मराठवाड्यातील सार्वजनिक आयुष्य प्रखर जातजाणिवांनी विदीर्ण होत चाललंय. पण त्यातही चांगली बाब म्हणजे नजीकच्या काळात मुलांना बिकट आणि जटिल जगाला सामोरं जावं लागू नये म्हणून सुज्ञांची फळी येथे आणि राज्यभर सक्रिय झालीय. मुलांनी एकत्रपणे वाचावं- पाहावं-खेळावं यासाठी अनेक गट स्वतंत्रपणे राबतायत. सौहार्दता, सामंजस्य, साथ आणि संगत यांतून सर्वांनी आनंद घ्यावा हा त्यांचा हेतू. जातीच्या भिंती गळून पडाव्या यासाठी अक्षरप्रयत्न करणाऱ्या या प्रकल्पांची यशस्विता यापुढे पूर्णपणे पालकांच्या हाती असेल. नव्या पिढीच्या मन-मशागतीसाठी आपल्याला भवतालात पुस्तकांची दुकानं, वाचनालयं, कला दालनं, छोटी नाट्यगृहं आणि संग्रहालयं करता येणं शक्य आहे. नक्की परिस्थिती काय आहे आणि तिच्याशी लढणाऱ्यांचे अनुभव कोणते, याची चर्चा…
‘‘आबा कुठे?’’
‘‘भाषण ऐकायला’’
‘‘कुणाचं?’’
‘‘……..’’
‘‘का बरं?’’
‘‘अरे, तो फार मोठा माणूस आहे. अशांचं ऐकलं तर चार नव्या गोष्टी कळतात.’’
‘‘पण तो आपल्या जातीचा कुठंय?’’
‘‘अरे, विचार ऐकण्यात जात कशाला आणायची? चांगलं चांगलं ऐकत जावं. म्हणजे जग समजतं. आपण मोठे होतो.’’
‘‘तसलं काही नाही ब्वा! सगळे आपले आपले बघतात. आपण पण तसंच करावं. आम्ही जातीतलेच दोस्त करतो. खेळायला-डबा खायला- सगळ्याला…’’
लातुरातील सहा वर्षांच्या नातवाचे हे बोल ऐकून ऐंशी वर्षांचे आबा जागीच खिळून राहिले. लातुरातील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सांगतात, ‘‘शाळेत दाखल होणाऱ्या मुलांच्या नव्या ओळखी होतात. शाळेत भेट, खेळ आणि डबा यांतून मैत्री होते. मुलं एकमेकांच्या घरी खेळायला जाऊ लागतात. पूर्वी मुलांच्या आया, आडनाव, नातेवाईक तसेच घरातील देव यांची चौकशी करून ‘जातीचा’ अंदाज घेत असत. परंतु आता शाळेत ओळख करून घेतानाच मुलं एकमेकांची ‘जात’ थेट विचारत आहेत. धर्मभेद आणि जातपातीमुळेच आपण मागे पडतोय, असलं काही सांगत जाऊ नका. पुस्तकातलंच शिकवा. अशी तंबी देतात.’’
बालपणापासून घरातील तसबिरी, मोठ्यांच्या गप्पा, पालकांच्या मोबाइलवरील प्रोफाइल फोटो आणि मेसेज दिसू लागतात. मुले त्यांच्यापरीने चर्चांचे अर्थ लावत जातात. त्यांना ‘मी कोण?’ ही ओळख होत जाते. कुमार वयात मोबाइलवरील जातीचे कट्टे, प्रत्यक्ष भेटी, बैठका, मेळावे आणि मिरवणुका यांतून ‘आपण’ आणि ‘ते’ हे समजू लागतं. समाज म्हणजे ‘आपला समाज’ आपली घरं किती? ‘आपले प्रेरणास्थान कोण?’ अशी माहिती दणादण मिळत जाते. ‘मी कोणाचा?’ हा प्रश्नच निकालात निघतो. असं सामाजिक अभिसरण लातूर-बीडच नाही तर पूर्ण मराठवाडाभर होत आहे.
