‘लोकरंग’ पुरवणीतील (१७ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘अभ्यासू अपरिहार्य’ हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील लेखावरील निवडक प्रतिक्रिया…

पृथ्वीराज चव्हाण जर विधानसभेचे सभापती झाले असते तर महाराष्ट्राच्या बेबंदशाही राजकारणाला ब्रेक लागला असता. लेखात पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक धागे उलगडले आहेत. राजकारणाचा मोठा वारसा लाभला, पण वडील आनंदराव चव्हाण यांचे कुठलेही नाव न वापरता आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवले. त्यांनी भारतीय राजकारणात एक नवा पायंडा पाडला. ते धनाढ्य होते. ते महाराष्ट्रात खूप मोठी साखर कारखानदारी करू शकले असते. सहकार क्षेत्रात काम करू शकले असते. परंतु तो त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात त्यांना कधीही पुढे पुढे करणे, कुणाची तरी हुजरेगिरी करणे जमले नाही. त्यांच्या स्वभावातच ते बसत नव्हते. पृथ्वीराज चव्हाण भारतातील बुद्धिवंतांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले एक राजकीय नेते होत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात क्लिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसच्या हायकमांडने क्लीन चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली. पृथ्वीराज मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांचा एक तरी समर्थक आमदार महाराष्ट्रात असेल असे मला तरी वाटत नाही.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर पृथ्वीराज चव्हाण असताना पक्षातील व बाहेरचे अनेक नेते त्यांच्यावर नाराज असायचे, पण त्यांनी त्यांची कधीच परवा केली नाही. सरकार चालवताना प्रमुख पदावर बसलेल्या माणसाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. पक्षातील नेते, कार्यकर्ते सांभाळावे लागतात. पण त्यांनी कुठलाही निर्णय घेताना कुठलेच खोटे काम केले नाही. आज प्रशासनामध्ये जी सुसज्जता दिसते, ती पृथ्वीराज चव्हाण यांचीच देणगी आहे. आज महाराष्ट्रातील कुठल्याही खात्यामध्ये जा, एखादी फाइल ‘इन वर्ड’ झाली की त्याची एंट्री कॉम्प्युटरमध्ये होते. पूर्वी महाराष्ट्राचा सर्व कारभार हा ऑफलाइन चालायचा. जलयुक्त शिवारसारखी योजना असेल, मुंबईतील अनेक रस्त्यांचे काम असेल… याबाबतचे अनेक निर्णय त्यांनी रोखठोकपणे घेतले. त्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.

२०१४ नंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे बळ कमी झाले. पक्ष अडचणीत आला. म्हणून इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी बाबांना गळ घालणे सुरू केले. पण सत्ता गेली म्हणून ते बिलकूल विचलित झाले नाहीत. एवढेच काय २०१९ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपद घेण्याचेही नाकारले. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांना विचारणा झाली होती, परंतु विधानसभेचे अध्यक्षपदही पृथ्वीराज चव्हाण यांनी नाकारले. त्याचे कारण असे की, एकदा महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर राहून पुन्हा दुय्यम पद घेणे त्यांच्या नियमात बसले नाही. परंतु लेखक म्हणतात तसे जर विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारले असते तर आज महाराष्ट्रात राजकारणाची जी अवकळा सुरू झाली आहे, ती नक्कीच थांबली असती. उघडउघड एखाद्या पक्षातील नेता फोडून आपल्या पक्षात घेणे, समोरच्याला अडचणीत टाकणे, एखाद्या विरोधी पक्षातील नेत्याला सत्ताधारी पक्षात आणण्यासाठी मजबूर करणे, हे धंदे नक्कीच थांबले असते. ते बुद्धिवादी राजकारणी आहेत. पण काँग्रेससारख्या एका बलाढ्य राजकीय पक्षाच्या विचारसरणीला ते बांधलेले आहेत. एकनिष्ठ आहेत. प्रामाणिक आहे. आणि हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

प्रकाश भगनुरे पाटील, नांदेड.

बेमुर्वतखोर राजकारण्यांनी धडा घ्यावा अशी व्यक्ती

हा लेख वाचून नकळत शापित राजहंसाची उपमा आठवली. लेखकाने मनमोहनसिंग, पी. चिदंबरम, प्रणवदा इ.सोबत अत्यंत महत्त्वाचे असे कार्य पृथ्वीराज यांच्या हातून झालेले आहे, असे नोंदवले आहे. पण दुर्दैवाने या आठवणी अद्याप शब्दबद्ध झाल्या असाव्यात असे वाचनात आले नाही. लेखकाने यात पुढाकार घ्यावा असे वाटते. जे निश्चितच आजच्या व भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल. आजचे बेताल राजकारण व बेमुर्वतखोर राजकारणी यांवर काही उपायही लोकांना माहिती होतील.

– अतुल र. श्रेष्ठ, संभाजीनगर

असा राजकारणी पाहणं हे भाग्य

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी हुशार व्यक्ती त्यांच्याच पक्षाकडून डावलली जाते हे फार दुर्दैवी वाटतं. त्यांनी विधानसभेचं सभापतीपद घ्यायलाच हवं होतं, कारण पुढे खूप गोष्टी घडल्या नसत्या. अशी माणसं आमच्या पिढीला पाहायला मिळाली हेच आमच्या पिढीचं भाग्य म्हणावं लागेल. लेखातील शेवटचं ‘आततायी, आग्रही, आत्मप्रौढ अशांचा सुळसुळाट असण्याच्या काळात अभ्यासू, अनाग्रहींचं असं फेकलं जाणं अपरिहार्यच असं म्हणायचं!’ हे वाक्य काळजात घर करून गेलं.

