‘लोकरंग’ (१ ऑक्टोबर) मधील अभय बंग यांच्या ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य : एक कोडे’ लेखात मराठी साहित्याने गांधी नावाच्या महात्म्याला न्याय दिला नाही हे म्हणणे पटण्यासारखेच! पण हा न्याय न मिळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण माहीत असलेलं एक कारण म्हणजे गांधीद्वेष हे आहे. ‘गांधी’ हा जगण्याचा मार्ग असूच शकत नाही, असं काही हिंसक मराठी बुद्धीचं मानणं आहे. कारण मराठी माणसं तापट आहेत. मर्दानगीच्या वगैरे गप्पा जरा जास्तच मारणारी ही मंडळी आहेत! त्यांना गांधी विचार नपुंसक वाटतात. पण उलटपक्षी गांधी म्हणजे बलवान असणं आहे. अवघड प्रसंगांना एकटय़ानं विनाशस्त्र सामोरं जाणं आहे. कुणासाठी मरण्यापेक्षाही कुणासाठी जगणं, लढणं, आयुष्यभर जळणं आहे आणि खरं तर तेच महत्त्वाचं असतं. त्यामुळेच आपल्या तत्त्वावर शेवटपर्यंत ठाम असलेला गांधी होणं लोकांना अवघड असतं. आणि त्यामुळं आम्हासारख्यांवर लहानपासूनच ‘गांधी मार्ग अवलंबणारा म्हणजे नपुंसक’ असं बिंबवलं जातं.. मग एकदा का बाळकडू पाजलं गेलं, मेंदू गलिच्छ केले गेले की झालं. त्या व्यक्तीविषयी प्रत्याप्रत्यक्ष मनाच्या कुठल्या कोपऱ्यात खल भाव असणारच. आणि निर्माण झालेले साहित्यिक म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्यातील जनांचे प्रतिनिधीच! मग त्यांच्या तोंडी गांधी कसे येणार? आणि आले तरी आधे-अधुरे आणि चहाडी-चेष्टेचे विषय होऊन उमटणारे. काही अस्सल चित्रपट वगळता गांधी का बदनामच केला गेलेला आहेच. जाती-जातींत विभालेले किंवा त्या त्या भिंतींत गच्च चाकोरीत बसवलेले महापुरुष मात्र त्या त्या वर्ग-जातींकडूनच तेवढे त्या त्या संकुचित वर्गाकडून संरक्षित वगैरे! पण कुठल्याही महापुरुषांना अपमानित किंवा अप्रतिष्ठा करणे हे वैचारिक समाज म्हणून शोभा न देणारे किंवा ते तसं होताना आपल्या जातीचा-धर्माचा नाही म्हणून शांत बसणे हे संकुचितपणाचेच लक्षण! पण गांधी हा कुठल्याही एका वर्गात न मोडल्याने किंवा सर्वसमावेशक भूमिका घेतल्यामुळे दुर्लक्षित किंवा नेहमीच अपमानित! सरतेशेवटी गांधीशिवाय पर्याय नाही शाश्वत जगतास!!!
– करणकुमार जयवंत पोले, पुणे.
हेही वाचा >>> महात्मा गांधी आणि मराठी साहित्य : एक कोडे
लेखाशी सहमत
‘लोकरंग’ (१ ऑक्टोबर) मधील अभय बंग यांच्या ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य : एक कोडे’ या लेखाशी मी पूर्णत: सहमत आहे. गेल्या काही दशकांत मराठी साहित्यिकांनी गांधीजींची दखल न घेण्याचे एक कारण दिसते- चिमूटभर अपवाद वगळता साठच्या दशकापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतल्या मराठीच्या शिक्षकांनी आम्हाला गांधीजींचा द्वेषच करायला शिकवले. आमच्यावर तसेच संस्कार केले. एका सरांनी आम्हाला भरलेल्या गळय़ाने भगतसिंगांची कहाणी रंगवून रंगवून सांगितली होती- भगतसिंगांना फाशी होणार होती. आणि नंतर म्हणे त्यांच्या नातेवाईकांनी व इतरांनी व्हाइसरॉयना विनंती केली. व्हाइसरॉय म्हणाले की, गांधीजींना विचारा. ते हो म्हणाले तर मी फाशी माफ करीन. मारून मुटकून असे संस्कार केल्यावर काय होणार.
अभय बंग यांच्या लेखाला एक छोटी पुस्ती- अवंतिका गोखले यांनी १९१८ साली गांधीजींचे चरित्र लिहिले होते. त्याला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना आहे. त्याचप्रमाणे ना. सी. फडके यांनी गांधीजींचे इंग्रजीत चरित्र लिहिले होते, त्याला पंडित नेहरूंची प्रस्तावना आहे.
