रणधीर शिंदे
दोनएक आठवडय़ांपूर्वी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चिरंजीव प्रतापराव शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई शिंदे यांचे हस्तलिखित वाचत होतो. त्या गो. मा. पवार सरांच्या सासूबाई. हस्तलिखिताच्या तपशीलाबाबत सरांना फोन केला. त्यांना उत्साह वाटला. दोन-तीन दिवसांनी ये म्हणाले. आपण सलग वाचून संपवूयात, म्हटले. त्याच दिवशी रात्री सरांना पक्षाघाताचा सौम्य धक्का आला आणि सर इस्पितळात दाखल झाले. आयसीयूमध्ये होते. नाकाला मास्क. तरीही बोलायची अनावर इच्छा. परंतु बोलता येत नव्हते. डोळ्यांच्या खुणावाटे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच इतकी हतबलता पाहत होतो. ध्वनीच जिथे गोठले, तिथे डोळ्यांचे काम चालेना. खूप काही सांगायचे होते. शरीर बांधलेले, परंतु ते बाहेर फेकत होते. खुणांनी कागद आणि पेन मागितला. हातांना कंप होता. पेनाने दोन-तीन वेळा त्यांनी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला. एरवी अतिशय ठाशीवपणे कागदावर शब्द उमटविणाऱ्या सरांना पेन आणि कागद दगा देत होता. जीवाच्या आकांताने लिहिण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कागदावरून हात घरंगळत होता. असंबद्ध नागमोडी, वेडीवाकडय़ा रेषा, अक्षरांचे ठसे तेवढे उमटले. अर्थसंवाद तुटलेला. लौकिकाचा संबंध संथपणे संपवत आल्यासारखी त्यांची भावस्थिती होती..
सोलापूरजवळील मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठचे नरखेड हे सरांचे गाव. वडील शिक्षक. एकत्र कुटुंब. वडिलांना आयुर्वेदाचे ज्ञान. लोकसंग्रह भरपूर. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सरांवर मोठा प्रभाव होता. पाचवीनंतर लहान भावंडासह सर सोलापुरात शिक्षणासाठी आले. हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. विनोदाची त्यांना लहाणपणापासून आवड होती. सातवीत असताना ‘सोलापूर समाचार’मधून त्याचे विनोदी चुटके प्रसिद्ध झाले. शाळेतील त्यांच्या कविता ऐकून द. रा. बेंद्रे यांनी ‘पवार कविराय’ असा उल्लेख केला होता. पुढे महाविद्यालयीन काळात त्यांच्या कविता ‘वसंत’, ‘चेतना’ या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. एस. पी. कॉलेज व पुणे विद्यापीठातमून बी.ए. व एम.ए. झाले. पु. ग. सहस्रबुद्धे, रा. श्री. जोग, रा. शं. वाळिंबे हे त्यांचे शिक्षक. एम.ए.नंतर एखाद् वर्ष त्यांनी पुणे महापालिकेच्या जकात नाक्यावर लेखनिक म्हणून नोकरी केली. पन्नालाल सुराणा, सरोजिनी वैद्य, अ. वा. कुलकर्णी, वसंतराव बिडवे हे त्यांचे महाविद्यालयीन सहअध्यायी.
अमरावतीहून औरंगाबादच्या शासकीय आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर प्राध्यापक म्हणून रूजू झाले. औरंगाबादचा १९ वर्षांचा कार्यकाळ त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. अनंत भालेराव, भगवंतराव देशमुख, वा. ल. कुलकर्णी, नरेन्द्र चपळगावकर, भालचंद्र नेमाडे, सुधीर रसाळ.. ते पुढच्या पिढीतील विद्यार्थी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रशेखर जहागिरदार, रवींद्र किंबहुने, भास्कर चंदनशिव अशा अनेकांशी आयुष्यभराचा स्नेह मराठवाडय़ातच जुळला. मराठवाडा साहित्य परिषदेचे सरचिटणीस म्हणूनही सरांनी काम केले. वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विनोदाचा औपपत्तिक विचार’ या विषयावर पीएच.डी. संपादन केली. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे परीक्षक होते डॉ. वि. भि. कोलते आणि पु. ल. देशपांडे!
