डॉ. शरद वर्दे vardesd@gmail.com

२४ मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात जगभरात अनेक आमूलाग्र बदल झाले. परंतु करोनाचा कहर आता काहीसा ओसरल्यासारखा वाटत असल्याने माणसांचं जीवन पुन्हा पूर्वपदावर आलेलं आहे. जणू मधल्या काळात काहीच घडलेलं नाही असं माणसं वागू लागली आहेत.

How Much Rice & Roti You Should Eat In a Day
एका वेळच्या जेवणात भात व पोळ्यांचे आदर्श प्रमाण किती हवे? ताटात कुठल्या गोष्टी किती टक्के हव्यात? तज्ज्ञांनी दिलं सूत्र
superfood needs for a good gut health
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे पाच पदार्थ ठरतील फायदेशीर, वाचा तज्ज्ञ काय सांगतात..
admission process of private schools is already completed the dilemma is how to get admission under RTE
‘आरटीई’ प्रवेशांबाबत पेच; खासगी शाळांचे नवे ‘गाऱ्हाणे’
hair, heat, summer,
Health Special: ग्रीष्मातल्या उन्हाचा केसांवर काय परिणाम होतो?
Can Spicy Food Cause Stomach Ulcers
तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अल्सर होतो का? झणझणीत खायला आवडत असेल तर नक्की वाचा
Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’

मागच्या या करोनाकाळाकडे वळून पाहताना..

दोन वर्षांपूर्वी २४ मार्च रोजी देशव्यापी ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला आणि तो तात्काळ अंमलातही आला. तोवर आपण हा शब्द ऐकलासुद्धा नव्हता. ‘लॉक म्हणजे कुलूप’ इतकंच आपल्याला सार्वजनिक ज्ञान होतं. खाजगी कारखान्यांमध्ये नोकरी केलेल्या मंडळींना लॉकआऊट म्हणजे काय, ते माहीत होतं. खास पाटर्य़ाना हजेरी लावणाऱ्यांना ‘लॉक-इन्’चा अनुभव होता. पोलिसातला एक जण म्हणाला की, लॉकडाऊन आणि लॉकअप यांत फारसा फरक नाही. लॉकअपमध्ये थोडय़ाच लोकांना आत टाकतात, तर लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना कोंडून ठेवतात.

सुरुवातीला या अकल्पित सुट्टीची सर्वाना गंमत वाटली. काहीजण सार्वजनिक गणेशोत्सव बघायला घराबाहेर जातात तसे लॉकडाऊन बघायला दोनचाकीवर बसून बाहेर पडले आणि मार खाऊन परतले. नंतर हळूहळू या परिस्थितीचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येऊ  लागलं. करोना विषाणूमुळे होणाऱ्या ‘कोविड-१९’ (पूर्ण नाव : ‘करोना व्हायरस डिसीज २०१९’) या रोगाचं अभूतपूर्व थैमान दिसू लागलं. काही नातेवाईक आणि मित्र कोविडने त्रस्त झाले. काहींनी प्राण गमावले.

मग जगभर जे काही होत आहे ते महाभयंकर आहे याची तीव्र जाणीव झाली. टीव्ही आणि इतर माध्यमं सचित्र माहिती पुरवू लागली. काय करावं, हे ज्ञानी डॉक्टर आणि काय करू नये, हे अज्ञानी प्रियजन सांगू लागले. आपण अधिकाधिक गोंधळून जात राहिलो आणि हातांपासून भाज्यांपर्यंत जे मिळेल ते साबण लावून खसाखसा घासत राहिलो.

भारत, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर अशा अनेक राष्ट्रांनी देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमांची जमेल तितकी कठोर अंमलबजावणी केली. स्वीडन, दक्षिण कोरिया वगैरे राष्ट्रांचा त्यांच्या नागरिकांच्या शिस्तप्रिय वृत्तीवर ठाम भरवसा असल्यामुळे त्यांनी करोनाबाधा टाळण्यासाठीचे नियम सांगितले, पण लॉकडाऊन टाळला. त्याउलट, कोविडचं उगमस्थान असलेल्या चीनने अमानुषपणे निर्बंधांचं पालन केलं आणि महत्त्वाची माहिती दडवून ठेवली. अजूनही चीन ही करोनाची आई की दाई, ते कळलेलं नाही.

