अमेरिकी लोकांची भटकंती अमेरिकी माणसांसारखा!

अमेरिकी लोकांची भटकंती म्हणजे सारं बिऱ्हाड घेऊन निघायचं आणि कंट्रीसाइड दाखविणाऱ्या बॅकरोडस्वरून भरपूर भटकायचं. कधीही कुठंही थांबायचं. जास्तीत जास्त भाग पायी तुडवायचा. एखाद् दिवसाचा मुक्काम कॅरॅव्हॅनमध्ये करायचा! अशाच तऱ्हेने केलेली अमेरिकन भटकंती..

अमेरिकी लोकांची भटकंती म्हणजे सारं बिऱ्हाड घेऊन निघायचं आणि कंट्रीसाइड दाखविणाऱ्या बॅकरोडस्वरून भरपूर भटकायचं. कधीही कुठंही थांबायचं. जास्तीत जास्त भाग पायी तुडवायचा. एखाद् दिवसाचा मुक्काम कॅरॅव्हॅनमध्ये करायचा! अशाच तऱ्हेने केलेली अमेरिकन भटकंती..
अ मेरिकेत अमेरिकी माणसासारखी भटकंती करण्याची कल्पना कशी काय वाटते? अर्थातच भन्नाट, पण अमेरिकन नागरिकांप्रमाणे म्हणजे काय? तर शनिवार-रविवारला जोडून आलेल्या सुटय़ांमध्ये केवळ पाच-सहा दिवसांसाठी घराबाहेर पडायचे नाही तर चांगले महिना, दीड महिन्यांकरिता! सारे सामान, बिऱ्हाड घेऊन निघायचे आणि मुख्य म्हणजे भरधाव वेगाने जाता येणाऱ्या चार-पाच पदरी आंतरराज्यीय रस्त्यांचा कमीतकमी वापर करून, कंट्रीसाइड दाखविणाऱ्या बॅकरोडस्वरून भरपूर भटकायचे.. कधीही व कोठेही थांबायचे. निसर्ग-सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटायचा.. स्थानिक रेस्टॉरंटस्मध्ये आरामात बसून, तेथील लोकांशी गप्पा मारत, नानाविध खाद्यपदार्थ, पेय यांवर मनसोक्त ताव मारायचा.. बार्बेक्युची मजा चाखायची आणि जास्तीत जास्त ग्रामीण भाग पायी तुडवायचा.. त्यात आणखी एक सुप्त इच्छा होती. संपूर्ण भटकंती शक्य नाही, पण निदान एक-दोन दिवसांचा मुक्काम कॅरॅव्हॅनमध्ये, अमेरिकेत शब्द ‘रिक्रिएशन वेहिकल’मध्ये करता आला तर सोन्याहून पिवळे!
मोठय़ा योगायोगाने नऊ वर्षांनी पुन्हा अचानक भेटलेल्या लुसिला व वॉर्नर या अमेरिकन दाम्पत्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकले. लुसिला म्हणाली की, अशी भटकंती करण्यासाठी तुम्हांला निदान महिना, सव्वा महिन्याचा वेळ काढावा लागेल. आम्ही आनंदाने यासाठीची तयारी दर्शवताच, लुसिलाने ४०  दिवसांचा कार्यक्रम आखला. आम्ही लुसिलाच्या होंडा सिव्हिक मोटारीने फिरणार होतो व ७५ वर्षांचा वॉर्नर व ७५ वर्षांची लुसिला आलटून-पालटून गाडीचे सारथ्य करणार होते.
सर्वच पाश्चात्य देशांत ‘जी. पी. एस.’ मशीन म्हणजे मोटारीने फिरणाऱ्या पर्यटनप्रेमींचा अत्यंत जवळचा सोबती. पण धाडसी अमेरिकन पर्यटकांना या ‘जीपीएस’चा सहवास फारसा पसंत पडत नाही. त्याच्यामुळे प्रवास चाकोरीबद्ध होतो, ही त्यांची मुख्य तक्रार. म्हणून प्रचंड मोठमोठय़ा ‘रोड मॅप्स’चाच उपयोग करणे त्यांना आवडते. या मॅप्समध्ये डोके खुपसून, रस्त्यांचा अभ्यास करणे हा त्यांचा आवडता छंद. लुसिलाही त्याला अपवाद नव्हती.
या प्रवासातील रस्ते, स्थळे, गावे, उद्याने यांची निवड करताना अमेरिकेच्या ‘रूरल प्लेडरल टेलिव्हिजन चॅनेल’वरील ‘कंट्री रिपोर्टर’ या कार्यक्रमाचा उपयोग झाला.
