scorecardresearch

स्त्रीधर्मनीति!

लक्ष्मीबाई व अनंतशास्त्री डोंगरे या दाम्पत्याचे रमाबाई हे शेवटचे अपत्य.

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळच्या मानकरी आहेत- पंडिता रमाबाई सरस्वती!

मागील लेखात आपण ताराबाई शिंदे यांच्या लिखाणाविषयी जाणून घेतले. त्यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक १८८२ साली प्रकाशित झाले. त्याच वर्षी पंडिता रमाबाई यांचे ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तकही प्रकाशित झाले होते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत रमाबाई लिहितात : ‘‘या देशातील स्त्रिया अगदी असहाय आणि ज्ञानशून्य आहेत. त्यामुळे त्यांस आपले हित कसे करून घ्यावे हेही समजत नाही. याजकरिता ज्ञानी लोकांनी त्यांचे हित काय केल्याने होईल, हे त्यांस सांगून त्यांजकडून त्याप्रमाणे आचरण करविले पाहिजे.’’ हे पुस्तक लिहिण्यामागील रमाबाईंचा उद्देशही तोच आहे.

म्हैसूरमधील मंगळूर जिल्ह्य़ात १८५८ साली रमाबाईंचा जन्म झाला. लक्ष्मीबाई व अनंतशास्त्री डोंगरे या दाम्पत्याचे रमाबाई हे शेवटचे अपत्य. त्यावेळी पडलेल्या दुष्काळामुळे डोंगरे कुटुंबीयांना गाव सोडून तीर्थयात्रेला निघावे लागले. या यात्रेच्या काळात अनंतशास्त्रींनी रमाबाईंना संस्कृतचे शिक्षण दिले. या भ्रमंतीदरम्यानच १८७४ मध्ये अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई या दोघांचे निधन झाले. पुढल्या वर्षी रमाबाईंच्या मोठय़ा बहिणीचेही निधन झाले. त्यानंतर रमाबाई व त्यांचे बंधू श्रीनिवास यांनी भारतभर पायी भ्रमंती सुरू केली. संस्कृतवर रमाबाईंचे प्रभुत्व होतेच, परंतु या काळात त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड या भाषांवरही प्रभुत्व मिळवले. प्रवास करीत ते दोघे १८७८ साली कोलकात्याला आले. येथे रमाबाईंच्या विद्वत्तेचा खऱ्या अर्थाने गौरव झाला. तेथे त्यांना ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ हा किताब बहाल करण्यात आला. येथेच त्यांची केशवचंद्रसेन या धर्मसुधारकांशी ओळख झाली. त्यांच्या प्रेरणेनेच रमाबाईंनी वेदांचा व धर्मशास्त्राचा अभ्यास केला. दरम्यान त्यांनी स्त्रीचे महत्त्व पटवून देणारी समाजप्रबोधनपर व्याख्याने देण्यासही सुरुवात केली. पुढे १८८० मध्ये भाऊ श्रीनिवासच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी पेशाने वकील असलेल्या ब्राह्मोसमाजी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी नोंदणीपद्धतीने विवाह केला. मात्र लग्नानंतर एकोणीस महिन्यांनी मेधावींचेही निधन झाले. केवळ आठ वर्षांच्या काळात रमाबाईंनी कुटुंबातील पाच व्यक्तींचे मृत्यू पाहिले. पतीच्या निधनानंतर आपले सारे आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीसाठी वेचण्याचे त्यांनी ठरवले. १८८२ साली मुलगी मनोरमाला घेऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्या व पुणे येथे स्थायिक झाल्या. धर्म व परंपरा यांच्या जोखडातून बालविधवांना मुक्त करण्याचा उद्देश समोर ठेवून त्यांनी पुण्यात ‘आर्य महिला समाज’ स्थापन केला. तसेच स्त्री शिक्षणाविषयी आग्रही भूमिका मांडण्यास त्यांनी सुरुवात केली..

‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिण्यामागची पाश्र्वभूमी ही अशी आहे. या पुस्तकातील हा एक उतारा पाहा-

‘‘आता पश्चिमेकडून पूर्वेकडे दृष्टी फिरवून पहा, काय काय पाहण्यास मिळते ते, ते काय तर भारतवर्षांतील सव्वीस कोटी प्रजा आणि त्या प्रजेची अवस्था! या देशात उद्योग कसा करावा व त्यापासून सुफल कसे उत्पन्न करून घ्यावे हे पुष्कळ लोकांस माहीत नाही, म्हटले तर अत्युक्ति होण्याचा संभव नाही, त्यांस प्रमाण देशी लोकांची अवस्था. या लोकांत साहस नाही, तेज नाही, उत्साह नाही, स्वाधीनता नाही, आणखी काय काय नाही म्हणून सांगू? खरोखर म्हटले असता चांगले असावे असे फारच थोडे आहे. ‘आहे’ या शब्दास जागा द्यावयाची असल्यास, कोठे? तर संगीत नाटके आहेत, पोटभर भाकरी न खाता कष्टाने जमवून नाच तमाशात खर्च करण्यास पैसा आहे.. आपल्या समाजातील एखादे मनुष्य चांगले देशहिताचे काम करू लागले, तर त्यास कोणत्या तरी कारणाने निंदा करून व त्याच्या विरुद्ध लोकांस उत्तेजित करून त्याचा उद्योग कोणत्याही रीतीने सिद्धीस न जाऊ देण्याची बुद्धी आहे. बुद्धीची अस्थिरता आहे. इत्यादी अशा प्रकारच्या ‘आहे’स जागा हजारो मिळतील. ही आमच्या दुर्भाग्याची भरती जी चढत चालली आहे, ती आहेच. हीस ओहोटी कधी लागणार ते एक ईश्वर जाणे.’’

बालविवाह, बालवैधव्य, एकत्र कुटुंबपद्धती, धार्मिक अपसमजुती यांच्यामुळे स्त्रियांना दु:खदैन्याला सामोरे जावे लागत असल्याचे रमाबाईंच्या ध्यानात आले. त्यामुळेच त्यांनी या पुस्तकात स्त्रीजीवनाच्या विविध बाजू विचारात घेऊन स्त्रीवर्गाला त्यांविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यासंबंधीचा हा उतारा पाहा-

‘‘दिवसभर शेजारच्या आयाबायांपाशी जाऊन आळसावत, जांभया देत पायावर पाय ठेवून रुद्रवाती, विष्णुवाती वगैरे वळीत, अमकीचा नवरा असा आहे, ती वाकडी चालते, अमकीचे नाक वाकडे, माझी सासू फार कजाग आहे, असल्या शुष्क गोष्टीत दिवस घालवू नका. एकमेकींशी मैत्रीने वागणे, व वेळप्रसंगी, परस्परांना साहाय्य करणे. हे प्रशंसनीय आहे, आपले काम नित्याचे आटोपून फावल्या वेळात, चांगल्या कामी मन न लावता रिकाम्या गोष्टी सांगत बसणे हे अगदी वाईट आहे.. मनुष्याचा स्वभाव असा आहे की, चांगले गुण त्यास लागणे फार कठीण पडते. पण दुसऱ्याचे वाईट गुण मात्र अगदी थोडय़ाशा वेळात जडतात. दु:सहवासांत राहिले असता आपला स्वभाव बिघडणार नाही, असा निश्चय असला, तरी तशा प्रकारच्या सहवासाच्या सावलीपाशीसुद्धा जाऊ नये. बाभळीच्या वनात एखादा चंदनवृक्ष असला आणि तेथे वणवा लागला; तर चंदनवृक्ष हा फार चांगला आहे, म्हणून काही वणव्याच्या हातून सुटका होणार नाही. काटेऱ्या झाडांबरोबर त्यासही जळून जावे लागेल.. स्वच्छ पाण्यात घाणेरडे, पाणी मिसळले तर ते तेव्हाच घाणेरडे होते, पण घाणेरडय़ाचे चांगले करण्यास फारच खटपट पडते..’’

हे पुस्तक लिहिल्यानंतर रमाबाईंनी इंग्रजी शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा बेत आखला. मात्र इथल्या मंडळींनी त्यांच्या परदेशगमनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तरीही रमाबाई इंग्लंडला जाण्यात यशस्वी झाल्या. तिथे गेल्यावर रमाबाईंनी या मंडळींच्या आक्षेपांना उत्तरे देणारे व प्रवासाचा अनुभव सांगणारे पत्र त्यांचे स्नेही स. पां. केळकर यांना पाठवले. ते केळकरांनी १८८३ साली पुस्तकरूपात प्रकाशित केले. त्याचे शीर्षक होते – ‘इंग्लंडचा प्रवास’. हे रमाबाईंचे दुसरे मराठी पुस्तक.

