१३ मार्चच्या ‘रामदास विनवी’ या सदरात समर्थ साधक यांनी ‘भोंवतें स्थळ सोडून द्यावें। मधेंचि चमचमित ल्याहावें। कागद झडतांहि झडावें। नलगेचि अक्षर।’ या ओळींचा वाळूशी जोडून लावलेला अर्थ योग्य वाटला नाही. कागद जुना होत जातो, त्यामुळे व सततच्या हाताळणीमुळे त्याची झीज होत असते. ती चारी बाजूंनी होत असते. तसा तो झिजला तरी मध्यभागी लिहिलेला मजकूर अनेक वर्षे टिकून राहावा म्हणून ही सूचना केलेली आहे. हल्लीसुद्धा कागदावर लिहिताना समास सोडण्याची जी पद्धत आहे ती त्यासाठीच! लोकांना वाटते ती जागा ‘पंच’ करण्यासाठी सोडतात. आम्हाला मोडी शिकवताना कागदाच्या मधेच लिहायला सांगितले जाई. हल्ली ओळीच्या शेवटापर्यंत लिहितात. आता नवीन तंत्रज्ञानामुळे तसेच नवनवीन साधनांमुळे यापुढील काळात हस्ताक्षराचीच फारशी मातब्बरी उरणार नाही. त्यामुळे या जुन्या सूचनाही अर्थातच कालबाह्य़ ठरणार आहेत.
– दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणीतील शब्दाच्या अर्थाचा अनर्थ
यास्मिन शेख यांचा ‘मातृभाषेचा हरवलेला खजिना’ या अभ्यासपूर्ण लेखात मराठी भाषेतून हरवत चाललेल्या म्हणी आणि वाक्प्रचारांच्या खजिन्याचा उत्तम मागोवा घेण्यात आला होता. परंतु ‘सकाळी सौभाग्यवती, संध्याकाळी गंगाभागीरथी’ (वेश्या) ही म्हण कधीच ऐकली अथवा वाचली नव्हती. लेखिकेच्या मते, ‘गंगाभागीरथी म्हणजे वेश्या’ असा अर्थ या म्हणीत अभिप्रेत आहे. परंतु विधवा बाईचा पत्रात उल्लेख करताना ‘गं. भा.’ अथवा ‘गंगा-भागीरथी’ असा करतात. यावरून ‘गंगा-भागीरथी’ म्हणजे वेश्या नसून ‘विधवा’ हाच अर्थ योग्य आहे. त्यामुळे ही म्हण अस्तित्वात असेल तर त्याचा अर्थ असा होतो की- सकाळी सौभाग्यवती असलेली स्त्री दुपारी पतिनिधनामुळे विधवा होऊ शकते. वाचकांचा गैरसमज होऊ नये व विधवा बाईबद्दल कोणी चुकीचा शब्द वापरू नये, यासाठी हा पत्रप्रपंच.
– दिलीप गडकरी, कर्जत, रायगड.

वाचनीय लेख
‘लोकरंग’ पुरनणीमधील ‘बावनकशी’ सदरातील ‘चटकदार’ हा लेख आणि ‘गाजराची तुतारी’तील ‘मयतीला जातो मी..’ हे लेख खूप आवडले. कोंढरे यांनी अत्यंत कष्टमय जीवन
जगत असताना यशस्वी वाटचाल करत बिबवेवाडीतील दुकान, मग इतरत्र शाखा काढून आता ‘कल्याण भेळे’ची आठ दुकाने व चौदा उत्पादने सुरू केली आहेत. महाराष्ट्रातील मराठी लोक अनेक उद्योगांत अग्रेसर आहेत. पण भेळ हा मराठी माणसाने प्रसिद्ध केलेला खाद्यपदार्थ म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. खरोखरच चटकदार भेळ करताना त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
‘गाजराची तुतारी’मधील मृत्यूविषयीचे भाष्य विचार करायला लावणारे आहे. व्यक्तीचा मृत्यू, त्याचे अस्तित्व संपणे ही खरे तर दु:खाचीच बाब. पण लोक काही व्यक्तींच्या मृत्यूची वाट पाहत असतात, हे वास्तव मनाला चटका देणारे आणि खंतावून टाकणारेच. या लेखात उल्लेखिलेल्या आजींची गोष्ट म्हणूनच खटकली. वास्तविक त्यांचे काहीच करावे लागत नव्हते तरी त्यांच्या मृत्यूने आपली सुटका व्हावी, अशी भावना व्यक्त करणे म्हणजे माणुसकी नसण्यासारखेच आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नातेवाईक वाट पाहत असतात, पण त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. मृत्यूनंतर त्याची संपत्ती आपल्याला कधी मिळते व आपण त्या संपत्तीचा उपभोग कधी घेतो, अशी तीव्र इच्छा त्यामागे असते. त्या व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी वगैरे काहीही त्यांना असत नाही. त्यांची केलेली वारंवार चौकशी हे नक्राश्रूच असतात, हे कटू वास्तव अलीकडे बऱ्याच ठिकाणी दिसून
येत आहे.
– विजया दामले, बोरीवली, मुंबई</strong>

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter from lokrang readers
First published on: 03-04-2016 at 01:01 IST