पहिली फेरी आटोपली. निर्बंध शिथिल झाले. आपण हुश्श करतो तोवर दुसरी लाट आली. निर्बंध पुन्हा कडक झाले. ती गेल्यावर तिसरी आली. हे रहाटगाडगं सुरूच राहिलं. शास्त्रज्ञ म्हणाले की, करोना हा एक व्हायरस आहे. त्याचं म्युटेशन सतत होत राहणार. म्हणजे नक्की काय होणार, ते कळलं नाही. तरी हा भस्मासूर अखिल विश्वात ठाण मांडून राहणार आणि आपल्याला सुखाचे चार घास खाताना ठसका लावत राहणार हे मात्र समजलं.

आपल्या शहरांमध्ये आधीच घरं लहान. लॉकडाऊनमुळे सगळेच लोक घरात कोंडून राहिले. आपली संस्कृती हा आपल्या विचारसरणीचा गाभा आहे. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ हे सूत्र आपल्याला मान्य आहे. त्यानुसार काही घरात कर्ता पुरुष किंवा नवरा-बायको दोघंही संगणकावरून कार्यालयीन काम करत होते. एक-दोन मुलांची ऑनलाईन शाळा सुरू होती. आजी-आजोबा टीव्ही बघत होते.. अशी दोन वर्ष उलटली.

मग मात्र लोक कंटाळले. करोना नावाचा शत्रू ‘वाघ म्हटलं तरी खातो, वाघ्या म्हटलं तरी खातो’ हे ठामपणे उमजल्यावर मानसिकता बदलली. समाजजीवन पूर्ववत व्हावं असं राज्यकर्त्यांना आणि जनतेला वाटू लागलं. सतत सातशे दिवस घरकोंबडे झाल्यानंतर कधीतरी ते बंदिस्त जीवन उधळून लावावं असं प्रकर्षांने वाटणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे तिसरी लाट ओसरल्यावर बंड केल्यासारखी ही मंडळी घराबाहेर पडली. धूमधडाक्यात सण साजरे करू लागली आणि खरेदी, हॉटेलिंग व गेट टुगेदर दणक्यात पार पाडू लागली.

जगातल्या इतर काही देशांची संस्कृती वेगळी. तिथल्या लोकांनी सुरुवातीपासूनच दंड थोपटले आणि करोनाला घाबरायचं नाही असं ठरवलं. त्यांच्या दणकट तब्येतीवर त्यांचा प्रचंड विश्वास. त्यांनी मास्क लावणं, एकमेकांपासून अंतर राखणं, हात धुणं वगैरे करोनाविषयक निर्बंध फारसे पाळले नाहीत. असे अनेक लोक करोनाबाधित झाले; पण तीव्र मानसिक आणि शारीरिक कारणांमुळे त्यांच्यात कोविडची लक्षणं दिसलीच नाहीत. शिवाय कोविडची बाधा झालीच तर थेट इस्पितळात जायचं, पण नेहमीची जीवनशैली बदलायची नाही, हा हेका त्यांनी सोडला नाही. अशा ठिकाणी शिक्षणसंस्था आणि कार्यालयं सुरूच राहिली. फक्त वयस्कर आणि आजारी लोक घरी बसले. बाकीच्यांची आयुष्यं फारशी बदलली नाही.

परंतु नाही म्हटलं तरी सर्व देशांमध्ये आणि समाजांमध्ये लक्षणीय म्हणावे असे सामाजिक आणि आर्थिक बदल झालेच. कूपमंडूक माणसं अधिकच एककल्ली झाली. वस्तूंच्या टंचाईमुळे महागाई वाढली. अनोळखी माणसांवरचा अविश्वास वाढला. अनेक ठिकाणी अगदी उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ लोकांनीही संधीचा फायदा उपटून अवैध कमाई केली.           

आता दोन वर्षांनंतर सगळं काही पूर्वीसारखं होईल का? या दोन वर्षांत जे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक बदल घडले ते गंभीर की मामुली? तात्कालिक की कायमस्वरूपी? आणि ज्या गोष्टी पूर्ववत होणार नाहीत, त्यामुळे सामान्य जीवनावर काय परिणाम होतील?

