गोनीदा दुर्गप्रेमी मंडळातर्फे पाचवे दुर्ग साहित्य संमेलन २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान किल्ले सिंहगडच्या पायथ्याशी ‘गप्पांगण’ येथे होत आहे. त्यानिमित्ताने साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी सिंहगडभ्रमणाच्या जागवलेल्या आठवणी..

सिं हगडावर निघालो होतो. आप्पा दांडेकर, नीराताई दांडेकर, त्यांची कन्या वीणा, अण्णा दांडेकर, मी, वासंती वेल्हाळ, कमल वेल्हाळ, प्रभा नावडीकर, भा. रा. भागवत, इंदूताई टिळक, त्यांचा धाकटा मुलगा दीपक, आप्पांना सतत साहाय्याला असणारा घोरवाडीचा मल्हारी असे दहा-बाराजण बसनं सिंहगडाच्या पायथ्याला उतरलो. प्रत्येकाजवळ काही ना काही शिधा, कपडे आणि नेहमी लागणाऱ्या गोष्टी होत्या. तीन आठवडे सिंहगडावर मुक्काम करायचा होता. तारीख-वार विसरून आनंदानं राहायचं होतं.
आम्ही गड चढायला सुरुवात केली. स्वत:चा प्रचंड ऐवज, विस्तार आणि उंची असलेला सिंहगड चढायचा होता. ते त्याचं समोर ठाकलेलं उभेपण छाती दडपून टाकणारं होतं. या सहलीचं नियोजन आप्पाच करत होते. आप्पा झपाटय़ानं चालणारे. अतिशय चपळ. त्यांच्याबरोबर मी होतो. आप्पांनी सांगितलं की, ‘निम्मा गड चढून गेल्यावर तुम्ही कुणी दमलात, शिणलात, मधेच थांबावं वाटलं, तर तिथं असलेल्या मेटावर थांबा. तिथं दोन-चार झोपडय़ा दिसताहेत त्या तुमचं स्वागत करतील. तुम्हाला पाणी, चहा देतील. पण शक्यतो न थांबता गड चढा.’ शेवटापर्यंत आप्पा आणि मी चढत गेलो. बाकी मंडळी थोडी थोडी थांबत वर येत होती. दुपारची उन्हं कललेली होती. सौम्य झालेली होती. १९६० मधल्या एप्रिलचा शेवटचा आठवडा होता.
पूर्वी सदाशिवगड, मिच्छद्रगड, अगाशिव असे लहान लहान गड चढलो होतो, पण सिंहगडासारखा बलदंड गड पहिल्यांदाच चढत होतो. पुणे दरवाजा आला. दरवाजापासूनच गडाची भव्यता जाणवत होती. आप्पा मधून मधून दिसणाऱ्या भोवतालाचा तपशील सांगत होते. मुक्काम लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात करायचा होता. आणि त्या बंगल्याच्या मालकीणबाई.. टिळकांची नातसून इंदूताई टिळक आम्हा सगळ्यांबरोबर आलेल्या होत्या.
आप्पा आणि मी बंगल्यावर पोचलो. जिथं लोकमान्यांचं वास्तव्य झालं, त्या वास्तूत आता आपण आलो आहोत, राहणार आहोत, या भावनेनं मन हेलावून गेलं.
हळूहळू सगळी मंडळी बंगल्यात पोचली. सगळ्यांनी हात-पाय-तोंड धुतलं. ताजेतवाने झाले. चहा झाला. आप्पा चहा न घेणारे. त्यांनी दूध घेतलं. सगळ्यांना भूक लागल्यामुळं फोडणीचे पोहे झाले. स्वयंपाकघराचा कब्जा मोहन वेल्हाळांच्या पत्नी वासंतीबाई, त्यांची नणंद कमल, क ऱ्हाडहून आलेली प्रभा नावडीकर यांनी घेतला. मार्गदर्शनासाठी आप्पांच्या पत्नी नीराताई, त्यांची लहानपणापासूनची मत्रीण इंदूताई टिळक होत्या. पोटात काही गेल्यावर शांत वाटलं.  
उन्हाळ्याचे दिवस होते तरी उंच असलेल्या गडावरील शीतल, सुखद हवा जाणवू लागली. आज दमून आल्यामुळं फक्त जेवणखाण उरकायचं आणि झोपून जायचं असा बेत होता. त्या मोकळ्या, गार हवेत जेवणाला चांगलीच चव आली.
बंगल्याची व्यवस्था पाहणारं एक नवरा-बायकोचं माळ्याचं स्थानिक कुटुंब होतं. त्यांनी बंगला स्वच्छ करून ठेवला होता. देवटाक्याचं मधुर पाणी भरून ठेवलं होतं. बंगल्यापुढचा अंगणाचा भागही स्वच्छ लोटून ठेवला होता. ‘क्वचित साप निघतात; पण सावध राहा,’ असं त्या कुटुंबानं सांगितलं. मग आम्ही गप्पा मारत सुखानं झोपी गेलो.  
