‘लोकरंग’मधील (९ एप्रिल) पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुकुंद संगोराम यांचा सुंदर लेख वाचनात आला. या लेखाला अनुसरून गंधर्वाच्या आयुष्यातील दोन घटनांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. १९४६ साली कुमारजींना गंभीर क्षयरोग झाला आणि एक चालती-बोलती मैफिल अचानक थांबली. त्यांना मध्य प्रदेशातील माळवा भागातील देवास इथे स्थलांतरित करण्यात आलं. सुमारे सहा वर्षे त्यांनी या आजारपणात काढली. सहा वर्षे गाणंही बंद होतं. त्यावेळी कोणतंही औषध नव्हतं. पण या गंधर्वाचं नशीब म्हणा किंवा आपलं रसिकांचं भाग्य म्हणा, बरोब्बर १९५२ ला भारतात streptomycin हे औषध आणलं गेलं आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या सगळय़ात त्यांचं एक फुप्फुस मात्र कायमस्वरूपी निकामी झालं. डॉक्टरांनी त्यांना गाणं सोडण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांचं न ऐकता कुमारजी तब्बल ४० वर्षे एका फुप्फुसाच्या बळावर रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिले.

दुसरी गोष्ट म्हणजे, या दीर्घ आजाराच्या काळात माळव्याच्या मातीत त्यांची ओळख झाली ती कबीरांच्या दोह्याशी, त्यांच्या निर्गुण तत्त्वज्ञानाशी. गंभीर आजारात तिथल्या कबीरपंथी साधुसंतांच्या आवाजातील हे दोहे आणि भजनच त्यांना बळ देत होते. पण हे सगळे दोहे तेव्हा लोकसंगीतात गायले जायचे.
आजारातून बरे झाल्यावर गंधर्वानी कबीरांना शास्त्रीय संगीतात आणलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या निर्गुणी भजनात ऐकायला मिळतो. कर्मठ संगीत जाणकारांची मात्र एव्हाना नाके मुरडायची सुरुवात करून झाली होती. ‘भिकारी लोकांची गाणी’ कुमार गंधर्व शास्त्रीय संगीतात कसे आणू शकतात, म्हणून काहींचा आक्षेप होता!

परंतु कुणाचीही भीडभाड न बाळगता प्रयोगशील पंडितजी गात राहिले आणि हळूहळू लोकांना या भजनातील मर्म कळायला लागले. आणि त्यांची निर्गुणी भजनं ऐकायला रसिक तर येत होतेच, पण समीक्षकांचीसुद्धा पसंती त्यांना मिळत गेली. ‘उड जायेगा हंस अकेला’, ‘सूनता है गुरू ग्यानी’, ‘राम निरंजन न्यारा रे’ अशी कितीतरी कबीरांची व अन्य निर्गुणी भजने त्यांनी अजरामर केलीत. असा हा पद्मभूषण, पद्मविभूषण गंधर्व फुप्फुसाच्या आजारातच १९९२ साली देवलोकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी स्वर्गलोकात निघून गेला. किंवा असंही म्हणू शकतो, की ते कबीरांनी वर्णन केलेल्या ‘सखिया, वा घर सबसे न्यारा, जहा पुरण पुरुष हमारा’ पाहायलाही गेलेले असू शकतात! – शिवानंद तुपकरी, पुणे</strong>

उत्तम नाटय़समीक्षक!
‘लोकरंग’मधील (१९ मार्च) कमलाकर नाडकर्णी यांच्यावरील ‘त्याचं प्रेयस आणि श्रेयस.. ’ हा माधव वझे यांचा लेख वाचला. कमलाकर नाडकर्णी यांनी वृत्तपत्रीय नाटय़समीक्षेला प्रतिष्ठा, दर्जेदारपणा मिळवून दिला याची अनेक कारणे आहेत. नाडकर्णीकडे चिकित्सकपणा, अभ्यासूवृत्ती, कुशाग्र बुद्धी आणि मुख्यत: रोखठोकपणा ठासून भरला होता. कोणत्याही प्रकारच्या परिणामांची तमा न बाळगता धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती त्यांच्या अंगी होती. तसेच आटोपशीर आणि वाचनीय शैली त्यांना पूर्णत: अवगत होती. अगदी सामान्यातल्या सामान्य वाचकांनाही समीक्षा वाचनाची गोडी लागावी यासाठी बोलीभाषेच्या वापरासह त्यांनी आपल्या लेखनात साध्या, सरळ, सोप्या आणि बाळबोध भाषेचा वापर जाणीवपूर्वक केला. याच सर्व गुणांमुळे समस्त वृत्तपत्रीय वाचकांचे ते आवडते व लाडके नाटय़ – समीक्षक होते यात वादच नाही! – बेंजामिन केदारकर, विरार.

जगण्यातील असमानता कमी व्हायला हवी
‘लोकरंग’मधील (१९ मार्च) मधील ‘जगण्यातील असमानतेची व्यथा’ या गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचा लेख वाचनात आला. यामध्ये लेखिकेने सद्य:स्थितीत जी असमानता दिसते त्यावरती भाष्य केले आहे. या लेखातील महत्त्वाचे वाक्य म्हणजे ‘‘माणूस कोणत्याही धर्माचा, जातीचा, वंशाचा वा देशाचा असेल तरी त्याचे शरीरशास्त्र सारखेच असते.’’ हे वाक्य सर्व लोकांच्या डोळय़ात अंजन घालणारे आहे. सध्या साक्षर असणे म्हणजेच सुशिक्षित असणे असा गैरसमज आहे. साक्षर आणि सुशिक्षित हे दोन शब्द पूर्णपणे वेगळय़ा अर्थाचे आहेत. लिहिता, वाचता येणे म्हणजे साक्षर, परंतु शिक्षणामुळे ज्याच्या वर्तनात व विचारात फरक पडला आहे तो खरा सुशिक्षित. आपल्या आचार- विचारावर नियंत्रण आणण्याकरता धार्मिकता ठीक आहे, परंतु त्या नावाखाली जी अंधश्रद्धा जोपासली जाते ती पूर्णपणे चुकीची आहे. विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन गरजेचा आहे. भावी पिढीकरिता कौशल्य विकसित करणाऱ्या तांत्रिक शिक्षणाची केंद्रे निर्माण झाली पाहिजेत; व हे तंत्रज्ञान शहरी तसेच ग्रामीण भागापर्यंत पोहोचले तरच जगण्यातील असमानता कमी व्हायला मदत होईल. – प्रा. अनिता साळुंखे, कराड.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक आणि सामाजिक भान असणे आवश्यक‘लोकरंग’ मधील (१९ मार्च) /मधील ‘जगण्यातील असमानतेची .व्यथा’ हा गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचा लेख वाचला. समाजासमोर आरसा ठेवून आपण शास्त्र, तंत्रज्ञान व संशोधन या तीन गोष्टींबद्दल पुरेशी जागरूकता न दाखवल्यामुळे सामाजिक असमानता वाढत राहिली हे स्पष्ट करतो. शिक्षणामुळे आर्थिक स्थैर्य येते. परंतु वेळेचा व पैशांचा सदुपयोग होण्यासाठी विवेक आणि सामाजिक भान असणे आवश्यक आहे. – अ. वा. कोकजे, गिरगाव.