पंचवीसेक वर्षांच्या वाटचालीत ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक-लेखक भानू काळे यांना ज्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभला त्यांची ओळख म्हणजे ‘पोर्टफोलिओ’ हे पुस्तक होय.  या व्यक्ती समाजमनावर आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणाऱ्या आहेत.  ही माणसे  काहीएक ध्येयासक्तीने झपाटलेली आहेत. अशा व्यक्तींमध्ये ताजमहाल मुळात हिंदू मंदिर होते, हा सिद्धान्त मांडण्यासाठी आयुष्यभर झटलेले पु. ना. ओक आहेत, तसेच ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ आणि ‘स्नेहमंदिर’चे अध्वर्यु रामकृष्ण नायक  आहेत, महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत किर्लोस्कर कारखान्यांनी जसे योगदान दिले,  तसेच योगदान महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीतही देणारे आणि आधुनिक महाराष्ट्राचा ध्यास मनी धरणारे मुकुंदराव किर्लोस्कर आहेत. त्याचबरोबर- ‘मन थोडे ओले करून/ आतून हिरवे हिरवे व्हावे/ मन थोडे रसाळ करून/ आतून मधुर मधुर व्हावे’ अशी हळुवार कविता लिहिणाऱ्या दत्ता हलसगीकर यांच्या कवित्वाचीही ओळख लेखकाने करून दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अविरत झटणारे नरेंद्र दाभोलकर यांची ओळख करून देताना दाभोलकरांनी ‘साधना’ साप्ताहिकाला कसा आकार दिला; तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे, विवेकवाद शिकविण्याचे कार्य आहे आणि दाभोलकरांनी ते कसे मोठय़ा कष्टाने आणि जिद्दीने पुढे नेले याचे विवेचनही एका लेखात आहे. भानू काळे हे दाभोलकरांची ओळख ‘देव न मानणारा देवमाणूस’ अशी करून देतात. व्रतस्थ संपादक राम पटवर्धन यांनी ‘मौज’ची धुरा कशी समर्थपणे सांभाळली, तसेच त्यांची गुणवैशिष्टय़े नमूद करताना त्यांच्या स्वभावाचे दर्शनही या पुस्तकात घडते. त्याचप्रमाणे रवीन्द्रनाथ टागोर, जे. आर. डी. टाटा, आनंद यादव, वि. ग. कानिटकर,  गिरीश प्रभुणे, लक्ष्मण लोंढे, यास्मिन शेख अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांविषयी लेखकाने स्नेहाद्र्र भावनेने लिहिले आहे. ही व्यक्तिचित्रे वाचकाच्या मनावर ठसा उमटवून जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पोर्टफोलिओ’- भानू काळे, उन्मेष प्रकाशन,  पृष्ठे- २०९, मूल्य- २५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi book review dakhal dd70
First published on: 24-01-2021 at 02:37 IST