१९७९ साली गो. मा. पवार सर शिवाजी विद्यापीठात नव्यानेच सुरू झालेल्या मराठी विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रूजू झाले. कोल्हापुरातील पंधराएक वर्षांच्या काळात त्यांनी हा विभाग नावारूपाला आणला. भाषा-साहित्याविषयीचे अनेक उपक्रम राबविले. साहित्याच्या सामाजिक दृष्टीने अभ्यासाची रूजुवात त्यांच्यामुळेच झाली. भालचंद्र नेमाडे, व्यंकटेश माडगूळकर, भाऊ पाध्ये, बाबुराव बागूल, यु. आर. अनंतमूर्ती, कमल देसाई, दि. पु. चित्रे यांसारख्या नामवंत मंडळींना सरांनी अभ्यागत फेलो म्हणून आमंत्रित केले. ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप’ हे त्यांनी घेतलेले चर्चासत्र तर महत्त्वपूर्ण ठरले. प्रा. म. सु. पाटील यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘असे चर्चासत्र पुन्हा होणे नाही.’ या चर्चासत्रातील विचारांनी आधुनिक मराठी साहित्यचच्रेला नवे वळण मिळाले. साहित्यसंशोधनाच्या क्षेत्रात सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी लौकिक मिळवला. एका चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी म. द. हातकणंगलेकर म्हणाले होते, ‘संगीतात जशी घराणी असतात, तसे पवारांनी मराठी ज्ञानपरंपरेत आपले स्वतचे एक घराणे विद्यार्थीरूपाने सुरू केले आहे.’ हे एका अर्थाने खरेच आहे. निवृत्तीनंतर पवार सर सोलापूर येथे स्थायिक झाले. अखेपर्यंत लेखनकार्यात रममाण होते.
समाज प्रबोधन संस्थेसाठी लिहिलेले ‘विवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ (१९६६) हे सरांचे पहिले पुस्तक. मानवी स्वातंत्र्याची इच्छा, समतेची जाणीव आणि भ्रातृभावाची भावना ही विवेकाशी निगडित असते, हे त्यांनी त्यात मांडले. त्यांचे आरंभिक लेखन हे अध्यापनाच्या गरजेतून निर्माण झालेले होते. ‘साहित्यमूल्य आणि अभिरूची’ या संग्रहात त्यांचे प्रारंभिक लेखन समाविष्ट आहे. प्रस्थापित लेखकांच्या लोकप्रियतेचे दडपण त्यांच्यावर कधीच नसे. त्यामुळेच श्री. ना. पेंडसे, पु. ल. देशपांडे आणि वसंत कानेटकर यांचे साहित्य स्वप्नरंजनपर, एकसूरी व वाचकानुनय करणारे आहे, असा परखड विचार ते मांडू शकले.
गो. मा. पवार हे नेहमीच आधुनिक साहित्याचे पुरस्कत्रे राहिले. सकस, गुणवान लेखनाचे सामथ्र्यस्थळ तेवढय़ाच हिरीरीने ते मांडत. रूढ वाटा टाळून लेखन करणाऱ्या भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, चारूता सागर, बाबूराव बागूल आदी लेखकांच्या साहित्यासंबंधी नवा विचार त्यांनी मांडला. भाऊ पाध्ये यांच्या लेखनातील नवनतिकतेचे स्वरूप, मध्यमवर्गाचे खरेखुरे अंतभ्रेदी चित्रण आणि शैलीतील अनुत्कटचे स्वरूप त्यांनी उलगडून दाखवले. सत्तर-ऐंशीच्या दशकातील वाङ्मयीन चळवळीचे ते समानधर्मी राहिले. वाङ्मयविषयक खुला आणि व्यापक दृष्टिकोन त्यांच्या लेखनात होता. त्यांनी नेहमीच गुणसंपन्न साहित्याची दखल घेतली. ग्रामीण संवेदनशीलतेसंबंधी व साहित्याच्या समाजशास्त्रासंबंधीचा मूलभूत विचार सरांनी मांडला. लेखकाची घडण, त्याचा मनपिंड, परिसर भूगोल आणि रूपतत्त्वे यातली मौलिकता त्यांनी स्पष्ट केली. बदलते जीवनभान आणि साहित्य यांतल्या परस्पर नात्याचा शोध घेत साहित्याविषयीचे नवे आकलन त्यांनी मांडले. मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या लेखकांची स्थाननिश्चिती केली. गंगाधर गाडगीळांच्या विनोदात्म लेखनाचा आवाका तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेतील दलित विद्रोही जाणिवेचे रूपदर्शन व देशीयतेची सखोल मीमांसा सरांनी केली आहे.
