वंदना गुप्ते
आमची आई माणिक वर्मा हिच्या जन्मशताब्दी निमित्ताने आम्ही बहिणींनी ठरवलं की, हे वर्ष संपूर्ण महाराष्ट्र संगीतमय करून टाकायचा. ज्या रसिकांनी आमच्या आईच्या गाण्यांवर भरभरून प्रेम केलं, त्यांना पुन्हा एकदा संगीताचा मनमुराद आनंद द्यायचा. आईचं ऋण काही अंशी तरी फेडण्याचा प्रयत्न करायचा… हीच त्यामागची खरी प्रेरणा.
माणिकबाईंचं गाणं इतकं बहुपेडी, बहुरंगी, बहुढंगी होतं की त्यातलं नेमकं काय रसिकांसमोर ठेवायचं, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. वयाच्या तेराव्या वर्षी तिनं ‘एचएमव्ही’साठी पहिलं गाणं गायलं… आणि पुढची साठ वर्षं तिनं अखंड संगीतसाधनेत घालवली. हे जग सोडून जाईपर्यंत तिचं संगीत बहरतच राहिलं.
संगीतसेवेला वाहून घेतलेल्या आमच्या आईनं आमच्या पालनपोषणात मात्र कधीच कसूर केली नाही. उत्तम संस्कार दिले. संगीताच्या मैफिलींसाठी तिला भारतभर प्रवास करावा लागे. वडील फिल्म्स डिव्हिजनमध्ये डॉक्युमेण्ट्री करीत; त्यानिमित्ताने त्यांनाही प्रवास घडे. अशा वेळी आम्हाला पुण्याला आजोळी ठेवण्यात आलं. यामागचा उद्देश हाही की, आम्हाला एकत्र कुटुंबाचे संस्कार मिळावेत, पुणेरी सणवार, परंपरा, शिस्त यांची ओळख व्हावी.
पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या शनिपाराजवळ ‘स्वरसाधना’ या आजोळच्या घरात आमचं बालपण गेलं. घरात आम्ही नऊ-दहा मुलं मिळून एकत्र राहत होतो. त्यामुळे मज्जाच मज्जा असायची. दोन कार्यक्रमांमध्ये एक दिवस जरी मिळाला तरी आई जिवाचं रान करून पुण्याला येत असे. आमचे मामा-मामी, मामेभावंडं, आजी- सगळे एकत्र येत. आजीची शिस्त, माम्यांचे लाड आणि आमची मस्ती हेच आमचं बालपण…
आईच्या शाळेच्या मैत्रिणीच आमच्या शिक्षिका होत्या. त्यामुळे पहिली ते सातवीपर्यंत माझ्या सगळ्या खोड्यांकडे ‘माणिकची मुलगी’ म्हणून कौतुकानं काणाडोळा केला जायचा! मूलत: आईपासून मिळालेला वारसा पुण्यातच पुरेपूर अनुभवला.
आठवीत मुंबईला आल्यावर मात्र समजलं की, अभ्यास आपणच करायचा, आपली जागा आपणच निर्माण करायची! इथूनच पुण्यातले लाड मागे राहिले आणि कष्टाचे दिवस सुरू झाले. रोजचा अभ्यास, युनिफॉर्मची इस्त्री, वेण्या, होमवर्क, दप्तर आणि डबा -सगळं स्वत:च करायचं! पण त्यामुळे स्वभावात चटपटीतपणा आला. वारसा हक्कांचा माज उतरायला लागला आणि आईच्या मायेचा वारसा अंगावर चढायला लागला.
हळूहळू आम्ही मोठ्या झालो, प्रेमात पडलो, लग्नं झाली. माझ्या लग्नानंतर मी नाटकात काम करणं सोडलं. नंतर मुलगी झाली. हॉस्पिटलमधून माहेरी आल्यावर घर आनंदानं बहरून गेलं होतं. खरं तर माणिकबाईंना चारही मुलीच; पण मुलीला मुलगी झाल्यावर घरात आणखी उत्साह भरला. सगळे खूश होते, पण मी मात्र घाबरले होते- हे एवढंसं बाळ कसं वाढवायचं? शरीरानं वाढेल, पण मन कसं घडवायचं? त्या विचारांनी मी हादरले. वाटलं, नऊ महिन्यांचा आई होण्याचा काळ सोपा होता, पण हे आईपण निभावणं कठीणच आहे. आणि तेव्हाच पहिल्यांदा ‘आईचं मोठेपण’ जाणवलं- जे तिनं आम्हाला कधीच जाणवू दिलं नव्हतं.