आतापर्यंत जगातल्या तब्बल ४६ कोटी लोकांना बाधा झालेल्या या कोविड रोगाने साठ लाख रुग्णांचे प्राण घेतले. लॉकडाऊनच्या कालखंडात जगभरातल्या किमान वीस कोटी अधिकृत कर्मचाऱ्यांचा रोजगार लोप पावला. भारत आणि इतर अनेक विकसनशील देशांत गडी, मोलकरणी, निरोपे असे रोजगारही अगणित असतात, तेही बुडाले. कामं बंद पडल्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना अपार कष्ट सोसावे लागले. त्यापैकी बरेच लोक दूरवरच्या भागांमधून आलेले असल्यामुळे त्यांच्या स्वत:च्या घरी पोहोचणं त्यांना खूप त्रासदायक गेलं. पहिली लाट ओसरल्यावर ते पुन्हा शहरात आले. पण लगेच दुसरी लाट आली आणि लॉकडाऊन अंक दुसरा सुरू झाला. त्यामुळे मग जे परत गेले ते गावातच शेती-बागायती करू लागले. शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या अशी अचानक वाढली.

विकसित देशांमध्ये अगदी वेगळं चित्र दिसलं. ते देश श्रीमंत आणि सरकार कनवाळू. त्यामुळे ज्यांचा रोजगार बुडाला त्यांना सरकारं किमान मजुरीदराने पैसे देऊ  लागली. अनेक ठिकाणी खरं तर त्याच दराने पगार मिळत होता. दहा-बारा तास राबलं की जितकी कमाई होत होती तितकीच घरबसल्या मिळू लागली. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाला तरी हे लोक कामावर जायचं टाळायला लागले. सरकारकडून पैसे मिळतच राहिले. ट्रकचालक घरी बसले. तसेच गोदी कामगार, बांधकाम मजूर, सफाई कर्मचारी आणि आरोग्यसेवेतलेही अनेक स्त्री-पुरुष घरी निवांतपणे बिअर पीत बसले.

या निष्क्रिय मानसिकतेचा एक परिणाम असा झाला की दोन्ही वर्षी दुकानांपर्यंत माल पोहोचलाच नाही. या प्रगत राष्ट्रांनी तीसएक वर्षांपूर्वीच साबणापासून थेट संगणकाच्या निर्मितीपर्यंतचे स्वत:चे कारखाने बंद केले आणि चीन, तैवान, व्हिएतनाम अशा अनेक पूर्व आशियातल्या देशांमध्ये त्या चीजा स्वस्तात मिळतात म्हणून तिथून घ्यायला सुरुवात केली. सालाबादप्रमाणे तिथून प्रचंड प्रमाणात माल निघाला. पण यूरोप-अमेरिकेतल्या बंदरांमध्ये तो उतरून घ्यायला पुरेसे कामगारच नव्हते. उतरलेला माल न्यायला पुरेसे ट्रकचालक नव्हते. परिणामी या मालवाहतूक बोटी तब्बल दोन-दोन महिने समुद्रातच अडकून पडल्या. दुकानांतल्या वस्तूंचे भाव अतोनात वाढले.

अजूनही या देशांमध्ये घरबसलेपणा सुरूच आहे. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या वाढल्या. सिगरेटी फुंकणं आणि दारू ढोसणं ही व्यसनं कालबा झाली. त्यांची जागा ड्रग्जनी घेतली. त्याची फलश्रुती घराघरांत कलहांमध्ये आणि घराबाहेर बंदूकबाजीत झाली. गुन्हेगारी वाढली. कुटुंबं अधिक वेगाने तुटली.

हल्ली कोणी नोकरी मागायला आलं तर खूप चिकित्सा न करता कामावर ठेवून घ्या, असे आदेश पाश्चात्त्य देशांतल्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या मनुष्यबळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. तरीही जवळजवळ प्रत्येक दुकानात आणि इतर आस्थापनांबाहेर सरकारी दरापेक्षा जास्त पगारावर नोकरी उपलब्ध आहे असे फलक दिसत आहेत.

वर्षभरात करोनावरची प्रतिबंधक लस मिळू लागली. आपल्याला अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे खुद्द आपल्या देशातच दोन लसींचं उत्पादन झालं. पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटने ‘कोव्हिशील्ड’ या लसीच्या उत्पादनासाठी यंत्रसामग्री आयात केली आणि उत्पादनाला सुरुवात केली. भारत बायोटेकने तर स्वत: संशोधन करून ‘कोव्हॅक्सिन’ ही लस तयार केली आणि तिचं स्वत:च उत्पादन केलं. अमेरिका सोडून इतर कोणत्याही विकसित राष्ट्राला जे जमलं नाही, ते भारतातल्या या दोन खासगी कंपन्यांनी करून दाखवलं.