आप्पा पहाटेच उठले होते आणि गोड आवाजात ‘उठोनिया प्रात:काळी वदनी वदा चंद्रमौळी’ किंवा ‘राम सर्वागी सावळा, हेमालंकारी पिवळा, नाना रत्नांचिया माळा, अलंकार शोभती’ अशा भूपाळ्यांनी आणि अनेक संस्कृत श्लोकांनी, अभंगांनी, ओव्यांनी त्यांनी वातावरण भरून टाकलं होतं.
आप्पा म्हणाले, ‘मंडळी काल गड चढून दमलेली आहेत. त्यांना अजून झोपू दे. आपण बाहेर पडून पहाटेचा सिंहगड पाहू या.’ बाहेर खूपच गार होतं. हळूहळू धूसर अशा प्रकाशातून सिंहगड उलगडत चाललेला होता. आमच्यापुढं खूप झाडी होती. पाना-फुला-फळांचे गंध हवेत पसरलेले होते; आणि ते मनाला सुखवत होते. हळूहळू कितीतरी पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू येऊ लागले. त्यांत मोराचा स्वतंत्र ठळक आवाज. आणखी कोठल्या कोठल्या अनोळखी प्राण्यांचे आवाज.. उत्तरेकडं खाली दूरात खडकवासला दिसत होतं.
टिळकांच्या बंगल्यासमोर गतशतकातले प्रसिद्ध कादंबरीकार ह. ना. आपटे यांचा ‘उष:काल’ हा बंगला होता. आजूबाजूला ख्रिश्चनांची काही तुरळक घरं होती. ‘उष:काल’ बंगल्यात राजवाडे नावाचे गोरेपान, धिप्पाड, देखणे आर्मीतले ऑफिसर राहायला आलेले होते. सिंहगडावर उद्यान करायची सरकारची योजना होती. तेवढय़ासाठी त्यांची तिथं नियुक्ती झालेली होती. त्यांचे दहा आणि बारा वर्षांचे दोन मुलगे त्यांच्याबरोबर आले होते. आप्पांचा आणि त्यांचा पूर्वपरिचय असल्यामुळं ते बाप-लेक आप्पांना भेटायला आले. आप्पांनी आपण इतके कुटुंबीय इथं मुक्कामासाठी आलो आहोत हे त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, ‘ बरं झालं. तुमची सगळ्यांची आम्हाला सोबत होईल.’ खरं तर त्यांचीच सोबत. त्यांच्याजवळ बंदूक होती.
आम्ही बंगल्यावर परतलो. सगळी मंडळी जागी झालेली होती. आपलं सकाळचं आन्हिक आवरत होती. अप्पांनी सगळ्यांना चहा घेऊन झाल्यावर भटकायला बाहेर पडू या असं सुचवलं. आम्ही बाहेर पडलो. सिंहगडाचा भोवताल आता स्पष्ट दिसत होता.
भरपूर भटकून आम्ही सगळे बंगल्यात परत आलो. बंगला प्रशस्त, चौपाखी होता. पुढचं दालन, मधलं दालन, मागं दोन दालनं. आणि ही सर्व दालनं वरून रंगवलेल्या पत्र्यानं आच्छादलेली. मागच्या दालनात स्वयंपाकाची तयारी होत होती. राखणीसाठी असलेल्या माळी कुटुंबापकी बाई मध्यम वयाची होती. तिनं चुलीवर उत्तम भाक ऱ्या केल्या. झणझणीत कालवण केलं. भात केला. चवीला कच्च्या करवंदांची चटणी केली. आम्ही सकाळच्या फेरफटक्यामुळं भुकेलेलो होतो. जेवणावर तुटून पडलो. मग सगळ्यांनी दुपारची भरपूर झोप घेतली. उठल्यानंतर पुन्हा चहा-खाणं झालं आणि आम्ही गड बघायला बाहेर पडलो. हा रोजचाच कार्यक्रम झाला. संध्याकाळी गडाचा एकेक भाग बघायचा. आप्पा या विशेष भागांची माहिती देत. पिण्याच्या पाण्यासाठी देवतळं होतं, ते पाहिलं. अगदी निर्मळ, पारदर्शक पाणी. तिथं खाली उतरायला अवघड पायऱ्या होत्या. पाण्यात पाय न बुडवता मल्हारीनं पाण्याची कळशी भरून आणली. अत्यंत चवदार असं पाणी होतं ते.
जागोजागी पाण्याची तळी होती. एक तळं पोहण्यासाठी. ते गणेश टाकं. आम्ही आंघोळीसाठी, पोहण्यासाठी जात होतो. त्या तळ्यात पाठीला भोपळा बांधून नीराताई, वासंतीवहिनी, वीणा अशा पोहायला उतरत. त्या पाण्याची योजना करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कल्पकतेविषयी, सर्वत्र दिसणाऱ्या योजकतेविषयी मनात आदर भरून राही.