मराठवाड्यात १९७०च्या दशकात ‘विद्यार्थी’ ही एक प्रजाती होती. त्यांना जातीची जाणीव नव्हती अशातला भाग नाही. कित्येक वेळा जातीचा उल्लेख करून टिंगलटवाळी करणे, तीर्थरूपांच्या नावाने हाक मारणे, असे प्रकार सर्रास चालत. मात्र त्यात विखार नसे. खेळणे-बागडणे-खाणेपिणे-एका खोलीत राहणे- अडीअडचणीला धावून जाणे, हे सर्व काही एकत्र चाले. सर्व विद्यार्थी एकजुटीने बेकारी, महागाई, फी वाढ आणि शेतमालाचा भाव अशा प्रश्नांवर आंदोलन करत. आर्थिक विकासात डावललेल्या मराठवाड्याचा अनुशेष किती? याचा अभ्यास करून सरकारला जाब विचारत. ते, सार्वजनिक व्यासपीठांवरून तलाठी ते जिल्हाधिकारी, सरपंच ते मंत्री यांना मूलभूत प्रश्नांनी भंडावून सोडत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना विद्यार्थ्यांचा धाक होता.
विकास आंदोलनांतील मागण्यांमुळे १९८० पासून सरकारी व खाजगी नोकऱ्यांत ‘स्थानिकता’ महत्त्वाची झाली. ‘बाहेरचे’ नकोच हा बाणा नेत्यांच्या पथ्यावरच पडणारा होता. त्यांनी मतदारसंघात ‘विकास कार्य’ करण्याकरिता स्वत:ची माणसे गोळा केली. काळाच्या ओघात परिवारातील सदस्यांनी ‘विकास’ ताब्यात घेतला. त्यांच्या अनेक ‘बहुविध कार्यासाठी’ लागणारे सहकारी रस्त्यारस्त्यांवरील मोठमोठ्या पोस्टरातून झळकू लागले. त्यांचे ‘ग्रुप’ आणि त्यांच्या युत्या-आघाड्या यांच्या परस्परावलंबनातून संघटना बलवान झाल्या. त्यांच्या वर्तुळातील ‘मित्रमंडळ’ गब्बर होत गेले.
मराठवाड्याच्या ‘विकासा’त साखर, कापड व तेल उद्याोग सुरू झाले आणि क्रमश: बंद पडत गेले. आज मराठवाड्यातील ७५ साखर कारखान्यांपैकी टिकू शकण्याची क्षमता केवळ १० कारखान्यांमध्ये आहे. इतर अत्यवस्थ कारखाने अनुदानांच्या प्राणवायूवर घटका मोजत आहेत. ठिकठिकाणी अब्जावधींच्या गुंतवणुकीच्या समारंभी घोषणा झाल्या. औद्याोगिक वसाहतींत जागा मिळवून ‘उद्याोग’ स्तब्ध झाले. परिणामी मराठवाड्याच्या ‘विकासा’त अकुशल आणि अर्धकुशल तरुणांना सामावून घेणारं क्षेत्र उरले नाही.
शेतीत बियाणं ते काढणी, सगळे भाव दणकून वाढत गेले. शेतमालाचे भाव गटांगळ्या खाऊ लागले. २०१० नंतर हवामान आपत्ती आणि शेतीतील तोटा यांमुळे दररोज तीन-चार शेतकरी स्वत:ची हत्या करू लागले. खेड्यांतील आणि शेतीतील तरुणांचे विवाह होत नाहीत. त्यांची सर्व बाजूंनी होणारी वगळणूक (मार्जिनलायझेशन) हेच त्यांच्या क्रोधामागील खरं कारण आहे. जातीची संघटना हाच या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे, असा तरुणांचा समज करून दिला जात आहे. या ‘आयडेंटिटी क्रायसिस’ मधून सर्व जातींच्या संघटना तयार होत गेल्या. पाहता पाहाता ही शृंखला अभिक्रिया झाली. असे ‘एकेक गठ्ठे खेचावया’ अक्षय अर्थसहाय्य होत राहिले. कुशल व्यावसायिकांना जातीचा हक्काचा ‘मतदारसंघ’ लाभदायी होता. बैठका, उत्सव आणि मिरवणुका यांतील उलाढाल वाढत गेली. सगळ्या जाती ‘आपापल्या समाजा’च्या आचारसंहितेत बंदिस्त होत गेल्या. स्वजातप्रेम आणि परजातद्वेष एकत्रच पुढे सरसावले. संघटनेत सहभागी न होणाऱ्यांना तत्काळ समक्ष आणि ‘व्हॉट्सअॅपी’ शिव्यांची लाखोली मिळू लागली. विचारांनी उदारमतवादी असणाऱ्यांना बहिष्कृत करण्याच्या धमक्या मिळाल्या. या धास्तीने सर्व ज्ञानशाखेतील उच्चशिक्षित तसेच उच्चपदस्थसुद्धा ‘जातीची निष्ठा’दाखवू लागले.