परिणामी भारतात लस टोचून घेतलेल्यांची संख्या प्रचंड आहे. प्रथम अमेरिका आणि काही काळानंतर इतर देशांमध्ये फायझर व मॉडर्ना आणि नंतर जॉन्सनच्या लशी मिळू लागल्या. पण लस टोचून घेतलेल्यांची संख्या मर्यादितच राहिली. कारण ‘माय बॉडी, माय डिसिजन’ हे तत्त्व राष्ट्रमान्य असल्यामुळे या देशांत अनेक सामान्य ते आरोग्य क्षेत्रातले सुशिक्षित लोकही लस घेत नाहीत.

बरं, या देशांमध्ये समोर बसलेल्या माणसाला ‘तू लस टोचून घेतलीस का?’ हे विचारणं म्हणजे त्याच्या खाजगी जीवनावर केलेला आघात असं समजतात. आपण रिक्षातल्या अनोळखी तिसऱ्या प्रवाशाला ‘तुम्ही व्हॅक्सीन घेतलं का? कुठलं घेतलं? दुसरा डोसही घेतला का?’ असं बिनदिक्कत विचारू शकतो. तो उत्तरही देतो. त्यात त्याच्या खासगी जीवनात आपल्यासारख्या त्रयस्थाने ढवळाढवळ केल्याची त्याला पुसटशीही जाणीव होत नाही.

पण या पाश्चात्त्य देशांमध्ये दुकानातल्या कॅश काउंटरसमोर आपल्या तीन पावलं पुढे उभी असलेली बाई मान मागे करून थाडकन् शिंकली तरी आपण हा प्रश्न तिला विचारायचा नाही. विचारला तर भोगा परिणाम! मास्क न लावलेल्या माणसाला ‘मास्क लाव’ असं किमान निम्मे ठिकाणी सांगता येत नाही. अगदी अशा ठिकाणच्या शाळा-कॉलेजांतही शिक्षक विद्यार्थ्यांला असं सांगू शकत नाहीत.

शाळा-कॉलेजातल्या मुलांमुलींवर या करोना निर्बंधांचा प्रचंड परिणाम झाला आणि ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. विकसनशील देशांनी अथक परिश्रम करून मुलींना शाळेकडे वळवलं होतं. गरीब मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली होती. लॉकडाऊन झाला, शाळांचे दरवाजे बंद झाले आणि ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. ज्यांना परवडलं त्या कुटुंबांनी मुलांसाठी संगणक व्यवस्था केली. पण कनिष्ठ उत्पन्न गटातील पालकांच्या आणि खेडोपाडीच्या मुलांकरता तसंच देशातल्या असंख्य मुलींसाठी ही व्यवस्था अर्थातच होऊ  शकली नाही. आता करोनाचा भर ओसरल्यावर ही मुलंमुली पुन्हा शाळेत येतील का? किती येतील? कधी येतील? मुलं हेच राष्ट्राचं भवितव्य असतं. या भवितव्याचंच करोनाकृत लॉकडाऊनमुळे अपरिमित नुकसान झालं आहे. परिणामी या देशांना नजीकच्या भविष्यकाळात सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक तडाखा बसणार आहे.

विकसित देशांत लॉकडाऊनमुळे शिक्षणव्यवस्थेत विचित्र समस्या निर्माण झाल्या. येथल्या विद्यार्थ्यांकडे संगणक होते. पण किती मुलांचं लक्ष संगणकाकडे होतं, हे कळणं कठीण. कारण घरं मोठी. प्रत्येकाला स्वतंत्र खोली. खोलीचं दार सतत बंद. सख्खे किंवा सावत्र आई-वडीलही दारावर टकटक करून आतून परवानगी मिळाली तरच दार उघडून आत डोकावतात. एकलकोंडय़ा झालेल्या या मुलांमध्ये झालेला अभूतपूर्व बदल दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्यानंतर दिसायला लागला. प्रदीर्घ काळाच्या कोंडमाऱ्यामुळे बारा वर्षांवरची मुलं अचानक आक्रमकरीत्या वागू लागली. मुलींमध्येही बेशिस्त वर्तन वाढलं. स्वच्छतागृहात द्रवरूप साबण ओतून टाकणं, टॉयलेट पेपर उलगडून कचरापेटीत फेकणं, तोटी उघडून टाकीतलं पाणी संपवणं अशा अनेक अकल्पित घटना घडू लागल्या. त्या ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही बसवणं अश्लाघ्य असल्यामुळे हे उद्योग नक्की कोण करत आहे, हे कळणं अशक्यच. बेशिस्त वाढल्यावर अनेक शाळांमध्ये एकेक पोलीस नियुक्त केला गेला. पण तो तरी किती ठिकाणी लक्ष ठेवू शकणार?

