‘लोकरंग’मधील (१४ जानेवारी) राहुल रानडे यांचा ‘उस्ताद, तिहाई बडी जल्दी ले ली’ हा लेख वाचला. राशिद साहेबांचे अकाली जाणे रसिकांच्या मनास चटका लावणारे आहेच, पण यामुळे हिंदूस्थानी संगीताचे फार मोठे नुकसान झाले आहे. हिंदूस्थानी संगीत विश्वात आपली नाममुद्रा उमटवणारे खाँ साहेब गायक म्हणून आणि एक संवेदनशील माणूस म्हणून फार मोठे होते. अहंकाराचा वारा त्यांच्या आसपासही फिरकला नाही. अध्र्या हळकुंडाने पिवळे होणारे गायक आपल्याला पावलोपावली भेटतात, पण राशिद खान भेटतात तेव्हा आपल्या संस्कृतीची पाळेमुळे किती खोल रुजली आहेत याचीच अनुभूती येते. दुर्गा पूजेच्या दिवसांत स्वत:च्या घरी माता सरस्वतीची प्राणप्रतिष्ठा करून ‘तुम बिन सुना संसार’ अशी चीज अळवणारे खाँ साहेब हे सामाजिक सौहार्दाचे दूत होते. आणि म्हणूनच त्यांचे अकाली जाणे रसिकांच्या मनास चटका लावून गेले. लेखकाने हा आकृतिबंध छान उभा केला आहे. –अशोक आफळे, कोल्हापूर.
रसिकांच्या हृदयात कायम राहतील
‘लोकरंग’मधील (१४ जानेवारी) राहुल रानडे यांचा ‘उस्ताद, तिहाई बडी जल्दी ले ली’ हा लेख वाचला. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभावान गानसम्राट राशिद खान यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक बडा तारा निखळला आहे. दीर्घकाळापासून त्यांनी रसिक श्रोत्यांना सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध केले. ते आस्थेने व भान हरपून गात तेव्हा सारा आसमंत भारून जात असे. त्यांचे गायन म्हणजे रसिकांना आनंदपर्वणी असे.- बेंजामिन केदारकर, विरार.
उत्तम लेख
‘लोकरंग’मधील (१४ जानेवारी) राहुल रानडे यांचा ‘उस्ताद, तिहाई बडी जल्दी ले ली’ हा लेख वाचला. राशिद प्रत्यक्ष कधी ऐकले नाहीत, पण हा लेख वाचून त्यांचे व्यक्तिमत्त्व समजले. इतका मोठा गायक, पण त्यांचे निगर्वी असणे किती आश्चर्यकारक वाटते. नाना पाटेकर यांना फोनवर बंदिश ऐकवणे, नव्या गायिकेसह गाणे गाताना त्यात कोणत्याही प्रकारचा मोठेपणा दाखवणे नाही हे विशेष. -सुनील समडोळीकर, कोल्हापूर.
वृद्धांकडे बघायचा दृष्टिकोन नकारात्मक
‘लोकरंग’मधील मेधा कुळकर्णी यांचा (१४ जानेवारी) ‘इथे भेटतं निरोगी म्हातारपण’ हा लेख वाचला. सिंगापूरमधील म्हातारपण खरंच खूप रमणीय आहे. हे असे सुवर्ण दिवस भारतात येणे थोडे कठीण आहे. मुळात आपल्याकडे वृद्धांकडे बघायचा दृष्टिकोन निरुपयोगी माणसे असा आहे. आजारपणाच्या समस्या खूप गंभीर आहेत. आपली प्रचंड लोकसंख्या हे सुंदर म्हातारपण कधीही मिळू देणार नाही. आपल्या देशाचा पैसा गरिबीच्या समस्येने पूर्णपणे घेरलेला आहे. बेरोजगारी ही आपल्याकडे दुसरी गंभीर समस्या आहे. अतिश्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब यांचे प्रमाण खूप व्यस्त आहे. सिंगापूर सरकारचे नियोजन खूप शिस्तबद्ध आहे. लोकसंख्या मर्यादित आहे. कायदे पाळण्यासाठी असतात यावर लोकांचा विश्वास आहे. आपले कायदे समस्या पूरक नाहीत. पण हे सुवर्ण दिवस येतील ही आशा ठेवायला काहीच हरकत नाही. – नीता शेरे, मुंबई.