अजय दाफळ

अभ्यासूवृत्तीचे नेते

पृथ्वीराज चव्हाण हे एक नि:संशय अभ्यासू आणि चारित्र्यवान राजकीय नेते आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबविलेले निर्णय आणि कडक शिस्तीने केलेली कारवाई ही नक्कीच वाखाणण्याजोगी होती. देश तसेच राज्याची धुरा कशा नेत्याच्या हाती असावी याचं एक उत्तम उदाहरण नक्कीच म्हणता येईल. परंतु सध्याच्या काळात अशी व्यक्तिमत्त्वे लोकशाहीतील निवडणुका जिंकू शकत नाहीत हे एक विदारक सत्य आहे; आणि ते कुठल्याही निवडणुकीकडे बघितले तरीही जाणवू शकते. एक प्रकारे ही लोकशाहीची विटंबनाच वाटते.

– प्रसन्न गांगल

तर महाराष्ट्राची राजकीय गटारगंगा झाली नसती

अतिशय सुस्वभावी, पुरोगामी विचार आणि शासनाच्या व्यवस्था तंत्रज्ञानस्नेही असावी यासाठी त्यांनी काम केले. घराण्यात राजकीय वारसा असूनही कोणत्याही प्रकारची खासगी संस्था व संपत्ती जमविली नाही. त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारले असते तर महाराष्ट्राची राजकीय गटारगंगा नक्कीच झाली नसती. कराडच्या मतदारांनी त्यांचा पराभव केला नसून, मतदान चोरी व ईव्हीएम या दोन गोष्टींमुळे आपण एका उच्चशिक्षित व्यक्तीला राजकारणातून मुकलो आहोत असे वाटते.

शशिकांत चौधरी

सौजन्यशील व्यक्तिमत्त्व

लेखकाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला आहे. आज राजकारण म्हणजे एक साथीचा रोग झाला आहे, त्यामुळे राजकारणात शिरलेला बदनामीचा कळस गाठल्यावरच मुक्त होत़ो. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण खरोखरच एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. ते नुसते उच्च विद्याविभूषित नेते नाहीत तर राजकारणात आणि सार्वजनिक क्षेत्रात तसेच शासनात कार्यरत असतानादेखील त्यांच्यातला सुसंस्कृतपणा कायम टिकला. घरातून राजकीय वारसा मिळूनदेखील त्यांनी आपले सौजन्यशील व्यक्तिमत्त्वच टिकवून ठेवले.

– प्रभु अग्रहारकर

चव्हाण दाम्पत्य कौतुकास्पद

एक वैयक्तिक अनुभव… नुकतेच पृथ्वीराज मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले होते तेव्हाची गोष्ट. त्यांच्या पत्नी माहेरी म्हैसाळ-मिरज येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तरी कुठेही मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून ओळख मिळावी असा त्यांचा प्रयत्न नव्हता. कार्यक्रमातील भाषण त्यांनी अतिशय सुस्पष्टपणे व तरलतेने पूर्णपणे इंग्रजीमध्ये केले. विषय सोडून किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित एकही शब्द त्या भाषणात नव्हता हे विशेष. एका आकस्मिक आनंदाने भारावून सोडणारे ते भाषण होते. तसे अभ्यासपूर्ण इंग्रजी भाषण आमच्या सांगली-मिरज भागात मी आजतागायत ऐकले नाही. आपण समाजजीवनात जबाबदारीने वागले-बोलले पाहिजे याचे नैतिक भान या दाम्पत्याने नेटाने सांभाळले आहे. सध्याच्या तुलनेत हे त्यावेळचे वातावरण निश्चितच आश्वासक व स्पृहणीय असेच होते. आता असे चित्र दिसत नाही.

– दीपक ज. पाटील, सांगली

मूल्यांवर ठाम असलेले राजकारणी

अंगावर भ्रष्टाचाराचा डाग नसलेला, अभ्यासू, प्रामाणिक आणि तंत्रज्ञानस्नेही राजकारणी म्हणून पृथ्वीराज चव्हाण ओळखले जातात. सत्तेत राहूनही बे-दाग राहता येतं असे बोटावर मोजता येणारे नेते भारतात आहेत त्यांपैकी पृथ्वीराज एक. वाचाळवीरांना आपले आदर्श मानणारे आणि भक्तिरसात सैरभर होऊन नाचणाऱ्यांना हल्ली शैक्षणिक पात्रता असलेले राजकारणी नकोसे असतात. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय ज्ञान आणि अभ्यासू वृत्ती असणाऱ्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. अणुकराराच्या वाटाघाटीपेक्षा आवडणाऱ्या मंदिरासाठी वाटाघाटी केली असती तर त्यांना आणि पक्षाला अशा पराभवांना सामोरे जाण्याची वेळ आली नसती. तत्त्वनिष्ठा हा त्यांच्या स्वभावाचा कणा आणि सत्तेसाठी तडजोड न करणं हे त्यांनी आयुष्यभर पाळलं तत्त्व. भाजपनं थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरी त्यांनी नकार दिला. आजच्या काळात संधिसाधूपणा, लोभ आणि राजकीय व्यापारीकरण वाढलं असताना चव्हाण यांचं आयुष्य वेगळं भासतं. अभ्यासू, स्वच्छ, प्रामाणिकपणा आणि मूल्यांवर ठाम राहूनही राजकारण करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं. राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी असावं ही त्यांच्याकडून श

परेश संगीता प्रमोद बंग, अकोला</p>