डॉ. गिरीश वेलणकर
आयुर्वेद भास्कर प. य. तथा दादा वैद्या खडीवाले यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘दर्शन योगेश्वराचे’ हा ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांचे समग्र जीवन उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीलाच त्यांच्या पूर्वजांविषयीची माहिती दिली आहे. त्यांचे लहानपण, जडणघडण, त्यांच्या मित्रांनी त्यांच्याविषयी सांगितलेल्या आठवणी, त्यांचे वाचन-लिखाण याविषयीचे विचार यात वाचयला मिळतात. त्यांच्याच शब्दांत त्यांनी स्वत:चा जीवन प्रवास सांगताना बालपण, वायुदलातील आठवणींचा पट मांडला आहे.

त्यांच्या वडिलांनी मृत्युपत्रात ‘परशुरामने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे व औषधी कारखान्याकडे बघावे,’ असे लिहिल्यामुळे १९६८ ते १९७२ या काळात वयाच्या ३४ व्या वर्षी घेतलेले वैद्याकीय शिक्षण… वैद्याकीय शिक्षण सुरू असतानाच १९७१ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालय व वैद्यातीर्थ अप्पा शास्त्री साठे वैद्याकीय संदर्भ ग्रंथालय यांचा प्रारंभ… १९७२ ते १९८२ या काळात सदाशिव पेठेत ज्ञानेश्वर धर्मार्थ चिकित्सालय चालवणे आणि अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात रसशास्त्र विषयाचे अध्यापन, आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी १९७३ मध्ये गुरुकुल पुणे उपक्रम, आयुर्वेदात संशोधनाला चालना देण्यासाठी १९७४ मध्ये वैद्या खडीवाले वैद्याक संशोधन संस्था स्थापणे, १९७६ मध्ये आयुर्वेद प्रचारक मासिक व वैद्याक ग्रंथ भांडार सुरू करणे… हा त्यांचा प्रवास अवाक् करणारा.

सामाजिक उपक्रम

वैद्याकीय क्षेत्र हे दादांचे कार्यक्षेत्र, कर्मभूमी होती; परंतु त्यापलीकडे जाऊन १९८३ मध्ये अन्नकोटाचे आयोजन, १९९० मध्ये निराधार बाल व महिलांना आधार देण्यासाठी आकुर्डी येथे ‘आधार’ संस्थेची स्थापना, १९९६ मध्ये ‘हिंदू तनमन’ हे साप्ताहिक , १९९७ मध्ये ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानची सुरुवात, १९९१ ते १९९६ या काळात ठाणे जिल्ह्यात देवबांध येथे राम मंदिराची उभारणी व महिन्यातून दोनदा मोफत श्रमदानाने वनस्पतींची लागवड , २००० मध्ये राष्ट्रीय वनसंपदा संवर्धन आळंदी देवस्थानच्या तीनशे एकर जमिनीवर ३६ बंधारे व दोन विहिरी, २०६६ मध्ये पुणे विद्यापीठात महामना वैद्या शंकर दाजी शास्त्री पदे औषधी वनस्पती उद्यानाची उभारणी अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी केली.

या पूर्ण ग्रंथात त्यांच्या योगसाधनेचा किंवा आध्यात्मिक उपासनेचा कुठेही उल्लेख नाही, पण वाचकांना स्तिमित आणि नतमस्तक करणारे अफाट आणि अचाट कर्तृत्व पाहिल्यानंतर जेव्हा एका नि:स्पृह, नि:स्वार्थी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो तेव्हा एका योगेश्वराचेच दर्शन होते.

दादांचे लहानपणापासून अत्यंत निग्रही व दृढनिश्चयी व्यक्तिमत्त्व घडत गेले. त्यांनी आईला शब्द दिला की, ‘यापुढे मी कधीही चित्रपट बघणार नाही.’ बोलल्याप्रमाणे त्यांनी पुढे कधीही चित्रपट पाहिला नाही. अपवाद फक्त ‘वीर सावरकर’ या चित्रपटाचा. ज्या सहजतेने त्यांनी वायुदलात नोकरी पत्करली तेवढ्यात सहजतेने पुन्हा वडिलांच्या अंतिम इच्छेला मान देऊन वायुदलातील नोकरीवर पाणी सोडून पुण्याला यायचं ठरवलं. येताना त्यांनी त्यांचं सर्व पेन्शन भारतीय सेनेच्या रणगाडा निधीला सुपूर्त केलं.

लोभ कशाचाच ठेवला नाही. आपल्याला देशसेवा करायला मिळाली यातच आनंद मानला. त्यामुळे वडिलांची आज्ञा प्रमाण मानून त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी वैद्याकीय शिक्षणाला प्रारंभ केला. वडिलांचा या क्षेत्रातील वारसा, औषधी कारखान्याचा अनुभव व निष्ठेने, चिकाटीने आणि संशोधक वृत्तीने केलेली चिकित्सा यांच्या बळावर ते आयुर्वेदाचे चालते-बोलते विद्यापीठ बनले. दादा हे सहवासाने अनुभवायची प्रवृत्ती, एक विचारधारा होते. आजच्या काळात, जेव्हा वैद्याकीय व्यवसाय संशयाच्या आवर्तात सापडला आहे, समाज भीषण समस्यांच्या गर्तेत फसला आहे, तेव्हा दादांचं जीवन एका दीपस्तंभाप्रमाणे आहे.

‘दर्शन योगेश्वराचे’, संकलन- वैद्या विनायक पं. वैद्या खडीवाले, संगीता खडीवाले, पाने-३०४, देणगी मूल्य- ५०० रुपये.