‘लोकरंग’ (२१ जानेवारी) मधील ‘आठवणींचा सराफा’ या सदरातील स्वानंद किरकिरे यांचा ‘बास.. बाबा गोरे’ हा लेख वाचला. या लेखात अतिशय सुंदर असे व्यक्तिचित्रण वाचायला मिळाले. बाबा गोरेंच्या लकबी, त्यांची ‘बास’ म्हणण्याची पद्धत, तसेच बाबाच्या हातातल्या वेगवेगळय़ा डिझाइन्सच्या लायटर विषयींचे उल्लेख या लेखात मजेशीरपणे आलेले आहेत. इन्दौरमध्ये रात्री दुकानाबाहेर मोठमोठय़ा कढया अजूनही लागतात, अन् लोक ग्लास दर ग्लास गरम दूध पिऊन जगतात. हे वाक्य खरोखरच इन्दौरच्या लोकांची खासियत आहे. हा लेख वाचताना पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील पात्रे जशी जिवंत होऊन आपल्या समोर उभी राहतात, तसेच स्वानंद किरकिरे यांनी बाबा गोरे जिवंत केला आहे. – विजय गजानन साळुंखे, मुंबई.

हेच रामाचे महान रूप

‘लोकरंग’ (२१ जानेवारी) मधील ‘मर्यादापुरुषोत्तम राम’ हा डॉ. राममनोहर लोहिया यांचा संपादित लेख वाचला व नीतिमान श्रीरामाचे रूप डोळय़ासमोर उभे राहिले. रामाने कैकयीच्या आग्रहास्तव जन्मदात्या दशरथ राजाची आज्ञा पाळून १४ वर्षे वनवास भोगला. हो, रामाने वैयक्तिक जीवन न जगण्यासाठी राज्य, संस्कृती, धर्म, यांच्याशी तडजोड केली नाही. नीतिमत्ता केवळ अभ्यासक्रमात नसते तर बोलण्या-चालण्यात, जगण्या-वागण्यात असते हे रामाने खडतर आयुष्य भोगून सिद्ध केले. समाजातील नीतिमूल्ये चिरकाल टिकावी म्हणून सीतेवर हृदयांकित प्रेम असूनही गरोदर असताना तिचा त्याग केला व समाजाच्या मर्यादा सांभाळल्या. रावणाचा वध करून भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही हेही रामाने साऱ्या विश्वाला दाखवून दिले. म्हणूनच राम, कृष्ण, विष्णू या आदर्श त्रिमूर्ती आपल्या हृदयात कायमच्या घर करून असल्या तरी शेवटी मुखातून ‘हे राम’ हे शब्द बाहेर येतात हेच या मर्यादापुरुषोत्तम रामाचे महान रूप आहे.- सूर्यकांत भोसले, मुंबई.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokrang@expressindia.com