काय गंमत असते- आपण आपल्या रोजच्या नात्यांमध्ये जगत असतो, पण त्यांच्या खोलात जाऊन विचार करण्याची वेळ आली की त्यांचा गोडवा, गुंता, अर्थ जाणवतो. मी आई झाले तेव्हा विचार आला- आम्हा बहिणींना आई-बाबांनी इतक्या निकोपपणे, स्वच्छंदीपणे, कुठलीही सक्ती न करता, आमच्या आवडीनिवडीनुसार कसं घडवलं असेल? मुली असूनही मुलांप्रमाणे स्वातंत्र्य दिलं आणि स्त्रीसुलभ चैतन्यही जोपासायला शिकवलं. समाजात असलेल्या त्यांच्या आदराच्या स्थानाला तडा जाऊ न देता जगण्याचं कौशल्य दिलं. हे त्यांनी कसं केलं? रोज समोर बसवून संस्कारांचे धडे दिले का? छे! त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, काळजीतून, नजरेतून, प्रत्येक कृतीतून ते संस्कार उमटत गेले.
काय असतो हा मायेचा वारसा? प्रेम, वात्सल्य, आनंद, अभिमान – हाच तो संस्कार. आज त्याचं शास्त्रीय नाव ‘डीएनए’ असं ठेवावं! माझी आई महाराष्ट्राची लाडकी गायिका… माणिक वर्मा. इतकी लोकप्रिय की कुणाकडे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असेल आणि त्या मुलीनं जर माणिकबाईचं गाणं म्हटलं तर समजायचं- ही सोज्वळ, सुशील असणार!
आई सांगायची, तिच्या आईनं, म्हणजे माझ्या आजीनं (माई दादरकर) तिला शिक्षणाचे आणि संगीताचे संस्कार सक्तीनं दिले. पण आईनं ती सक्ती आमच्यावर कधी केली नाही. कारण तिनं काळानुसार स्वत:त बदल केले. सक्तीची परिभाषा बदलली. आम्हाला जगण्याच्या सगळ्या अंगांची ओळख करून दिली. प्रत्येक कलेतलं थोडं थोडं शिक्षण दिलं.
ती म्हणायची, ‘‘तुम्हाला ज्यात गोडी वाटेल, ते करा; पण जे कराल, त्यात उच्च बिंदूकडे जाण्याचा प्रयत्न करा. शिडी चढत राहा, पण पायऱ्या संपू देऊ नका. विद्यार्थीपण कधीच सोडू नका. आनंद घ्या आणि आनंद वाटा.’’
माझी आजी नेहमी म्हणायची, ‘‘जो कलेचा आनंद उपभोगू शकतो, तो सभोवतालच्या लोकांमध्येही आनंद वाटू शकतो.’’
आई किती साधी, सरळ स्वभावाची होती! बाहेर एवढं नाव, मानमरातब असूनही घरात ते मोठेपण तिनं कधी आणलं नाही. एका स्त्रीला व्यवसाय आणि संसार दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. घरातल्यांची मनं जपून, नाती, प्रेम टिकवून, संगीतसाधना करायची असते.
आईचा हा खडतर प्रवास डोळ्यांसमोर तरळून गेला आणि मांडीवर घेतलेल्या माझ्या मुलीचा पापा घेत मी स्वत:लाच धीर दिला, ‘‘हाच मायेचा, प्रेमाचा, अभिमानाचा आणि संस्कारांचा वारसा मी तुझ्यापर्यंत पोहोचवणार- जो माणिकबाईंची मुलगी म्हणून मला मिळाला, तोच पुढे नेणार.’’
आणि हाच माणिक वर्मा स्वरशताब्दी साजरी करण्यामागचा आमचा खरा हेतू… मायेचा आणि संगीताचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा. ‘माणिक स्वर महोत्सव’ हा आमचा प्रयत्न त्या दिशेने एक पाऊल आहे महाराष्ट्र पुन्हा एकदा माणिकबाई आणि त्यांच्या स्वरांसारखा सोज्वळ, सुशील, आनंदी आणि संगीतमय व्हावा, हीच आमची इच्छा, हीच आमची दिशा… कारण असे कलाकार पुन्हा होणे नाही!