वर्गातही अगोचरपणा आणि हाणामारी वाढली. बरं, असं काही करताना कुणी आढळला तर त्या पोराला दोन सणसणीत थपडा लगावायला कायद्याने बंदी आहे. आम्ही शाळेत होतो तेव्हा व्रात्यपणा करताना दिसलेल्या पोराच्या कानाखाली कोणतेही शिक्षक लगावून द्यायचे. घरी त्याबद्दल सांगितलं की जन्मदाता आणि जन्मदात्रीही  एकेक गाल सुजवायचे. इथे साधा हात उगारला तरी कारटं पोलिसांना फोन लावतं. कहर म्हणजे काही मुलं पिस्तूल, बंदूक, सुरे वगैरे घरातली हत्यारं शाळेत आणू लागली. गोळीबाराच्या घटना झपाटय़ाने वाढल्या. वर्गबंधू-भगिनींचे खून पडले. काही मुलं गंभीररीत्या जखमी झाली. केवळ अमेरिकेतच अशा तब्बल ३४ अत्यंत गंभीर घटना घडल्या. आपल्याला अचंबित करणारं वास्तव म्हणजे यूरोप-अमेरिकेतल्या अनेक शाळांमध्ये बालमानसोपचार तज्ज्ञाची नेमणूक केलेली असते. कुटुंबव्यवस्था कोसळली की घरातल्या थोरापोरांची टाळकी सटकणारच. लॉकडाऊनपूर्वी चार-पाच शाळांसाठी एक पार्ट टाइम तज्ज्ञ असायचा. वर्गशिक्षिका व्रात्य पोरांना त्यांच्याकडे पाठवून देत असत. आता शाळा पुनश्च सुरू झाल्यानंतर मानसोपचाराची गरज असलेल्या मुलामुलींची संख्या अचानक फुगली. शिक्षिकांना आता अशा व्रात्य मुलांच्या बेताल वागणुकीचा खूप त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळे हा पेशा सोडून कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा मार्ग गेल्या तीन-चार महिन्यांत सुमारे एक लाखाहून अधिक शिक्षिकांनी चोखाळला. कंपन्यांनाही सुशिक्षित कर्मचारी हवेच आहेत. त्यामुळे या शिक्षिकांना नवीन नोकरीही झटकन् मिळाली.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेबाहेर निघून गेले ते केवळ विकसनशील देशांमध्येच नाही, तर विकसित देश भांडवलशाही प्रणाली चोखाळत असल्यामुळे तिथे श्रीमंत आहेत तसेच गरीबही आहेत. धनाढय़ अमेरिकेतल्या सधन कॅलिफोर्निया राज्यातलं सॅन फ्रॅन्सिस्को हे नामांकित शहर. या शहराजवळच्या ओकलँड काउंटीतल्या ३३ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल २० हजार विद्यार्थी गायब झाले. त्यामुळे सात मोठय़ा शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

कोण होती ही मुलं? या काउंटीत बेघरांची संख्या मोठी आहे. हे व्यसनी लोक. ते नोकरी करत नाहीत. बरेचसे होमलेस सेंटरमध्ये राहतात. सरकारतर्फेजेवणखाण, कपडेलत्ते आणि औषधपाणी मिळतं. त्यात पुरुष आहेत तशाच स्त्रियाही आहेत. ते एकत्र राहतात. मग मुलं होणारच. किमान ती मुलं तरी बिघडू नयेत म्हणून सरकारने त्यांच्या मोफत शिक्षणाची आणि वह्य-पुस्तकांची सोय केलेली आहे. पण ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांना महाग संगणक कोण देणार? परिणामी लॉकडाऊनमुळे त्यांचं शिक्षण संपलं. आता त्यापैकी किती गुन्हेगार होतील आणि किती सज्जन होतील, हे कोण आणि कसं सांगणार?

