scorecardresearch

Premium

समतेसाठी झगडणारी सत्यशोधक

डॉ. गेल ऑम्वेट या शोषणमुक्तीच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या पिढीच्या प्रतिनिधी होत्या.

समतेसाठी झगडणारी सत्यशोधक

डॉ. गेल ऑम्वेट या शोषणमुक्तीच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या पिढीच्या प्रतिनिधी होत्या. त्यासाठी त्या अमेरिकेतून भारतात आल्या. महाराष्ट्रातील वाडय़ा-वस्त्या, तांडे फिरल्या. ऊन, पाऊस, वादळवारे  अशा कशाचीही पर्वा न करता त्या ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या. अनेकांशी त्यांनी वैचारिक वाद-चर्चा केल्या. दलित, आदिवासी, स्त्रिया, शेतकरी तसेच पर्यावरण चळवळीचा त्या संवादपूल झाल्या. अशा या चतुरस्र

व्यक्तिमत्त्वाचा वेध..

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

डॉ. देवकुमार अहिरे

१९६०-७० चे दशक हे जगभरातील इतिहासाच्या दृष्टीने अनेक अर्थानी महत्त्वाचे ठरले. कारण एकीकडे शीतयुद्धामुळे आफ्रिका-आशिया खंड हे जागतिक घडामोडींचे केंद्र बनले होते, तर दुसरीकडे प्रस्थापित व्यवस्थेला नकार देत संपूर्ण जगात तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या तसेच नागरी हक्कांच्या चळवळींचा उदय होत होता. अशा वेळी अमेरिकेतून डॉ. गेल ऑम्वेट ही एक गौरवर्णीय मुलगी संशोधनासाठी भारतात येते आणि पुढे भारतातील डाव्या चळवळी, त्याचबरोबर अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय होते ही गोष्ट अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. या काळातील व्यक्ती, विचार आणि प्रक्रिया या जागतिक  इतिहासाच्या संदर्भात समजावून घेतल्या तर अनेक धागेदोरे उलगडतात.

डॉ. गेल ऑम्वेट ज्या काळामध्ये भारतात संशोधनासाठी आल्या त्या काळात- म्हणजे शीतयुद्धाच्या कालखंडात- पहिल्या जगातील (भांडवली देशांतील) अनेक तरुण मंडळी तिसऱ्या जगात क्रांतिकारी चळवळीत सहभागी होण्यासाठी येत होती. त्यातही प्रामुख्याने युरोप- अमेरिकेतील डाव्या विचारांचा प्रभाव असलेली तरुण मंडळी अधिक होती. याच काळात अमेरिकेतून आलेल्या अनेकांकडे संशयाने पाहण्याची रीत होती. ही मंडळी

सी. आय. ए. एजंट असण्याची शक्यता डाव्या चळवळीत वर्तवली जात होती. कारण शीतयुद्धाचे सांस्कृतिक डावपेचात्मक राजकारणही या काळात आकारास येत होते. संशोधन, लेखन, साहित्य चर्चा-वर्तुळे, वृत्तपत्रीय लिखाण ही सांस्कृतिक शीतयुद्धाची रणभूमी होती. ‘कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ ही संघटना सी. आय. ए.च्या धोरणानुसार चालत होती आणि त्यामध्ये बऱ्याच मराठी विद्वानांचाही सहभाग होता असे आज अनेक कागदपत्रांच्या आधारे सिद्ध झाले आहे. परिणामी डॉ. गेल ऑम्वेट यांच्याकडेही काहींनी सुरुवातीला संशयाने पाहिल्याच्या आठवणी आहेत. म्हणून त्यांचे व्यक्तिगत आयुष्य प्रथम समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. गेल यांचा जन्म मिनिसोटा राज्यातील मिनिआपोलीस या शहरामध्ये १९४१ साली झाला. त्यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी युरोपातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. गेल यांचे आजोबा ऑगस्ट ऑम्वेट हे टू हार्वर या शहरात राहत होते. तेथील स्थानिक डेमोक्रेटिक फार्मर लेबर पार्टीतून ते चार वेळा राज्य प्रतिनिधी (आमदार) आणि दोन वेळा महापौर म्हणून निवडून आले होते. डॉ. गेल यांचे आई-वडील दोघेही याच पक्षाचे कार्यकर्ते होते. अमेरिकेतील राष्ट्रीय राजकारणात हा पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचा भाग असतो. त्यामुळे पुढील काळात डॉ. गेल याही विद्यार्थी चळवळ, नागरी हक्क चळवळ तसेच युद्धविरोधी चळवळीत सहभागी झाल्या. त्यांच्या कुटुंबाची परंपराच मुळी श्रमिक आणि कामगारांच्या बाजूची होती.

