पंचवीसेक वर्षांच्या वाटचालीत ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक-लेखक भानू काळे यांना ज्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभला त्यांची ओळख म्हणजे ‘पोर्टफोलिओ’ हे पुस्तक होय.  या व्यक्ती समाजमनावर आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणाऱ्या आहेत.  ही माणसे  काहीएक ध्येयासक्तीने झपाटलेली आहेत. अशा व्यक्तींमध्ये ताजमहाल मुळात हिंदू मंदिर होते, हा सिद्धान्त मांडण्यासाठी आयुष्यभर झटलेले पु. ना. ओक आहेत, तसेच ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ आणि ‘स्नेहमंदिर’चे अध्वर्यु रामकृष्ण नायक  आहेत, महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत किर्लोस्कर कारखान्यांनी जसे योगदान दिले,  तसेच योगदान महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीतही देणारे आणि आधुनिक महाराष्ट्राचा ध्यास मनी धरणारे मुकुंदराव किर्लोस्कर आहेत. त्याचबरोबर- ‘मन थोडे ओले करून/ आतून हिरवे हिरवे व्हावे/ मन थोडे रसाळ करून/ आतून मधुर मधुर व्हावे’ अशी हळुवार कविता लिहिणाऱ्या दत्ता हलसगीकर यांच्या कवित्वाचीही ओळख लेखकाने करून दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अविरत झटणारे नरेंद्र दाभोलकर यांची ओळख करून देताना दाभोलकरांनी ‘साधना’ साप्ताहिकाला कसा आकार दिला; तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे, विवेकवाद शिकविण्याचे कार्य आहे आणि दाभोलकरांनी ते कसे मोठय़ा कष्टाने आणि जिद्दीने पुढे नेले याचे विवेचनही एका लेखात आहे. भानू काळे हे दाभोलकरांची ओळख ‘देव न मानणारा देवमाणूस’ अशी करून देतात. व्रतस्थ संपादक राम पटवर्धन यांनी ‘मौज’ची धुरा कशी समर्थपणे सांभाळली, तसेच त्यांची गुणवैशिष्टय़े नमूद करताना त्यांच्या स्वभावाचे दर्शनही या पुस्तकात घडते. त्याचप्रमाणे रवीन्द्रनाथ टागोर, जे. आर. डी. टाटा, आनंद यादव, वि. ग. कानिटकर,  गिरीश प्रभुणे, लक्ष्मण लोंढे, यास्मिन शेख अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांविषयी लेखकाने स्नेहाद्र्र भावनेने लिहिले आहे. ही व्यक्तिचित्रे वाचकाच्या मनावर ठसा उमटवून जातात.

‘पोर्टफोलिओ’- भानू काळे, उन्मेष प्रकाशन,  पृष्ठे- २०९, मूल्य- २५० रुपये.

गुंतवणूक करा सहज-सोपी!

अरविंद परांजपे यांचे ‘मंत्र गुंतवणुकीचा’ हे पुस्तक आर्थिक गुंतवणुकीसाठीचा उत्तम मार्गदर्शक आहे. अनेकांना गुंतवणुकीच्या किचकट संकल्पना नीटशा कळत नाहीत. अशांना हे पुस्तक साध्या-सोप्या भाषेत गुंतवणुकीचे मार्ग सांगतं. अर्थनियोजन, आर्थिक उद्दिष्टे, पीपीएफ, इक्विटी शेअर्स, शेअर्स खरेदीची सूत्रे, इक्विटी शेअर्समधून संपत्ती निर्माण कशी करता येईल याबद्दलची माहिती यात आहे. यातून शेअर्ससंदर्भातील सामान्यांची भीती दूर होईल. पीपीएफविषयीची माहिती ‘बहुगुणी पीपीएफ’ या प्रकरणात मिळते. निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांची माहितीही यात आहे. म्युच्युअल फंडांविषयी सामान्यांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘ओळख म्युच्युअल फंडांची’मध्ये मिळतात. त्याचप्रमाणे एसआयपी, सोने व स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक, निवृत्तीसाठी अर्थनियोजन कसे करावे, त्यासाठी गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, विमा योजनांमधील गुंतवणूक, मृत्युपत्र आणि नामांकन असे अनेक विषय या पुस्तकात हाताळले आहेत.

‘मंत्र गुंतवणुकीचा’- अरविंद परांजपे, राजहंस प्रकाशन, पृष्ठे- २०९,  मूल्य- २८० ६