‘सर्व काही, स्वजातीयांसाठीच’ ढिसाळ कारभार ते भ्रष्टाचार, अपघात ते बलात्कार-खून, कोणत्याही घटनेआधी जात पाहून घ्यावी. त्यानुसार सुटका, मदत, तात्पुरते पुनर्वसन अथवा धिक्काराची प्रत ठरवावी. ‘गुन्हेगार असला तरी त्याला सोडवा आणि वाढवा,’ असं विशाल मन, गुन्हा करणारा परजातीय आहे हे ध्यानात येताच त्याला ठेचण्यास तयार होतात.
दरम्यान मराठवाड्यातील सार्वजनिक आयुष्य शतश: विदीर्ण होत चाललंय. उत्पादन, सेवा वा व्यापार असं काही न करता दलाल आणि रक्षक (स्वत:पासून इतरांना सुरक्षितता देणारे) मोठमोठे गुत्ते आणि पदं मिळवू लागले. त्यांना शिक्षण ते राजकारण कोठेही जाण्याचे ‘शॉर्ट कट’ सापडतात. हे पाहताच या ‘समृद्धी महामार्गा’वर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्या पंथीयांची रस्त्यांवर आणि सार्वजनिक कार्यक्रमांत धांगडधिंगा आणि धुडगुस, उर्मटपणा आणि उन्मत्तता दिसू लागली. नियम आणि कायदे हे सामान्य पामरांसाठी आहेत. त्यांनीच ते पाळावेत, हा त्यांचा बाणा दाखवणे ही जगरहाटी झाली. शक्य तितक्यांना बसवून, कर्कश आवाज करत, दिसेल त्या दिशेने वाहने हाकावीत. मन मानेल तिथे तलवारीने अगडबंब केक कापत सर्वाना फासणारे ‘रील’ करावेत. आसमंतात कानफोडू ध्वनीलहरी सोडाव्यात. इतरेजनांनी पावलोपावली दहशतीच्या सावटाखाली वाट काढावी. ‘घात आणि अपघात, बीभत्सता आणि ओंगळता हेच खरे वास्तव’ अशा सामाजिक भवतालात बालमनावर कसे संस्कार होत असतील?
सदासर्वदा सर्व व्यवहारांत ‘पाहिजे जातीचे’ हे लोण शाळकरी मुलांपर्यंत आणणाऱ्या या ‘प्रबोधन’ प्रक्रियेला संज्ञा शोधली पाहिजे. सार्वजनिक कार्यक्रम ‘कोणी’ आयोजित केला आहे यावरून ‘कोण’ उपस्थित राहील, हे निश्चित होते. जातीजातींमधला संवाद क्षीण होत चालला आहे. त्यांना एकत्र आणणारे उपक्रम नाहीत. गावांतील वा शहरांतील सर्व क्षेत्रांतील अनुभवी लोकांना याची जाणीव आहे. अजूनही सर्व जातींशी संवाद असणाऱ्या काही ज्येष्ठ व्यक्ती आणि नेते शिल्लक आहेत. त्यांनी मध्यस्थी केल्यास बरेच तंटे मिटू शकतात. तसं केल्यास स्वजातीय तरुणांचा रोष परवडणार नाही, या शंकेने ते विश्वामित्री पवित्रा धारण करून बसले आहेत. अनेक वृद्ध स्व-गृहातच उदारमतवादाची नालस्ती सहन केल्याने परिस्थितीस शरण जात आहेत. असं बाळकडू घेत मोठं होणाऱ्या मुलांचं सार्वजनिक आयुष्य कसं असेल?