– विजय तरवडे
साहित्यिकांना गांधीविचारांचे अप्रूप वाटले नसावे
‘लोकरंग’ (१ ऑक्टोबर) मधील अभय बंग यांच्या ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य : एक कोडे’ या लेखात गांधींचे एकविसाव्या शतकासाठी औचित्य आणि संदेश या दिशेने प्रकट व्हायला भरपूर वाव आहे. या समारोपाशी संपूर्ण सहमती. लेखकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना काही उत्तरे सुचली.
विसाव्या शतकामध्ये गांधींसोबत, गांधीविचारांसोबत, मराठी साहित्यिकांनी न्याय केला का? याचे उत्तर हो असे आहे. गांधीविचारांना निदान साहित्यांतर्गत स्थान मिळून न्याय (लिटररी जस्टिस म्हणता येईल) मिळावा, ही अपेक्षा असते.
१. मुळात गांधीविचार महाराष्ट्रास नवीन नाहीत. साने गुरुजींचा उल्लेख लेखात अग्रक्रमाने केलेला आहेच. या विचारांची मुळे प्राचीन आहेत. त्यांस औपनिषदिक आधार आहे. (ईशावास्यमिदं..).
२. ईश्वरास केवळ ‘निर्मिक’ मानणाऱ्या ज्योतिराव फुलेंचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा असल्याने भक्ती, शरण्यभाव यांपेक्षा समता हे मूल्य मानून, त्यानुसार जीवन जगणे योग्य मानले गेले. ‘यत्न हाच ईश्वर’ ( गांधीजी- सत्य हाच ईश्वर) ही मानववादी धारणा समाजमानसात रूढ असल्याचे दिसते.
३. मानवेंद्रनाथ रॉय यांचा नव-मानववाद जडवादी होता. हा जडवादविचार गांधीजींच्या तत्त्वविचारांहून वेगळा होता; परंतु प्रभावी होता. अनेक वैचारिक केंद्रांना, संस्थांना, नेतेमंडळींस महत्त्वाचा वाटत होता- त्यातील बुद्धिप्रामाण्यामुळे व नैतिकतेच्या आग्रहामुळे.
४. निरीश्वरवादी, निधर्मी विचार मांडणारे साहित्यिक फुले- आंबेडकर- शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात विपुल प्रमाणात असणे स्वाभाविक होय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणूनच येथे रुजली, विकसित होताना आपण पाहिली. ‘परमेश्वराला रिटायर करा’ हे म्हणणे आपल्या परिचयाचे आहे. सुधारक आणि आजचा सुधारक प्रभावी असताना गांधीविचार स्वीकारणे व त्याचे साहित्यात प्रतिबिंब पडणे कठीण.
५. जे. कृष्णमूर्ती काय म्हणतात ते लक्षात घेऊन त्यानुसार परिवर्तन झालेले साहित्यिक अपवादात्मक का असेनात, पण अवश्य आढळतात. केवळ गांधीजींचे नव्हेत, तर सर्वच विचार मग गळून पडतात.आणि उरते ते फक्त पाहणे.
तात्पर्य, मुळात महाराष्ट्राचा वैचारिक पिंड औपनिषदिक तर आहेच, पण शिवाय वर म्हटल्याप्रमाणे बहुपेडी असल्याने गांधीविचारांचे अप्रूप साहित्यिकांस वाटले नसावे, असे मला वाटते.
पु. ल. देशपांडे यांनी मात्र संक्षिप्त का असेना, पण गांधीजींचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे, हेही या संदर्भात नमूद करायला हवे.
– डॉ. शर्मिला जयंत वीरकर, मुंबई</strong>
हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : बुद्धीच्या बळाची बहुप्रज्ञा
गांधी विचारांशिवाय पर्याय नाही
‘लोकरंग’ (१ ऑक्टोबर) मधील अभय बंग यांच्या ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य : एक कोडे’ हा परखड लेख वाचला. २० व्या शतकात गांधींच्या विचारांना महाराष्ट्रात राजकीय प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात मिळाला; परंतु साहित्यिक प्रतिसाद म्हणावा तितका नाही मिळाला. आता २१ व्या शतकात मराठी साहित्याची वाटचाल सावरकर किंवा नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या दिशेने न जाता, महात्मा गांधीच्या संदेशाचा आत्मशोध घेण्याकडे व्हावी आणि ही काळाची गरज देखील आहे.
– सुनील जावळी, बार्शी जि. सोलापूर.