१९६०-७० च्या दशकात ‘गोड गोड भावगीते’, ‘मधुर भावगीते’ अशी पुस्तके रसिकांना वाचायला मिळाली. शब्दांसकट संपूर्ण गाणी उपलब्ध झाल्यामुळे अशा पुस्तकांचे स्वागत झाले. रसिकांना ती आवडली. आणखी वीसेक वर्षांत वामन देशपांडे, मोरेश्वर पटवर्धन व सहकाऱ्यांनी मिळून ‘गाणी गळ्यातली, गाणी मनातली’ हे तब्बल १,५१२ भावगीत-भक्तिगीतांचा समावेश असलेले १४ खंड संपादित केले. ग. का. रायकर यांनी आधी केलेले काम व ही पुस्तके अशी संगीतप्रेमींना मेजवानी ठरली. अशा हजारो गोड भावगीतांनी रसिकांना अमाप आनंद दिला. असेच एक गीत १९५५ साली संगीतबद्ध झाले. राजकवी भा. रा. तांबे यांनी १९३३ साली लिहिलेल्या कवितेला संगीतकार वसंत प्रभू यांनी चाल बांधली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात हे मधुर गीत गायले गेले. ते गीत होते-
‘मधु मागशि माझ्या सख्या, परी




मधुघटचि रिकामे पडती घरी!
आजवरी कमळांच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं रोष न सख्या, दया करी।
नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी।
तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गूज
संसाराचे मर्म हवे तुज
मधू पिळण्या परि रे बळ न करी!
ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया
आता मधूचें नाव कासया?
लागले नेत्र रे पैलतिरी।’
कवी भा. रा. तांबे यांनी निश्चितच आपल्या काव्यप्रतिभेला उद्देशून ही कविता लिहिली आहे. किंवा हे प्रेमगीत आहे म्हणा, भक्तिगीत आहे म्हणा, इतके नक्की, की मानवी जीवनातल्या सर्व जाणिवांनी आपण या कवितेकडे पाहू शकतो. म्हणून ही कविता श्रेष्ठ आहे. ही कविता अनेक पैलूंमधून प्रकट होते. कवितेतील नायिका सख्याला सांगते, ‘हे मधुघट मी तुझ्यासाठी रिकामे केले आहेत. तुला आयुष्यातील सर्व दिले. तुला कमळांच्या द्रोणामधून भरभरून मध पाजला. ही माझी सेवा पाहा आणि रोष करू नकोस. माझ्यासाठी हे प्रेमाचे अंतिम टोक आहे. आता फक्त नैवेद्याची वाटीच शिल्लक आहे. माझ्या स्मृती मी माझ्यापाशीच जपेन. जो प्रेमात पडतो तो कधी तक्रार करत नाही. देवालासुद्धा आपण लडिवाळपणे मागणे मागतो. पण सख्या तू आता काही मागू नकोस. आता मी हरीभेटीसाठी तळमळते आहे..’ कोणतीही स्त्री ही नि:सीम प्रेम करते, हा या कवितेत स्थायिभाव आहे. द्रोण भरभरून मध दिलंय ही तक्रार नाही, तो गतस्मृतींचा झंकार आहे.
१९५५ साली ‘मधु मागशि..’ ही ध्वनिमुद्रिका निघाली. संगीतकार वसंत प्रभू कवीच्या शब्दरचनेत सहसा बदल करीत नसत. या गीतामध्ये ‘करि रोष न सख्या,
दया करी’ या ओळीत चालीसाठी बदल करून ‘करि न रोष सखया..’ अशी शब्दरचना स्वरबद्ध केली. कवी भा. रा. तांबे यांच्या प्रत्येक कवितेसह ती कविता कोणत्या जातीतील व गायनाचा राग काय कसावा ही माहिती मिळते. या कवितेसाठी ‘जाती नववधू आणि राग बागेश्री’ असे तांबे यांनी नोंदवलेले असले, तरी वसंत प्रभू यांनी या गीताला ‘भिमपलास’ रागात स्वरबद्ध केले. त्यामुळे गाण्यातील भावनिर्मिती अधिक उत्तम झाली. भीमपलास रागातील ‘निसागमप गमग रेसा’ हे स्वर आहेतच; शिवाय ‘गमधनिधप’ हे रागातील मुख्य चलनसुद्धा चालीत दिसते. भिमपलास रागात अवरोही रिषभ असतो. या गीतात आरोही रिषभसुद्धा आहे. शास्त्रकाटय़ाच्या कसोटीला पुरेपूर उतरून या गाण्याने भावनेची अत्युच्य पातळी गाठली आहे. मधुर चाल आणि मधुर स्वर हे ‘मधु मागशि..’ या गीतासाठी एकत्र आले, हा रसिकांच्या कुंडलीतला भाग्ययोग आहे. लता मंगेशकर यांच्या स्वरामुळे चित्तवृत्ती प्रसन्न होणे आणि भा. रां. तांबे यांच्या कवितेने भारावणे- असा हा ‘गोफ दुहेरी’ आहे!
भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी ग्वाल्हेर संस्थानातील झाशीजवळच्या मुंगावली या गावी झाला. तांबे यांचे मूळ गाव कोकणातील खेटकुई. त्यांचे आजोबा गंगाधरशास्त्री हे संस्कृततज्ज्ञ आणि वैद्य होते, तर वडील झाशी सरकारच्या सुभायतीत कारकून होते. कवी तांबे यांचे बालपण मुंगावली, झाशी व ग्वाल्हेर येथे गेले. त्र्यंबक अप्पाजी पुसाळकर यांच्या शाळेत त्यांनी श्रीगणेशा केला. पुढील काळात ‘संतलीलामृत’, ‘पांडवप्रताप’, ‘तुलसीरामायण’ हे गं्रथ त्यांनी वाचले. रुद्र व वेदपठणाचा अभ्यास केला. १८८८ मध्ये ते देवास येथे आले, इंग्रजी शिकले. १८९३ मध्ये अलाहाबादच्या मॅट्रिक परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तांबे यांनी आपली पहिली कविता शाळेत असतानाच लिहिली. चिपळूणकर, आगरकर यांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला. संस्कृत नाटके वाचण्यासाठी उपलब्ध होतीच, शिवाय बायरन, शेले, किट्स, वर्डस्वर्थ, टेनिसन, ब्राऊनिंग या इंग्रजी कवींच्या कवितांचाही त्यांनी अभ्यास केला. कायद्याचा अभ्यास हे निमित्त झाले आणि त्यांनी ऊर्दू भाषाही शिकून घेतली. नारायण भगवान या गायकाकडून शास्त्रीय रागांचे ज्ञान मिळाले. त्यामुळे संगीतातील राग-रागिण्यांचा अभ्यास झाला. सरोदवादक हफीज खाँसाहेब, राजाभय्या पूछवाले, श्री. ना. रातंजनकर यांचे गायन-वादन ऐकायला मिळे. प्रा. वा. गो. मायदेव यांनी तांबे यांच्या कविता अनेक ठिकाणी गायल्या. त्यांनीच तांबे यांच्या कवितांचा संग्रह वाचकांसमोर आणला. तांबे यांना कवी यशवंत, गिरीश, भवानीशंकर पंडित, सोपानदेव चौधरी या मित्रांचा सहवास लाभला. देवासच्या राजपुत्रांना शिकविण्याची संधीही त्यांना मिळाली. महाराजांचे खासगी चिटणीस म्हणून ते काम पाहत. पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या शिक्षणखात्यात त्यांनी अकरा वर्षे नोकरी केली. ग्वाल्हेर दरबारने त्यांना ‘राजकवी’ हा किताब दिला. तांबे सांगत- ‘जेव्हा भाषा नव्हती तेव्हा भावना होत्याच. कला हे निसर्गाच्या हाकेस मानवाने दिलेले उत्तर आहे.’