लॉकडाऊनमुळे बदललेल्या परिस्थितीचे जसे वाईट परिणाम झालेले आहेत तसेच काही चांगलेही झाले. वाईटातून चांगलं निघतं असं म्हणतात. तसं या लॉकडाऊन काळामुळे समाजजीवनात काही चांगले बदलही झाले. लोकांचा मित्रमंडळींशी संपर्क वाढला. नातेवाईकांविषयी जिव्हाळा वाटू लागला. दोन वर्षांत कित्येक लोक एकाएकी अंतर्धान पावले होते. निकटवर्तीयांना त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नव्हतं. त्यांच्या कुटुंबियांना भेटताही आलं नव्हतं. साहजिकच मागे राहिलेल्यांविषयी आत्मीयता वाढली. आसपासच्या ज्येष्ठ मंडळींची जबाबदारी उचलण्याची तयारी तरुणांनी दाखवली. ज्या घरात एक किंवा दोनच वयस्कर माणसं राहतात त्यांना दररोज दूध, भाज्या, वाणसामान आणून द्यायचं आणि प्रसंगी गरज पडली तर औषधं आणायचं कामही एकेकाने खांद्यावर घेतलं आणि ते निगुतीने पार पाडलं.

आता करोनासारख्या विध्वंसक विषाणूंवर जोमाने संशोधन होईल. नवीन म्युटेशन्स जन्मण्यापूर्वीच त्यांची कुंडली मांडली जाईल आणि त्यांच्यावरची लस तयार करण्याचं काम सुरू होईल. चीनच्या छुप्या विध्वंसक कार्यसूचीबद्दल आता पाश्चात्त्य देशांची खात्री पटायला लागली आहे. त्यामुळे चीनवरचं अवलंबित्व कमी करून त्या वस्तू विश्वसनीय भारतात बनवून घेतल्या जातील.

लॉकडाऊनमुळे शिक्षण ऑनलाईन झालं तसंच कार्यालयीन कामाचं ‘वर्क  फ्रॉम होम’ या नवीन फॅशनमध्ये रूपांतर झालं. ज्या घरात नवरा-बायको दोघंही ‘वर्क फ्रॉम होम’ करतात तिथे त्या दोघांमधल्या कुरबुरी वाढल्या. परिणामी नवरा सहकाऱ्यांशी बोलताना वरचा सूर लावतो. बायको चिडली की ती संगणकाचा कीबोर्ड खटाखटा बडवते. रात्रंदिवस २४ तास एकमेकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे प्रेम आटायला लागलं आणि एकमेकांचे दोष प्रकर्षांने जाणवायला लागले.

घरात बसून ऑफिसचं काम करण्याचे दोन प्रकार आहेत. एक- फक्त संगणकावर काम करणं. दोन- संगणकावर काम करून झूम मीटिंग्जमध्ये भाग घेणं. एक नंबरची मंडळी दिवसभर नाईट ड्रेसमध्येच राहतात. दोन नंबरवाले लोक कडक शर्ट, नेकटाय आणि खाली अर्धी चड्डी, रात्रीचा पायजमा किंवा नुसताच टॉवेल गुंडाळून वावरतात. या मंडळींमध्ये पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही आहेत. त्यांची वेशभूषा या धर्तीची नसेलच असं नाही. ही मंडळी काम करता करता मध्येच इवलासा ब्रेक घेऊन पटकन् भाजीला फोडणी देतात, कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकतात, भांडी घासून टाकतात. ऑफिसच्या वेळातच सगळी घरकामंही उरकतात. लॉकडाऊनचा फायदा झाला तो या मंडळींना. घरूनच काम करायचं तर घर कुठेही असलं तरी काय फरक पडतो? म्हणून अनेकांनी महागडय़ा भागातली घरं विकून दूरवरची स्वस्त घरं घेतली आणि घसघशीत बचत केली. मोठय़ा शहरांत आलेल्या काही जणांनी थेट त्यांच्या मूळ नगरातल्या प्रशस्त घरी मोर्चा वळवला आणि मासिक बचत अनेक पटींनी वाढवली. स्त्रीवर्गाला तर आता दर दिवशी तासभर प्रवास करून ऑफिसमध्ये ये-जा करायचीच नाहीए. लॉकडाऊन उठल्यावर नवऱ्याला मात्र ‘वर्क  फ्रॉम ऑफिस’ करायला लावायचंच असं या बायकांनी ठरवलं आहे. आता जगभरातल्या प्रत्येकाची प्रार्थना हीच आहे की, त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे व्हावं आणि असे विचित्र धक्के  पुन्हा बसू नयेत.