इंग्लंड येथील वास्तव्यात ख्रिस्ती धर्मातील समानता, अनुकंपा, करुणा पाहून त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. तेथे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. पुढे १८८६ मध्ये आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभासाठी त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेतील तीन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी तेथील शिक्षण व समाजव्यवस्थेचा अभ्यास केला. येथेच १८८७ मध्ये ‘द हाय कास्ट हिंदू वुमन’ हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाद्वारे रमाबाईंनी भारतातील स्त्रियांच्या स्थितीची अमेरिकी समाजाला माहिती दिली. येथे त्यांनी आपल्या नियोजित स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी मदतही मिळवली. आणि त्या १८८९ साली भारतात परतल्या. अमेरिकेतील या प्रवासाचा वृत्तांत सांगणारे ‘युनाइटेड् स्टेट्स्ची लोकस्थिति आणि प्रवासवृत्त’ हे त्यांचे पुस्तकही याच वर्षी प्रसिद्ध झाले. या पुस्तकात रमाबाईंच्या लेखनाने ललितगद्याचे स्वरूप धारण केले आहे. न्यूयॉर्कमधील हिमवृष्टीचे वर्णन करणारा पुस्तकातील पुढील उतारा पाहिला की त्याचा प्रत्यय येईल :

‘‘..त्यावर काही पांढरवट पदार्थाचा जाड लेप लागलेला असून त्या लेपात कोणी अतिसुंदर वेलबुट्टीदार चित्रविचित्र नक्षी काढली असल्यासारखे दिसून आले. हा काय चमत्कार आहे, म्हणून मी पुढे जाऊन पहाते तो रस्ता, घराची छते, खिडक्या, दारे वगैरे चांदण्यापेक्षा पांढऱ्या स्वच्छ तुषाराने आच्छादित झालेली दिसून आली. ह्य़ा तुषारवृष्टीचा वेग वाढवावा म्हणूनच की काय कोण जाणे, त्या दिवशी प्रचंड वारा वाहात होता. थंडी तर काय मी म्हणत होती. सकाळी न्याहरीच्या वेळी स्वयंपाकिणेने मला रोजच्याप्रमाणे प्यायला पेलाभर दूध आणून दिले; ते तोंडात घेऊन गिळण्यापूर्वी खडीसाखरेच्या खडय़ाप्रमाणे चावून खावे लागले! तुषार पडताना शब्द मुळीच होत नाही. कोणी उभे राहून बारीक सपीट चाळीत असता ते जसे हलकेच जमिनीवर पडते व खाली पडल्याचे कोणाला ऐकू येत नाही, त्याप्रमाणेच तुषारही नकळत पडतो. त्याचे कण आकाशातून खाली येतात तेव्हा ते पांढऱ्या जाईच्या फुलांच्या नाजूक पाकळ्यांसारखे नाचत, बागडत, पडत, गोंधळत मोठय़ा घाईने धावत येत असलेल्या अणुरेणु एवढाल्या आनंदी पऱ्यांप्रमाणे सुरेख दिसतात. काळ्या किंवा काळसर रंगाच्या कापडावर काही तुषार कण धरून पाहिले असता, त्यांच्या आकृती बहुत सुंदर व विचित्र आलेल्या दिसून येतात.. हे ज्याने पाहिले नाही त्याला सांगून कळावयाचे नाही. त्या सुंदर देखाव्याचे वर्णन करायाला एखादा कालिदास, शेक्सपिअर, किंवा साक्षात सरस्वती देवीच असती तर ते तीस साधले असते.’’

या पुस्तकांव्यतिरिक्त रमाबाईंनी काही धार्मिक स्वरूपाची पुस्तके व क्रमिक पुस्तकेही लिहिली. पुढील काळात रमाबाईंच्या साहित्याचे अभ्यासक व संग्राहक श्यामसुंदर आढाव यांच्यामुळे यातील बहुतांश लेखन अभ्यासकांना उपलब्ध झाले.

रमाबाईंच्या साहित्याची रसग्रहणात्मक मीमांसा करणारे छोटेखानी, पण महत्त्वाचे असे पुस्तक सिसिलिया काव्‍‌र्हालो यांनी लिहिले आहे. ‘पंडिता रमाबाई- व्यक्तित्व आणि साहित्य’ हे ते पुस्तक. ते आपण आवर्जून वाचावेच; शिवाय सरोजिनी वैद्य लिखित ‘पं. रमाबाईंच्या लेखनसृष्टीची काही वैशिष्टय़े’ हे पुस्तक, तसेच रमाबाईंच्या जीवनकार्याची माहिती देणारी प्रबोधनकार ठाकरे व तारा साठे यांनी लिहिलेली चरित्रेही वाचावीत.

संकलन : प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com

मराठीतील सर्व मराठी वळण ( Marathi-valan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pandita ramabai saraswati contribution in marathi language development