कवी तांबे यांच्या जवळजवळ अडीचशे कविता उपलब्ध आहेत. काव्य व संगीत एकमेकांस पूरक आहेत, असे ते मानत. गायनातील नोटेशन्सचा त्यांनी अभ्यास केला होता. आपल्या कवितांना ते ‘साँग’ म्हणत. खंडकाव्य, स्फुटकाव्य, लेखन, भाषणे, अभिप्राय, प्रस्तावना, नाटक अशी त्यांची विपुल आणि विविधांगी साहित्यसंपदा आहे. त्यांनी कविता कोठे लिहिली व कोणत्या काळात लिहिली याचे संदर्भ त्यांच्या पुस्तकांतून मिळतात. म्हणजे- ‘मधुघट’ (लष्करे ग्वाल्हेर, १९३३), ‘डोळे हे जुलमी गडे’ (देवास, १८९१), ‘तिन्ही सांजा’ (इंदूर, १९२०), ‘ते दूध तुझ्या त्या घटातले’ (प्रतापगढ, १९२०), ‘रुद्रास आवाहन’ (इंदूर, १९२०), ‘निजल्या तान्ह्यवरी’ (अजमेर, १९२१), ‘कळा ज्या लागल्या जीवा’ (अजमेर, १९२२) अशी माहिती उपलब्ध आहे. त्यांची कविता सुरांसकट जन्माला येते. संगीताचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. उदा. ‘नाद जसा वेणूत..’, ‘दिसशील तू भैरवी रागिणी..’, ‘ताना या परि पावल्या..’, ‘संसार सतारीवरी वारा..’. तांबे यांच्या काव्यावरून, काव्याच्या आधारे सिद्ध होणाऱ्या जातींना माधवराव पटवर्धन यांनी नावे दिली. ‘सुखराशी’, ‘मदन रंग’, ‘प्रीतिखोल’, ‘नववधू’, ‘महाकाली’, ‘शुभवदना’, ‘कुसुमबाण’, ‘वीरभद्र’ ही ती नावे. तांबे यांच्या काव्याबद्दल रा. श्री. जोग यांनी म्हटले आहे- ‘वर्णन करताना तपशिलाचा भरणा करण्याचे तांबे यांना जणू व्यसनच होते.’
संगीतकार वसंत प्रभूंच्या आठवणींचा खजिनाच लेखक मधू पोतदार यांच्याकडे आहे. ते सांगतात, ‘‘एच. एम. व्ही.च्या वसंतराव कामेरकरांनी दोन गाणी प्रभूंकडे दिली आणि चाल लावण्यास सांगितले. दोन्ही गीतांचे शब्द कवी सूर्यकांत खांडेकरांचे होते. ‘घे कुशीत क्षण हासरा’ आणि ‘सख्या हरी जडली प्रीत’ ही ती गीते. दोन्ही गीते गायिका सुलोचना चव्हाण यांनी गायली आणि संगीतकार प्रभूंची ध्वनिमुद्रिका १९४८ साली आली.’’
वसंत प्रभू मुंबईमध्ये- ७, लक्ष्मीभुवन, दादर गल्ली येथे राहत असत. शेवटच्या काळात क्षयाच्या आजारपणाने त्यांना ग्रासले होते. भा. रा. तांबे यांच्या आणखी एका गीताचे रेकॉर्डिग परदेशातून आल्यावर नक्की करू, असे त्यांनी लता मंगेशकर यांच्याकडून आश्वासन घेतले. त्या आनंदात त्यांची तब्येत सुधारते आहे असे दिसले. एका अंतऱ्यापर्यंत चालसुद्धा त्यांनी लावली. जवळचे मित्र व घरातील सर्वाना ती चाल ऐकवली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. लतादीदी परदेश दौरा करून परतण्याआधीच प्रभू यांचे निधन झाले. १३ ऑक्टोबर १९६७ हा तो दिवस. तांबे यांचे ते गीत ध्वनिमुद्रित झालेच नाही. ते गीत होते-
‘मरणांत खरोखर जग जगते
अधि मरण, अमरपण ये मग ते..’
आणखी एक वेगळा संदर्भ सांगायचा तर, ‘मधु मागशि माझ्या..’ या आशयाचे पं. नरेंद्र शर्मा यांनी एक हिंदी गीत लिहिले होते. श्रेष्ठ गायक सुधीर फडके यांनी ते ‘मिश्र पिलू’ रागात स्वरबद्ध केले अन् गायले-
‘मधु माँग न मेरे मधुर मीत
मधु के दिन मेरे गये बीत..’
ही एकप्रकारे सशक्त, सुदृढ सांस्कृतिक देवाणघेवाण आहे.
– विनायक जोशी