कोलोरोडो स्टेटच्या डोंगराळ भागात आम्ही फिरत असताना, समोर मोठा फलक दिसला. ‘अल्फ्रेड पॅकर मॅसॅकर साईट’. खाली उतरलो व फलकावरचा मजकूर वाचला आणि अक्षरश: हादरलोच.. युगांडा देशाचे प्रमुख ईरी अमीन, माणसाचे मांस खात असत, असे वाचनात आले होते. अन्न-पाण्यावाचून तडफडत असताना सोबतच्या पाच माणसांना ठार मारून, त्यांचे मांस खाण्याच्या कथेवर तुमचा विश्वास बसेल? पण कोलोरोडोच्या डोंगराळ भागातील ही सत्यकथा आहे.
अल्फ्रेड पॅकर हा सराईत गिर्यारोहक अन्य पाच नवशिख्या गिर्यारोहकांना घेऊन १८७४ च्या हिवाळ्यात कोलोरोडोच्या या डोंगराळ भागात आला. ते सहाहीजण भीषण हिमवादळात सापडले. त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर एके दिवशी पॅकर एकटाच परतला. ‘बाकीचे पाचजण कोठे आहेत,’ असे विचारता तो म्हणाला की, त्या पाच जणांनी एकमेकांना मारून त्यांचे मांस खाल्ले. बऱ्याच चौकशीनंतर आपणही एकाला मारून, त्याचे मांस खाल्ल्याचे त्याने कबूल केले. स्वसंरक्षणासाठी हे कृत्य केल्याचे त्याने बचावाकरिता सांगितले.
त्या वर्षीच्या उन्हाळ्यात याच जागी त्या पाचही जणांची प्रेते मिळाली. त्यांची डोकी फोडली होती व बरेच मांस खाल्ल्याच्या खुणा होत्या. पॅकरवर पाच जणांचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण तो कोलोरोडोतून पळून गेला. नऊ वर्षांनी वायोमिंग स्टेटमध्ये तो मिळाला. त्याच्याविरुद्ध खटला चालला. पाच जणांना मारून, त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याला ४० वर्षांची शिक्षा झाली. १५ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका झाली व १९०७ मध्ये त्याचे निधन झाले. पण कोलोरोडोच्या इतिहासातील या कमालीच्या धक्कादायक घटनेबद्दल पॅकरने अखेपर्यंत मौन बाळगले. ज्या जागेवर त्या पाच जणांची प्रेते मिळाली, तेथे आता या सर्व घटनेची माहिती देणारा मोठा फलक लावण्यात आला असून, त्या पाचही जणांची स्मारके तेथेच आहेत.
न्यूमेक्सिको स्टेटमधील अलबुकर्क हे शहर, आंतरराष्ट्रीय बलुन फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नऊ दिवस हा महोत्सव असतो व साऱ्या जगातून उत्साही मंडळी त्याला हजेरी लावतात. आमचा एक दिवसाचा मुक्काम अलबुकर्कला होता. त्यामुळे या उत्सवात सहभागी होता आले. अलबुकर्कचा परिसर हा स्वच्छ वाळवंटासाठी प्रसिद्ध. येथील फिआस्टा पार्कच्या पूर्वेकडे साडेदहा हजार फूट उंचीच्या सँडिया पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस प्राचीन होल्कॅनिक कोन्स. या भौगोलिक परिस्थितीमुळे येथे खास वातावरण निर्मिती होते व त्याला ‘बॉक्स’ असे म्हणतात. त्यामुळे बलुनच्या वैमानिकास कोणत्याही दिशेने बलून उडवणे शक्य होते. बलुन विहारास येथील हवा, वातावरण सर्वदृष्टींनी अनुकूल ठरते. फेस्टिव्हलमध्ये प्रचंड मोठय़ा आकारांचे, रंगीबेरंगी, शेकडो बलून्स सहभागी होतात. सकाळच्या वेळी संपूर्ण आकाशच या बलुन्सनी भरून जाते. ते दृश्य मोठे मनोहर असते.