अणदूर येथील निवृत्त शिक्षिका म्हणतात, ‘‘पालकांची समज कशी वाढवावी? हा अत्यंत अवघड बीजगणिती प्रश्न आहे. ते, बालवयातच ‘हे कर’ आणि ‘हे करू नको’ या आज्ञांचा मारा करत बालकांचं निरागसपण कोमेजून टाकत आहेत. मुलांवर अपेक्षांचा बोजा टाकणारे पालक हेच पाल्यांचे शत्रू होत आहेत. तणाव सहन न झाल्याने दहावी आणि बारावीत आयुष्य संपवून टाकणारी मुलं वाढत आहेत. या दुर्घटनांचं मूळ बालवयातच सापडेल.’’
मराठवाड्यातील हे सामाजिक पर्यावरण पाहताना आपली सार्वजनिक शहाणीव हद्दपार तर होत नाही ना? अशी भीती वाटते. तेव्हा शैलेन्द्र यांनी १९५९ मध्ये लिहिलेल्या गीताच्या ओळी समोर येतात.
‘ऩफरत है निगाहों में वहशत (असभ्यता) है निगाहों में
ये कैसा ज़हर फैला दुनिया की हवाओं में
प्यार की बस्तियाँ ़खाक होने लगीं
अब किसी को किसी पर भरोसा नहीं’
नये दौर मे लिखेंगे, मिलकर नयी कहानी!
केवळ मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील बालकांच्या विश्वातील वैविध्यपूर्ण प्रदूषण नष्ट व्हावे. त्यांना ‘सुंदर ही दुसरी दुनिया’ अनुभवता यावी, यासाठीही अनेक प्रयत्न होत आहेत.
निसर्गात विविधता असूनही त्यात कशी गंमत आहे? त्यात कसं सौदर्य आहे? सगळे रंग, स्वर, धान्य, भाज्या, फळं, पक्षी आणि प्राणी महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यात सलोखा कसा आहे? खरा आनंद कसा सहज आणि मोफत असतो? फलटणच्या ‘कमलाबाई निंबकर बालभवन’ शाळेत याची समज वाढवणारे कल्पक उपक्रम घेतले जात आहेत.
आपल्या देशात जात-धर्म-वर्ण यांना ओलांडून मुलांना दत्तक घेण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. ‘पालकनीती’ मासिकाच्या पुढाकारामुळे दत्तक मुलं आणि त्यांच्या पालकांनी जाहीरपणे त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली. त्यातील निवडक ‘पालकनीती’त प्रसिद्ध झाले. दत्तक मुलांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना वाचून अनेक मुलं कळवळली. आपआपल्या शाळांत त्या अनुभवांचं अभिवाचन करू लागली. ‘दिसण्यावरून तोंडावर नावं ठेवणारी मोठी माणसं क्रूर असतात. आपण आपलं अप्रतिम जग निर्माण करू या.’ असंही ठरवू लागली.
पुण्यातील ‘कुल्फी’ हे त्रैमासिक, अप्रतिम चित्रं आणि अत्यल्प शब्द यांतून कथा आणि कविता सादर करत आहे. त्यात जुने-नवे, साहित्यिक- चित्रकार, वास्तुशिल्पी-शिल्पकार, अभिनेते-दिग्दर्शक नव्या कल्पनांनी मुलांना सहभागी करून घेत आहेत. त्याचे संपादक ऋषीकेश दाभोलकर यांनी आठ दिवस फलटण ते सासवड ‘गोष्टदिंडी’ नेली. खेडोपाड्यांतील शाळा, आश्रमशाळा आणि ऊसतोड कामगार वस्त्यांतील चार हजार मुलांना गोष्टी सांगितल्या, गप्पा मारल्या. शब्दच नसलेली देखणी चित्रं पुस्तकं, थक्क करणाऱ्या आकारांची पुस्तकं दाखवली. त्यांनी मुलांना सामील करून घेणारं ‘अटकमटक’ हे झकास संकेतस्थळं निर्माण केलं आहे.
