अभिनेत्री जान्हवी कपूरने तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधींची चर्चा ऐकायला आवडेल, असं विधान एका मुलाखतीत केलं आहे. तिच्या या मुलाखतीची सध्या खूपच चर्चा आहे. जान्हवीने अभ्यासपूर्ण मत मांडल्याने सोशल मीडियावर तिचं खूप कौतुक केलं आहे. अभिनेते किरण माने यांनीही तिचा व्हिडीओ शेअर करत मराठी अभिनेत्री व अभिनेत्यांवर टीका केली आहे.
जान्हवी कपूरने तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेज माही’ या चित्रपटाच्या निमित्तानं ‘द लल्लनटॉप’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप रंजक असेल, असं म्हटलं. त्यावर मुलाखतकाराने विचारलं की पुणे कराराच्या आधी त्यांच्यात काय बोलणं झालं होतं? त्यावर जान्हवी म्हणाली, “त्यांच्यातील एक चर्चासत्र ज्यात ते बोलतील की ते कोणत्या गोष्टीबद्दल भूमिका घेतात आणि कशाप्रकारे आंबेडकरांचे व गांधींचे विचार एकाच विषयावर बदलत राहिले, त्यांनी एकमेकांवर आपला कसा प्रभाव पडला. या दोघांनी आपल्या समाजाला खूप मदत केली आहे, त्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल काय वाटतं, यावर त्यांना ऐकणं खूप मनोरंजक असेल.”
आंबेडकर व गांधी यांच्या विचारांबद्दल जान्हवी म्हणाली…
मुलाखतकार म्हणाला, गांधीजींचा आणि आंबेडकरांचा दलित समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. त्यामुळे राज्यशास्त्राच्या वर्गात आजही या विषयावर खूपच चर्चा होतात. खासकरून अस्पृश्यता व दलित याबद्दल दोघांचे विचार खूप वेगळे होते. यावर जान्हवी कपूर म्हणाली, “होय, त्यांची मतं खूपच वेगळी होती आणि मला वाटतं की आंबेडकर सुरुवातीपासूनच अतिशय स्पष्ट आणि ठाम होते, पण गांधींचे विचार हळूहळू विकसित झाले. आपल्या समाजात जी जातीयवादाची समस्या आहे, त्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून माहिती मिळवणं आणि ती जगणं यात खूप फरक आहे.”
किरण मानेंची पोस्ट
जान्हवीच्या या मुलाखतीचा व्हिडीओ किरण माने यांनी फेसबुकवर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.
“जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी… एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय…. अनुभवलाय… त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हॉटस् ॲपवर फॉरर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला ‘इतिहास’ मानणार्या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही!
हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं.
सलाम जान्हवी… खूप खूप प्रेम,” अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.
जान्हवीचं सोशल मीडियावर होतंय कौतुक
जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. “बॉलिवूडच्या हिरोईन्सना शोभेच्या बाहुल्या समजून त्यांना फक्त पैसा आणि प्रसिद्धी हवी असते. त्यांच्याकडे कसलाही सामाजिक दृष्टीकोन नसतो किंवा ऐतिहासिक अभ्यास केलेला नसतो याला छेद देणारा व्हिडिओ.. कंगना राणौतच्या स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांविषयीच्या मुक्तांफळांच्या पार्श्वभूमीवर जान्हवी कपूरकडे या विषयावरील चांगली माहिती आहे,अभ्यास आहे आणि त्यावर ती किती ठामपणे मतं व्यक्त करत आहे, याची झलक या व्हिडिओ मधून दिसत आहे,” अशी कमेंट एका युजरने किरण मानेंच्या पोस्टवर केली आहे.