बलुन्सचा आकार भिन्न असतो. काही तर सात मजली उंचीचे होते. बलुन्सच्या खाली लहान-मोठी  ‘कॅनोपी’ असते. त्यात उभे राहून आजुबाजूचे आकाश, सभोवतालचा प्रदेश पाहाता येतो. आठ-दहा किंवा चार-पाच जणांची अगर फक्त दोघांसाठीही कॅनोपी उपलब्ध असतात. अत्यंत कुशल, अनुभवी लोक पाच लक्ष बलुन्सचे सारथ्य करतात. या  उड्डाणात ते एवढे प्रवीण असतात की, बलुन्सची टक्कर वगैरे अपघात कधीही होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात येते. हजार फूट उंचीपर्यंत बलूनमधून  नेले जाते. बलुनची सफर अगदी लवकर सकाळी सहा वाजता सुरू होते. त्याचा शेवट पारंपरिक पद्धतीने शँपेनचा किंवा फळांच्या रसाचा टोस्ट करून केला जातो. आणि तुमच्या या धाडसी उड्डाणाचे कौतुक म्हणून तुम्हाला प्रमाणपत्रही देण्यात येते.
अमेरिकेत ‘रूट ६६’ वरील प्रवास हा अत्यंत लोकप्रिय मानला जातो. अमेरिकेतला हा पहिला हायवे. त्याच्यावर चित्रपट निघाले. अनेक आंतरराष्ट्रीय सहल कंपन्यांच्या ‘रूट ६६’ या नावाच्या सहलीही आहेत. एकूण पाच स्टेटस्मधून तो जातो. आम्ही अलबुकर्क येथून याही मार्गावरून प्रवास केला.
अमेरिकेच्या कंट्रीसाईडमध्ये जवळजवळ १४ हजार कि.मी.चा प्रवास करून आम्ही अखेरच्या टप्प्यात डलास येथे आलो. त्याच्या जवळच असलेले ‘फोर्ट वर्थ’ हे ‘काऊबॉय’साठी प्रसिद्ध असलेले गाव. काऊबॉय टाऊन म्हणूनच ते ओळखले जाते. तेथे जाऊन, काऊबॉइज्चे जीवन, त्यांचे राहणीमान आणि मुख्य म्हणजे तेथील जनावरांचा बाजार पाहायचा होता. दुपारीच ‘फोर्ट वर्थ स्टॉक यार्ड’च्या प्रवेशद्वारापाशी आलो. सारा माहोल काही आगळा-वेगळाच. काऊबॉयची वैशिष्टय़पूर्ण हॅट, पायात उंच बूट, अंगात रंगीबेरंगी कपडे व अनेकांच्या हातात, बिअरची बाटली. सर्व वयोगटांतील काऊबॉइज, गर्ल्स चौकात फिरत होते. काही जण घोडय़ावर स्वार झाले होते. त्या सर्वाच्या आजुबाजूला दिसत होत्या, लांब शिंगांच्या गाई.
थोडे पुढे गेलो, तर एका चौकात ‘काऊबॉय व्हॅगन्स’चे प्रदर्शन भरले होते. पूर्वीच्या काळी हे काऊबॉय व त्यांच्या जनावरांचे थवेच्या थवे निघत व निरनिराळ्या गावी, त्यांचा मुक्काम पडत असे. सोबत काऊबॉय व्हॅगन्स असत. म्हणजे त्यांचा संसार ओढून नेणारी गाडी दिडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या व्हॅगन्सही प्रदर्शनात होत्या. आजही त्या अगदी चकचकीत ठेवण्यात आल्या होत्या. आता काळ बदलला.. सुबत्ता आली.. त्या व्हॅगन्सची जागा ‘कॅटल्स युटिलिटी ट्रेलर्स’नी घेतली. घोडय़ांच्या वाहतुकीसाठी ‘हॉर्स ट्रेलर्स’ आले. तेही प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. रेसेससाठी किंवा विक्रीकरता, एकावेळी चार घोडय़ांना ट्रेलरमधून नेण्याची व्यवस्था होती. आणि त्यांच्या मालकांसाठी ट्रेलसमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध होत्या. ही दोन टोकं पाहताना मजा वाटली.
लांब शिंगांच्या गाईंचा कळप हे फोटवर्थ शहराचे चिन्ह आहे.  येथे फार पूर्वीपासून जनावरांचा बाजार भरतो. त्यांची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होते. हा व्यवहार होणाऱ्या शंभर वर्षांपूर्वीच्या इमारती आजही पाहायला मिळतात. या बाजाराच्या निमित्ताने शेकडो काऊबॉईज, गर्ल्स एकत्र जमत. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या त्या काळातील ‘सलून्स’मधील वातावरण आजही तसेच आढळते. आता या गावात दिवसातून दोन वेळा गुरांची मिरवणूक निघते. लांब शिंगांच्या गाईंना सजविण्यात येते आणि रंगीबेरंगी पोषाख केलेले काऊबॉईज, गर्ल्स चालत किंवा घोडय़ांवर बसून त्यात सामील होतात. शेकडो रसिक पर्यटक ही मिरवणूक पाहण्यासाठी जमतात.
