर्वे गावातील ते अवशेष त्यांना दाखवले. संगमनेर तालुका डेव्हलपमेंट बोर्डात नोकरीला असलेल्या या खटपटय़ा तरुणाचे नाव होते शंकर अण्णाजी वझाट ऊर्फ साळी.

शंकररावांचे वडील अण्णाजी व आई गंगूबाई साळी यांचा हातमागावर कापड विणण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. कालांतराने व्यवसाय डबघाईस आला. त्यामुळे पेटिट हायस्कूलमध्ये अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर शंकररावांनी संगमनेरला लोकल बोर्डात नोकरी पत्करली. पण त्यांचा पिंड नोकरी करण्याचा नव्हता. आवडीच्या विषयात संशोधन करण्याचा त्यांचा मानस होता. या ध्यासातून जोर्वे येथे सापडलेले प्रागैतिहासिक (Pre-historic) काळातील खापरे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. पुढे डेक्कन कॉलेजतर्फे डॉ. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली जोर्वेसह नेवासे व इतर नद्यांकाठची संस्कृती शोधण्यासाठी उत्खनन सुरू झाले. डॉ. सांकलिया यांच्या भेटीने साळी यांना पुरातत्त्वशास्त्र या विषयात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी जोर्वे येथे काम सुरू केले. मग मात्र त्यांनी मागे वळून  पाहिले नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात रुजू झाल्यावर त्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. एम. ए. (पुरातत्त्वशास्त्र) व पी. जी. डिप्लोमा इन आर्किओलोजी या पदव्या मिळवल्या. १९८० साली पीएच. डी. मिळवली. त्यांचा संशोधनाचा विषय खूप महत्त्वाचा होता. १९७२ साली जळगाव जिल्ह्यतील पाटणादेवी परिसरात त्यांनी केलेल्या उत्खननात पाषाणयुगातील अनेक ज्ञात-अज्ञात गोष्टींचा उलगडा झाला व अनेक संशयही दूर झाले. भारताचा पाषाणयुगातील नकाशा (Stone Age Map of India) तयार करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. गोवा राज्याला या नकाशामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष काम केले.

डॉ. साळी यांच्या कामाचा झपाटा प्रचंड होता. प्रवरा नदीकाठी दायमाबाद (सध्याचे लाडगाव) येथे झालेले उत्खननाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या दृष्टीने हे वारसास्थळ (Heritage Site) मोहेंजोदडो, हडप्पा व लोथल येथल्या संस्कृतींच्या समकालीन आहे. या ठिकाणी जोर्वे, सावळदा, हरप्पा, माळवा व दायमाबाद अशा पाच संस्कृतींचे अवशेष त्यांनी शोधले. निवृत्त झाल्यावर औरंगाबाद येथील वास्तव्यात त्यांनी अत्यंत तटस्थपणे दायमाबाद येथील संशोधनकार्यावर ‘DAIMABAD : 1976-79’ हे जागतिक दर्जाचे उत्तम संदर्भमूल्य असणारे पुस्तक लिहिले. तब्बल ७४४ पानांचा हा ग्रंथराज नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेने १९८६ साली प्रकाशित केला. या कामात सहभागी झालेल्या डॉ. एम. एन. देशपांडे, डॉ. एम. के. ढवळीकर, डॉ. एस. एन. राजगुरू आदींचे मोठे योगदान होते. उत्तरकाळात  साळी यांची The Upper Palaeolithic & Mesolithic Culture of Maharashtra, 1989, Deccan College व Stone Age of India  ही संशोधनपर पुस्तके सिद्ध झाली. जागतिक पातळीवरील विविध नियतकालिकांत त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. डॉ. साळी यांचे उल्लेखनीय काम म्हणजे एकटय़ा दायमाबाद येथे केलेल्या उत्खनन व संशोधनावर पन्नासपेक्षा अधिक शोधनिबंध त्यांनी लिहिले. त्यांनी बहारीन व मस्कत येथे जाऊन काही काळ संशोधन केले. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी पुरातत्त्वशास्त्र विषयात मूलगामी संशोधन व लेखन केले. धुळे, भोपाळ, दिल्ली व औरंगाबाद अशा विविध ठिकाणी पुरातत्त्ववेत्ता म्हणून त्यांनी काम पाहिले. औरंगाबादमधील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेतून अधीक्षक पुरातत्त्ववेत्ता या पदावरून ते शेवटी निवृत्त झाले. भारतीय पुरातत्त्वशास्त्र (Indology / Indian Archaelogy) या विषयातील एक उपशाखा विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.  महाराष्ट्रातील आद्य शेतकरी वसाहती व त्यांच्या जीवनशैलीविषयी अनेक अज्ञात बाबी त्यांनी जगासमोर आल्या.

अत्यंत शांत स्वभाव, प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची तयारी, एकाग्रपणे काम करण्याची शैली या गुणांमुळे ते  दररोज उत्तररात्रीपर्यंत अखंड काम करत. घराण्याचा हा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीनेही चालवला. चेतन साळी हे त्यांचे चिरंजीव. तेही पुरातत्त्ववेत्ते होते. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले. चेतन साळी यांचे अकाली निधन झाले. वडिलांची परंपरा अत्यंत समर्थपणे त्यांनी चालविली. ‘प्राचीन कोल्हापूर’ हा त्यांचा ग्रंथ उत्तम संदर्भग्रंथ मानला जातो. सूनबाई डॉ. गीता साळी यांनीही पुरातत्त्वशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले असून, या विषयात त्याही सातत्याने कार्यरत आहेत.

मुळात पुरातत्त्वशास्त्र हा विषय तसा दुर्लक्षित. अशा विषयात काम करणाऱ्या व्यक्ती कितीही असाधारण असल्या तरी समाज त्यांच्या ज्ञानाची कदर करत नाही. संशोधनाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या कुटुंबातील जन्म- तोही संगमनेरसारख्या खेडय़ात. (१९२० च्या सुमारास संगमनेर खेडेच होते.) सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने पुरातत्त्वशास्त्र म्हणजे मढी उकरण्याचे काम. यात कसलं आलंय करिअर व प्रसिद्धी? समाजातील या ‘दृष्टिदोषा’मुळे डॉ. शंकरराव साळी यांच्यासारखा गाढा पुरातत्त्व संशोधक उपेक्षितच राहिला. संगमनेरमध्ये पुरोगामी, सुसंस्कृत वातावरण आहे असे कौतुकाने बोलले जाते. परंतु संगमनेर नगरपालिकेने कै. डॉ. शंकरराव साळींसारख्या विख्यात संशोधकाचे कितीसे स्मरण ठेवले आहे? एक पर्यायी करिअर म्हणून पुरातत्त्वशास्त्र या विषयात निश्चितच संधी आहेत, हे तरुण पिढीला पटवून द्यायचे असेल तर डॉ. शंकरराव साळी यांचे मूलगामी संशोधन व लेखन निश्चित दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.

विजय प्रल्हाद सांबरे vijaysambare@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on eminent archaeologist dr shankarrao sali
First published on: 30-07-2017 at 03:29 IST