अंबेजोगाईतील अभिजित जोंधळे हे वाचनप्रसारासाठी दहा वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी शंभर शाळांमध्ये शंभर पुस्तकांची एक पेटी पोहोचवली आहे. त्यातून बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांतील वीस हजार मुलांना वाचनाची गोडी लागली. गेल्या सहा वर्षांपासून लातूरमधील राहुल लोंढे हे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात सर्व प्रकाशकांची पुस्तकं मांडतात. लोक तिकडे डोकावतात आणि नकळत खरेदी करतात. त्यांनी मराठवाडाभर हिंडून दोन लाख लोकांपर्यंत पुस्तकं नेली. हिंगोलीतील अण्णा जगताप, निसर्गाची आवड वाढविण्यासाठी दर शनिवारी ऑनलाइन वर्ग भरवतात. ते रानभाज्यांची माहिती देतात. तसंच शेतकऱ्यांकडूनच फळे-फुले-भाज्या घेण्याची मोहीम राबवतात.
पालघरमधील ‘क्वेस्ट’ ही संस्था दहा वर्षांपासून लहान वयातच वाचनाची गोडी लागावी यासाठी झटत आहे. ही संस्था तरुणांना अभिनयातून गोष्ट सादर करण्याचं प्रशिक्षण देते. मग ते तरुण, ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन शिक्षणशास्त्रातील संशोधनानुसार अत्यल्प शब्दांत गोष्ट अभिव्यक्त करतात. फुलपाखरू, कोंबडा, बकरी आणि गाय होऊन त्यांचे हावभाव आणि त्यांच्या हालचाली नेमकेपणाने दाखवतात. एखादा अवयव नसणाऱ्यांची इतर ज्ञानेंद्रिये कशी तीक्ष्ण असतात, हे व्यक्त करतात. परभाषांतील अप्रतिम गोष्टींना नाट्यरूप देतात. मुलं मग्न होऊन त्यात गुंतून जातात. त्यांचं कुतूहल वाढतं. मुलांची क्षितिजं आपसूकच रुंदावत जातात. या तरुणांनी महाराष्ट्रातील तीनशे शाळांत जाऊन सुमारे लाखभर मुलांपर्यंत अशी ‘गोष्टरंग’ पोहोचवली आहे.
‘प्रथम बुक्स’ या विना नफा काम करणाऱ्या संस्थेचं संकेतस्थळ म्हणजे गोष्टींचा खजिनाच! गोष्टींच्या जगात कोणालाही कधीही जाऊन कोणत्याही भाषेतील पुस्तक वाचता यावं, अशी त्यांची सोय आहे. तिथं गोष्टींबद्दल सर्व काही आहे. तिथे गेल्यास विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी ती कशी वाचावी? ती कशी सांगावी? आणि ती कशी लिहावी? यांपैकी जे हवं ते घेता येतं. त्यांनी ज्येष्ठ आणि तरुण लेखकांना सोबत घेत दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यामुळे ३२ भारतीय भाषांतील ७,००० पुस्तकं ४०,००० हून अधिक वाचनालयात पोहोचवली आहेत. सुमारे ५ कोटी मुलं वाचनात दंग झाली आहेत. तर ६,००० वाचन शिलेदार घडले आहेत. काही संस्था तरुणांना सोबत घेऊन ब्रेल लिपीत पुस्तकं तयार करत आहेत. अनेकजण ऐकता येणारी पुस्तकांची निर्मिती करत आहेत.
मुलांना काल्पनिक गोष्टी आवडतात. त्याचवेळी त्यांनी अनेक विषयांतील वास्तव आणि तथ्य मांडणारं साहित्यदेखील वाचावं. नागपूरमधील प्राजक्ता- अतुल यांनी मराठीतील ‘तथ्यज (नॉन फिक्शन)’ पुस्तकांची यादी तयार केली आहे. इतर भाषांमधील उत्तम पुस्तकांचा मराठीत अनुवाद व्हावा, असे प्रयत्न ते करत आहेत.