तत्कालिन युगधर्माप्रमाणे इतर तरुणांसारख्याच गेल ऑम्वेट याही तिसऱ्या जगाला समजून घेण्यासाठी संशोधक विद्यार्थी म्हणून भारतात आल्या. त्यावेळी डॉ. एलिनोर झेलीएट यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले होते. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास’ या विषयावर संशोधन करत असताना त्यांनी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती, संस्था, ग्रंथालये, व्यक्तिगत संग्रह, पुराभिलेखागारे धुंडाळली. विदर्भ, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रचंड पायपीट केली; तेव्हा कुठे सत्यशोधक समाजावर दीर्घकाळानंतर महत्त्वाचे संशोधन होऊ शकले. तोपर्यंत आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास लेखनात सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीवर अभिजनवादी दृष्टिकोनातून संकुचित व साचेबद्ध मांडणी केली जात होती. डॉ. गेल यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्रातील वैचारिक चर्चाविश्व आमूलाग्र बदलले. त्या एकीकडे संशोधन करीत होत्या आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील डाव्या चळवळी आणि व्यक्तींच्या संपर्कात होत्या. महाराष्ट्रातील लाल निशाण पक्ष, नवमार्क्‍सवादी गट, फुले-आंबेडकर-मार्क्‍स (फुआमा) गट, मार्क्‍स-फुले-आंबेडकरवाद (माफुआ), बामसेफ, ओबीसी आणि स्त्रीमुक्ती चळवळीशी त्यांचा नजीकचा संबंध आला.

पीएच. डी.चे संशोधन पूर्ण झाल्यावर आणि डॉ. भारत पाटणकरांशी लग्न केल्यानंतर त्यांनी भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच त्यांची एक अभ्यासक आणि एक कार्यकर्ती म्हणून दुहेरी जीवनास भारतीय शैक्षणिक संस्थेत आणि सामाजिक चळवळींमध्ये सुरुवात झाली. शैक्षणिक संस्था आणि संशोधन क्षेत्रात डॉ. गेल यांनी ‘समाजशास्त्रज्ञांमध्ये इतिहासकार’ आणि ‘इतिहासकारांमध्ये समाजशास्त्रज्ञ’ म्हणून भूमिका निभावली. देशविदेशातील विद्यापीठे, केंद्रे आणि जागतिक संस्थांमध्ये प्राध्यापक, संशोधक आणि सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले. हे सर्व करत असतानाच त्यांनी विपुल ग्रंथसंपदाही निर्माण केली. त्यापैकी अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’, ‘सीकिंग बेगमपुरा’, ‘आंबेडकर टूवर्डस् एनलायटन इंडिया’, ‘दलित व्हिजन’, ‘दलित अँड डेमोक्रेटिक रेव्होल्युशन इन इंडिया’, ‘अंडरस्टँडिंग कास्ट- बुद्धा’, ‘आंबेडकर अँड बीयाँड’, ‘वी विल स्मॅश धिस प्रीझन’, ‘न्यू सोशल मुव्हमेंट इन इंडिया’, ‘व्हायलन्स अगेन्स्ट वीमेन’, ‘जेंडर अ‍ॅंड टेक्नॉलॉजी’, ‘बुद्धिझम इन् इंडिया’, ‘साँग्ज ऑफ तुकोबा’ यांचा समावेश होतो.

डॉ. गेल यांनी त्यांच्या लिखाणातून  सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळ, शेतकरी चळवळ, स्त्री-चळवळ, प्रति- सरकार, पर्यावरण आणि युवक चळवळींचा मागोवा घेतला. तसेच मार्क्‍स, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत रोहिदास आणि बुद्ध यांच्याविषयी सैद्धांतिक मांडणी केली. ‘इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल वीकली’, ‘सोशल सायंटिस्ट’, ‘जर्नल ऑफ साउथ एशियन स्टडीज’, ‘जर्नल ऑफ मॉडर्न एशियन स्टडीज’ या इंग्रजी तसेच ‘मागोवा’, ‘तात्पर्य’, ‘समाजप्रबोधन पत्रिका’, ‘बायजा’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अशा मराठी वैचारिक आणि अकादमिक नियतकालिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले.