त्यांच्या सबंध लेखनात अभिरुचिविचारला केंद्रीय स्थान आहे. लेखक आणि वाचकपक्षी असणाऱ्या दुहेरी स्वरूपाच्या अभिरुचीचा विचार त्यांच्या बव्हंशी लेखनात आहे. वाङ्मयीन संस्कृतीतील अभिरुचिद्वंद्वाचे ध्वनी सतत त्यांच्या लेखनात आहेत. अभिरुचीतले खाचखळगे, संघर्ष आणि टकरावाची सखोल मीमांसा त्यांनी केली. समूह-अभिरुचीला शरण जाणारे लेखक आणि नवी अभिरूची घडवणारे लेखक यांच्यातल्या आंतरसंबंधाचे सुस्पष्ट असे चित्र त्यांच्या समीक्षेत आहे. अभिरुचिसंघर्षांचे मूळ बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात व बदलत्या वाङ्मयविषयक जाणिवांत असल्याचे ते नमूद करतात. एका अर्थाने या काळातील मराठी वाचनसंस्कृतीचा नकाशा सुसंगतपणे त्यांच्या लेखनात आहे. ज्या काळात वर्णनपर, आस्वादपर समीक्षेची मराठीत लाट होती, त्याकाळात साहित्यस्वरूपाचे मर्म ते व्यापक सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात उलगडून दाखवत होते. यामागे सरांची जीवनसंबद्ध भूमिका होतीच, पण त्यांचा साहित्याकलनाचा पसही व्यापक होता.
मराठी तसेच भारतीय साहित्यात अपवादभूत ठरावे अशी त्यांची विनोदी वाङ्मयाची समीक्षा आहे. विनोदी वाङ्मयाच्या निर्मिती ते तिच्या स्वरूपासंबंधी त्यांनी विचार मांडला. विनोदात्म वाङ्मयासंबंधी सद्धान्तिक व उपयोजित लेखन केले. ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ आणि ‘मराठी विनोद : विविध आविष्काररूपे’ हे त्यांचे या विषयावरील महत्त्वाचे ग्रंथ. पाश्चात्त्य व भारतीय विनोद मीमांसेची वाट पुसत त्यांनी स्वतचा नवा विचार मांडला. संकल्पनात्मक मांडणी तसेच मराठी विनादी वाङ्मय परंपरा अधोरेखित केली. चक्रधर, संत तुकाराम, महर्षी शिंदे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ ते राम नगरकरांच्या व एकदंरीत मराठी विनोदी वाङ्मय परंपरेचे स्वरूप निश्चित केले. चिं. वि. जोशी यांच्या साहित्यातील व्यापक समाज-संस्कृती चित्रणामुळे त्यांचा त्यांनी कादंबरीकार म्हणून केलेला उल्लेख महत्त्वाचा ठरतो.
महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा शोध हा सरांच्या संशोधनकार्यातील महत्त्वाचा टप्पा होय. त्यांच्यामुळे महर्षी शिंदे यांचे अप्रकाशित वाङ्मय उजेडात आले. महर्षीच्या कार्याविषयी जवळपास दहाहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यासाठी अफाट आणि अचंबित करणारी संदर्भसाधने मिळवली. महर्षीच्या अनेक डायऱ्या, पत्रे, तत्कालीन वृत्तपत्रे, अहवाल, दुर्मीळ कागदपत्रे मिळवली. तौलनिक धर्मशास्त्राच्या अध्ययनासाठी महर्षी मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्डला होते. पवार सर तिथे गेले. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ हा जवळपास सातशे पृष्ठांचा चरित्रग्रंथ सरांनी लिहिला. महर्षीच्या जीवनचरित्राबरोबर त्यांच्या कार्याचे असंख्य पलू, धागेदोरे साधार उलगडून दाखवले. त्यामुळेच समाजसुधारकांबरोबर साक्षेपी विचारवंत, संशोधक, भाषाशास्त्रज्ञ व गुणसंपन्न लेखक म्हणून महर्षीच्या कार्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. प्रा. राम बापट यांनी या चरित्राबद्दल म्हटले आहे की, ‘महर्षीचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर, त्याचवेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे मराठीतले पहिलेच चरित्र आहे.’ महर्षीच्या कार्याची थोरवी मांडत असताना महर्षीच्या व्यक्तिमत्त्वाचा, अंतरंग-भावदर्शनाचा खोलवरचा ठसा स्वाभाविकपणेच पवार सरांच्या जीवनदृष्टीवर पडला.
त्यांचे व्यक्तिविषयक लेखन ‘सुहृद आणि संस्मरणे’ या लेखसंग्रहात समाविष्ट आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला उंची प्राप्त होत असते व्यक्तींच्या कार्यामुळे, असे त्यांचे मत होते. मानवी संबंधातील हृद्य अनुभवांनी स्वतला संपन्न केल्याची धन्यता त्यांच्या मनात निरंतर वसत असे. त्यामुळेच वडीलधार्या भगवंतराव देशमुख वा वा.ल. कुळकर्णी यांच्यावर जेवढय़ा प्रेमभावाने ते लिहितात. तेवढेच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रमेश ढावरे या सहकार्यावर ‘निरागस अंतकारणाचा जिव्हाळयाचा सहकारी’ असा लेख लिहितात. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातील गुणवत्ता आणि सौंदर्यनिर्माणक परिकल्पना सांगण्याबरोबरच नेमाडे यांचे ‘रात्रीच्या प्रहरी नीरव शांततेत त्यांचे सर्जनकार्य चालू असते आणि त्याचा त्यांच्या आनंदाचा स्रोत त्यांच्या अंतकरणात दडलेला असतो’ हेही ते आवर्जून नमूद करतात. त्यांच्या पत्नी सौ.सुजाता माई या महष५च्या नात. याचा त्यांना फार अभिमान आणि धन्यता वाटे. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘नवनीतमृदू आणि वज्रकठोर मित्र’ असे केलेले वर्णन सार्थ असेच आहे.
जीवनातील प्रत्येक अवस्था ही आनंददायक असते. तसेच जीवन हे आनंदाने तुडुंब भरलेले आहे, हा अनुभव आपण पूर्ण क्षमतेने घ्यायला पाहिजे व त्यास अनुरूप अशी आपली मनोवृत्ती असली पाहिजे, या भूमिकेतून ते जीवनाकडे पाहत. व्यवसायावरची अपार निष्ठा, अखंड ज्ञानसाधना, मानवी नात्यांनी आलेली समृद्धता त्यांना महत्त्वाची वाटे. बौद्ध तत्त्वज्ञानातील ब्रह्मविहारातील ‘मुदिता’ (इतरांच्या सुखाने आनंद होणे.) या तत्त्वाचा अखंड ध्यास त्यांच्या मनात वसे. साक्षेपी समीक्षक, महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक आणि तळमळीच्या विद्याíथप्रिय शिक्षकाला महाराष्ट्र मुकला आहे.