पौगंडावस्थेतील मनोवस्था अनेक गुंतागुंतीचे तणाव निर्माण करतात. त्यावेळी निकोप नातेसंबंध कसे असू शकतात? याचं भान आणून देण्यासाठी डॉ. मोहन देस यांचा गट ‘रिलेशानी’ अनेक कार्यशाळा आयोजित करतात.
आभा भागवत मुलांना सोबत घेऊन शाळेच्या भिंती आणि सार्वजनिक जागांवर चित्रं रंगवतात. अनेक विषयांतील तज्ज्ञ मूलभूत संकल्पना सोप्या रीतीने उलगडून दाखवत आहेत. सगळे विषय एकत्रच असतात. कोणताही विषय सुटा नाही. संगीत, चित्र, नाट्य, नृत्य या कला आणि भाषा, विज्ञान, गणित, इतिहास- भूगोल हे विषय हसतखेळत मजा करत समजावून घेता येतात. माधुरी पुरंदरे, अनघा कुसुम, विवेक माँटेरिओ, गीता महाशब्दे आदी अनुभवी मंडळी तरुणांना सोबत घेऊन अशा कार्यशाळा घेत आहेत.
काही गट बिया, गळून पडलेली पानं आणि काड्या-काटक्यांतून पक्षी-प्राणी साकारणे. प्लास्टिक कचऱ्यातून सुंदर वस्तू तयार करणे यांत गुंतले आहेत. तर काही जण पक्षी निरीक्षणाचा छंद वाढवत आहेत. उत्कृष्ट छायाचित्रं आणि व्हिडीओ दाखवून पक्ष्यांची ओळख वाढवत आहेत.
अनेक शहरांत वृक्ष लागवड करण्यासाठी अनेक गट सक्रिय झाले आहेत. ते बिया आणि रोपं गोळा करून ओसाड टेकड्यांवर देवराया तयार करत आहेत. कोणी किल्ल्यांचा परिसर स्वच्छ करत आहेत. काही जण प्राचीन बारवा व विहिरी स्वच्छ करून त्यांचं सौंदर्य दाखवत आहेत.
अशा प्रयत्नांतून हजारो मुलं वेगवेगळ्या वाटांनी निघाली आहेत. (राज्यभर होत असलेल्या अशा सर्व प्रयत्नांची माहिती असल्याचा दावा कोणालाही करता येणार नाही. हे उल्लेख वानगीदाखल केले आहेत. जिज्ञासू मुलं व पालक या प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधतीलच.)
हे सर्व प्रयत्न कोणत्याही मदतीची वाट न पाहता, आतल्या ओढीने चालले आहेत. ‘पुष्पगुच्छ-हार नको. पुस्तकं द्या.’ एवढ्यावर न थांबता अशा प्रयत्नांसोबत जावं, असं किती जणांना वाटेल? आईस्क्रीम आणि पिझ्झावर हजारांनी ओतणारे हात इकडेही ढिले होतील? ‘इव्हेंट’ आणि ‘रोड शो’ यांतील गुंतवणुकीच्या अर्धा टक्का वळवू इच्छिणारे दानशूर निघतील? असं काही झालं तर मराठी भाषा आणि संस्कृती त्यांना ‘थँक्यू’ म्हणेल.