अमेरिकेच्या ग्रामीण भागात भटकताना अशी अनेक आगळीवेगळी ठिकाणे पाहिली. दोन दिवसांचा मुक्काम व प्रवास ‘कॅरॅव्हॅन’मध्ये होता. अमेरिकेत त्याला ‘आरव्ही’ म्हणतात. आमची आरव्ही दोन बेडरूम्सची होती. आरव्ही म्हणजे चार पायांचे फिरते घर. त्यातील सजावट अप्रतिम म्हणावी लागेल. तीत प्रवेश करताच, सीटिंग रूम, त्यात दोन अलिशान सोफे व मध्ये सेंट्रल टेबल. समोर मोठय़ा स्क्रीनचा टीव्ही व शेजारीच वाईन बार. कोपऱ्यात किचन व चार माणसांचे डायनिंग टेबल-खुच्र्या. किचनमध्ये स्वयंपाक करण्याची सर्व अत्याधुनिक साधने. शेजारच्या दोन बाजूंना दोन बेडरूम्स व समोर एक बाथरूम. एका बेडरूममध्ये दोघेजण अगदी आरामात झोपू शकतील एव्हढे मोठे बेडस्.
दिवसाचे ४०-५० डॉलर्स देऊन कॅरॅव्हॅन तेथे लावता येते. दिवसभर कंट्रीरोडस् वरून भरपूर भटकायचे, कोठेही थांबायचे. आरव्हीच्या बाहेर बार्बेक्युची व्यवस्था असते. कडाक्याच्या थंडीत बार्बेक्युमध्ये मस्त चिकन भाजायची, आरव्हीत बसून वाईनबरोबर त्यावर ताव मारायचा आणि ताणून द्यायची, असा आमचा कार्यक्रम असायचा. आरव्ही कुठेही लावली, की तिचा फोल्ड केलेला भाग बाहेर काढता येतो व त्याची रूंदी चांगली चार-पाच फुटांनी वाढते. प्रवासाला निघताना हा भाग पुन्हा फोल्ड करायचा, की त्याची रूंदी नेहमीच्या वाहनाप्रमाणे होते.
अमेरिकेच्या सव्वा महिन्याच्या भ्रमंतीत टेक्सास, न्यू मेक्सिको, बायोमिंग, साऊथ डेकोटा, मोंरावा, अ‍ॅरिझोना, आयडा हो, उत्ताह, कोलोरोडो व वॉशिंग्टन अशा १० राज्यांच्या ग्रामीण भागांत मनसोक्त फिरलो. प्रत्येक ठिकाणची खाद्यवैशिष्टय़े निरनिराळी, पण कायमचे लक्षात राहिले ते न्यू मेक्सिकोतील स्थानिक इंडियन्सच्या (आदिवासी) कॅसिनोमधील झणझणीत जेवण, तिखट पदार्थ्यांच्यात हे भारतीय आणि मेक्सिकनच्याही एक पाऊल पुढे. त्यांचे होममेड ब्रेडस् एकदम प्रसिद्ध. सोबत चिकन किंवा बीन्स. त्याच्यावर तांबडय़ा अगर हिरव्या मिरच्यांचा रस्सा. वर चीज, लॅटिव्हची पाने व टोमॅटो यांची सजावट. बरोबर थंडगार स्थानिक बिअर.. आणि तांबडय़ा मिरच्यांच्या ‘साल्सा’ नावाच्या लालभडक सॉसमध्ये बुडवून खाण्यासाठी चिप्स.
अशी होती अमेरिकेत अमेरिकन्सप्रमाणे भटकंती. कंट्रीसाइडसोबत अमेरिकेतील १३ राष्ट्रीय उद्याने, तीन महत्त्वाची राष्ट्रीय स्थळे  व सहा राज्यांची उद्यानेही यावेळी पाहता आली. लुसिला व वॉर्नर या अमेरिकन दाम्पत्यामुळेच हा आगळावेगळा प्रवास शक्य झाला. त्यांच्या उत्साहाला सलाम करून आम्ही अमेरिकेचा निरोप घेतला..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tour america