समाजशास्त्रज्ञ आणि अभ्यासक म्हणून

डॉ. गेल ऑम्वेट जेवढय़ा प्रसिद्ध होत्या, तेवढीच प्रसिद्धी त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक चळवळीच्या नाळेमुळे त्यांना मिळाली. धुळे-नंदुरबारमधील श्रमिक संघटना, स्त्री-मुक्ती संघटना यांच्याशी डॉ. गेल यांचा निकट संबंध होता. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली दुष्काळ निर्मूलन, समान पाणीवाटप, स्त्री-मुक्ती संघर्ष चळवळ, विठ्ठल- रखुमाई आंदोलनाच्या बौद्धिक व सैद्धांतिक कामात आणि मोर्चामध्ये डॉ. गेल यांचा महत्त्वाचा सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, नर्मदा- सरदार सरोवर आंदोलनामध्येही डॉ. गेल सक्रीय सहभागी झाल्या होत्या. मराठी साहित्य चळवळी तसेच सांस्कृतिक राजकारणामध्येही ऑम्वेट यांनी सहभाग घेतला. डॉ. गेल यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकारी डॉ. कुंदा प्र. नी. यांनी दोघींतील काही पत्रव्यवहार समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला. त्यामध्ये दिसून येते की डॉ. गेल महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांत अभ्यास आणि चळवळ या दोन्हीसाठी हिंडत असताना तिसऱ्या जगाचा कानोसा नेहमीच घेत असत. फिलिपाईन्स, निकारागुआ या देशांमध्ये क्रांतिकारी चळवळी काय करत आहेत, युरोपातील डावे पक्ष आणि नवमार्क्‍सवादी चळवळींच्या भूमिका काय आहेत, या गोष्टी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना समजाव्यात म्हणून डॉ. गेल त्याविषयी चर्चा करत. यादरम्यान त्यांनी इंग्रजी लेखांचे अनुवादही विपुल केले. दलित, आदिवासी आणि ग्रामीण साहित्य सभा, विद्रोही साहित्य चळवळीच्या त्या सुरुवातीपासून सोबत होत्या. त्या वेगवेगळ्या सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय चळवळींशी संबंधित होत्या. आंदोलन आणि मोर्चामध्ये भाग घेत होत्या. म्हणूनच त्यांना सिद्धांतासोबतच (थिअरी) व्यवहारही (प्रॅक्टिस) अत्यंत महत्त्वाचा वाटत असे.

डॉ. गेल यांच्या सैद्धांतिक मांडणीने त्यांचा व्यवहार घडवला आणि त्यांच्या व्यवहाराने त्यांची सैद्धांतिक बैठक समृद्ध केली.

वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचे ताणेबाणे आणि स्थित्यंतरांचा अभ्यास करता करता डॉ. गेल ऑम्वेट यांचेही वैचारिक स्थित्यंतर आणि सैद्धांतिक विकास झाला. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंडा’चा अभ्यास करताना त्या मार्क्‍सवादी होत्या. पुढे नवमार्क्‍सवादी फुले, आंबेडकर आणि बौद्धवादी झाल्या. कारण ‘बुद्धिझम इन इंडिया’ या ग्रंथामध्ये ‘आंबेडकरी बौद्ध धर्मच नव्या युगाचे वैचारिक दिग्दर्शन करू शकतो,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळेच डॉ. भारत पाटणकर हे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बौद्धिक शाहीर’ असे म्हणतात. असे असले तरी त्यांनी मार्क्‍सला पूर्णपणे कधीच नाकारले नाही.

डॉ. गेल शोषणमुक्तीच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या पिढीच्या प्रतिनिधी होत्या. त्यासाठी त्या भारतात आल्या. महाराष्ट्रातील वाडय़ा-वस्त्या, तांडे फिरल्या. त्या ऊन, पाऊस काहीही न पाहता ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या. अनेकांशी वैचारिक वाद, चर्चा केल्या. दलित, आदिवासी, स्त्रिया, शेतकरी, पर्यावरण चळवळींचा त्या संवादपूल झाल्या आणि शेवटी स्मृतिभ्रंश होईतो पर्यायी स्वप्नसृष्टीचा शोध घेत राहिल्या. डॉ. गेल ऑम्वेट यांची महाराष्ट्राच्या वैचारिक सृष्टीला आणि ज्ञानव्यवहाराला नेहमीच उणीव भासेल.

devkumarahire@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आहेत.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-08-2021 at 00:35 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×