अशा प्रकल्पांना पाठबळ मिळालं तर महाराष्ट्र कात टाकू शकेल मुलांची सर्जनशीलता आणि कल्पकता आणखी भरारी घेईल. उदा. मराठवाड्यातील संतांची नावं आणि गावं किती जण सांगू शकतील? गोरोबा आणि जनाबाईंचा एखादा अभंग आठवणारा तरुण सापडेल का? ‘पायी चालून भेट द्या. क्यूआर कोड वर जाऊन माहिती ऐका व पाहा.’ अशी व्यवस्था करता येणं सहज शक्य आहे. त्यातून इतिहास सांगणारी संग्रहालयं आणि मार्गदर्शक तयार होतील. पुस्तकं आणि व्हिडीओ निघतील. सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण देऊन अनेक व्यवसाय बहरतील. आपल्याला पुस्तकांची दुकानं, कलादालनं, छोटी नाट्यगृहं आणि संग्रहालयं करता येणं अशक्य आहे? आपल्या घरासमोरचा रस्ता, वाहनतळ आणखी काही सार्वजनिक जागा स्वच्छ व देखण्या करता येणं अवघड आहे? नष्ट केलेली तळी- तलाव, उद्यानं-बागा यांचं नवनिर्माण कठीण आहे?
सध्या आणि येत्या काळात मुलांना बिकट आणि जटिल जगाला सामोरं जावं लागणार आहे, याची जाणीव सुज्ञांना होत आहे. मुलांनी एकत्रपणे वाचावं- पाहावं-खेळावं. नालस्ती-तुच्छता, ईर्षा-स्पर्धा नसेल तर त्यांच्यावर ताण-दडपणदेखील येत नाही, याचा अनुभव घ्यावा. सौहार्दता, सामंजस्य, साथ आणि संगत यातून सर्वांनी मजा करावी. अशा पोषक आणि उमद्या वातावरणासाठी हे सारे अट्टहास आहेत. या प्रयत्नांना साथ मिळाली नाही तर कोणत्या घरात कुठल्या पद्धतीचा टाइम बॉम्ब फुटेल, हे कोणालाही सांगता येणार नाही. परंतु या आनंदी प्रकल्पांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यास, हे छान छोटे पालकांवर योग्य ते संस्कार करतील. घरांना वळण लावत, शैलेन्द्र यांच्याच शब्दांत म्हणतील-
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है…
गोष्टीतील पात्रं, प्रसंग आणि भावना याच्या दृश्य अनुभवामुळे गोष्टीचं सादरीकरण झाल्यानंतर मुलं गोष्टीचं पुस्तक मागून घेतात, ते वाचण्याचा प्रयत्न करतात. एकूण गोष्टीबद्दल, त्यातील पात्रांबद्दल, प्रसंगांबद्दल ते त्यांच्या भावना बोलून आणि लिहून दाखवण्याचा प्रयत्न करतात. सादरीकरणानंतर त्यांच्यासोबत होणाऱ्या संवादात ते त्यांचे अनुभव, कल्पना आणि विचार खुलेपणाने मांडण्याचा प्रयत्न करतात. काही मुलं स्वत:हून गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करतात. सादरीकरणातील काही दृश्यं स्वत: करून बघण्यासाठीही प्रेरित होतात. उदाहरणार्थ, ‘गोष्टरंग’ टीमने ‘मी तर मांजर आहे’ ही गोष्ट सादर केल्यानंतर मुलांना विचारलं की, आता गोष्टीतली मुलगी कोण होणार, तिची आई कोण होणार, तर लाजत लाजत काही मुलं पुढे आली आणि त्यांनी गोष्टीतले संवाद जसे आम्ही सादर केले तसेच बोलण्याचा प्रयत्न केला. ‘गोष्टरंग’ टीम नाटक सादर करून गेल्यानंतरही काही ठिकाणचे शिक्षक आवर्जून कळवतात की, मुलं अजूनही गोष्टीची पुस्तकं आवडीने वाचायला मागत आहेत. – निनाद उचले,क्वेस्ट’ संस्था
वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आणि उपक्रमाच्या निमित्ताने अंबेजोगाई आणि परिसरातील शाळांमध्ये मी जेव्हा जायचो, तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ग्रंथालय व प्रयोगशाळांची दूरवस्था आणि तितकीच चिंताजनक गोष्ट म्हणजे याकडे संस्था, शाळा आणि पालकांचेही अक्षम्य दुर्लक्ष… यावर काय करता येईल? असा विचार करत असताना ‘शब्दोत्सव’ दिवाळी अंकातील मुलाखतीच्या निमित्ताने माझी विनायक रानडे यांच्याशी भेट झाली. त्यांचा पुस्तक पेटी उपक्रम समजून घेताना असंच काहीतरी शालेय विद्यार्थ्यांसाठी करावं असं मला वाटलं. यातूनच पुस्तकं मुलांच्या हाती, पुस्तक पेटी उपक्रमाची सुरुवात झाली. गेल्या १० वर्षांत हा उपक्रम आंबेजोगाई परिसरात, बीड जिल्ह्यात आणि आता बीड जिल्ह्याबाहेर जातो आहे. पुस्तक पेटी सहा ते आठ महिने शाळांकडे राहते व परत येते. तीच पेटी दुसऱ्या शाळेला दिली जाते असं फिरत्या ग्रंथालयासारखं या उपक्रमाचं स्वरूप आहे. – अभिजीत जोंधळे, फिरत्या ग्रंथालयाचे प्रमुख
‘रिलेशानी’ म्हणजे शानदार रिलेशनशिप. मोठी होणारी मुलं नुसती वाढत नाहीत. त्यांच्यात नुसते बदल होत नसतात. त्यांचा वेगाने विकास होत असतो. आनंद, कधी जबाबदारी, कधी नाराजी, अस्वस्थता, मिळालेलं स्वातंत्र्य, अपमान, अपयश, करिअर, स्वप्ने, टेन्शन, स्वप्रतिमा, सौंदर्य, कधी संताप तर कधी सैरभैर होणं, मैत्री जुळणं, तुटणं, जीव लागणं, आकर्षण, प्रेम, विकासणाऱ्या शरीराची नवी ओळख, लैंगिकतेची चाहूल आणि तिचे बरे वाईट आविष्कार, काही वाईट अनुभव, सोशल मीडिया, पॉर्न, मोबाइल. असंही खूप काही सुरू असतं. ‘रिलेशानी’त नाटकं गाणी गोष्टी चित्रं अनुभव कथन आणि घमासान चर्चा असं खूप काही असतं. उपदेश नसतो, त्यामुळे मुलं जाम खश असतात. मुलं एकूण शांत होतात. अभ्यास नीट होऊ लागतो, पालकांशी, शिक्षकांशी, मित्रमैत्रिणींशी नातं चांगलं होऊ लागतं. विविध स्तरांवरच्या मुलामुलींच्या गरजा अर्थात वेगळ्या असतात. हे ध्यानात ठेवून रिलेशानीची रचना केली जाते. – डॉ. मोहन देस, ‘रिलेशानी’ संकल्पनेचे प्रमुख
सहभाग भित्तिचित्रं ही समाजाला बांधून ठेवणारी आणि चित्रकलेचा मोकळा अनुभव देणारी सुंदर संकल्पना आहे. कागदावर तुम्ही चित्रं काढू शकत असाल किंवा नसाल, तरी भित्तिचित्रात तुम्हाला कसं सामावून घ्यायचं हे चित्र मार्गदर्शकाचं कौशल्य आहे. यात लहान मुलं, मोठी माणसं, विशेष गरजा असणारी मुलंमुली, शहरी, ग्रामीण, देशीविदेशी असे सर्वजण सहज सहभागी होतात. इथे सगळे समान असतात. ज्याला जे येतं ते चित्रात कसं सामावून घेता येईल असा प्रयत्न असतो. अशा चित्रकृतींतून आपण माणूस म्हणून सगळे सारखे आहोत आणि एकत्र येऊन खूप मोठं काम कमी वेळात आणि जास्त प्रेमाने पूर्ण करू शकतो हे सिद्ध होतं. सामान्य माणूस भित्तिचित्राचा भाग झाल्याने ते चित्र, ती जागा यांच्याशी सर्व सहभागींचा एक बंध तयार होतो. आपल्या छोट्याशा सहभागाने चित्र सुंदर झाल्याने आत्मविश्वास वाढतो. यातून एकमेकांना सामावून घेण्याची, एकमेकांबरोबर विनातक्रार काम करण्याची मानसिकता रुजते. – आभा भागवत, भित्तिचित्राची संकल्पना