आम्ही तानाजी कडय़ाकडं गेलो. त्या भागात युद्धाचा मोठाच प्रसंग घडलेला असावा. तिथं बंदुकीतल्या गोळ्या, तोफांच्या गोळ्यांची कवचं सापडत होती. त्यातले एक-दोन गोळे जिवंतच मिळालेले. आप्पा दांडेकरांनी ते आणले आणि मल्हारीला मदतीला घेऊन गोळ्यांची तोंडं जिथं होती त्या ठिकाणी मोळ्यांनी थोडं थोडं टोकरत आणि त्यावर पाणी घालत ती मोकळी केली होती. आप्पांचं हे दु:साहसच होतं.
त्या भागात काही तत्कालीन नाणीही सापडत होती. त्यांत एक ‘प्रतिपच्चंद्ररेखेव वíधष्णुर्वश्विवंदिता’ हा श्लोक असलेलं ‘शिवराई’चं नाणं मला मिळालं होतं, ते मी माझ्याजवळ ठेवून घेतलं. अशी आणखी काही वेगळी नाणी सिंहगडाच्या वेगवेगळ्या भागात सापडत होती. ती आप्पांनी इतिहासाचार्य ग. ह. खरे यांना  पुण्यात नेऊन दाखवली होती. आणि त्यातली काही नाणी सातवाहन काळातली आहेत असं खरे यांनी सांगितलं होतं.
सिंहगड दाखवण्यासाठी शिवकालाचे तज्ज्ञ आणि आप्पांचे जीवलग मित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आप्पांनी एक दिवस मुद्दाम बोलावलं होतं आणि तो गड त्यांनी आम्हा सर्वाना दाखवला होता. आपल्या शब्दांतून बाबासाहेब तो काळ साक्षात उभा करत होते.
एकदा ज्वारीचं व गव्हाचं पीठ संपलं. गडाच्या दक्षिण बाजूला कल्याण नावाचं खेडं होतं. तिथं पिठाची गिरणी होती. डोक्यावरून ज्वारी आणि गव्हाची चुंबडी नेऊन वासंतीवहिनी, कमल, मल्हारी, अण्णा दांडेकर यांनी दळून आणली. कल्याण दरवाजात हे सगळे यायच्या वेळेला आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिलो. या दरवाजात कल्याणमधून घट्ट लागलेल्या दह्याची मडकी येत. ती विकत घेतली. वेल्हाळवहिनी मोठय़ा हौशी आणि नकला करण्यात पारंगत होत्या. कल्याण दरवाजाजवळ आल्यावर त्यांनी ‘बिब्बं घेऽ, सुया घेऽ’ अशा ललकाऱ्या देत टोपल्या घेऊन येणाऱ्या बायांचे आवाज काढायला सुरुवात केली. मग आप्पांनी ‘आता काय करू बाई जावई आलाऽ’ अशा चालीत प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. असा आनंद करत, गंमत करत आम्ही बंगल्यावर पोचलो. कल्याणहून येताना अण्णा दांडेकर आणि मल्हारी थोडं मागं राहिले होते. अण्णानं आप्पांना सांगितलं, ‘एक घाणेरडं, ठिपक्या ठिपक्यांचं दांडगं कुत्रं मागचे पाय ओढत आमच्या मागं लागलं होतं. आम्ही त्याला दगडं मारून पिटाळलं.’ आप्पा म्हणाले, ‘लेको! मेला असता. ते कुत्रं नव्हतं. तरस असणार. ते अत्यंत क्रूर, शूर असतं. चार तरसं वाघालासुद्धा भारी असतात. ती कळपानं राहतात. तुम्ही बरे सुटलात. ते वाट चुकलेलं जखमी तरस असावं. पुन्हा भेटलं तर त्याच्या नादाला लागू नका.’
आम्ही जेवणासाठी केळीच्या पानासारखी दिसणारी चवेणीची पानं कापून आणायला जात असू. गंमत म्हणजे चवेणीच्या वेलीवरली पानं वाळल्यावर दुरून अगदी पट्टेरी वाघ असल्यासारखी भासत.
संध्याकाळच्या कार्यक्रमात काही स्तोत्रं, श्लोक म्हटले जात. आप्पा अत्यंत शुद्ध, दाणेदार उच्चारांत स्तोत्रं म्हणत. आप्पांचं पाठांतर अपार. त्यांची ज्ञानेश्वरी पाठ होती आणि तुकारामबोवाची गाथा त्यांनी देहूच्या डोंगरावर राहून माधुकरी मागून, एकभुक्त राहून पाठ केलेली होती. रात्रीच्या पठणात रावणाचं ‘शिवतांडव’ स्तोत्र म्हणत. रावण हा महापंडित होता. पण त्याच्या रचनांपकी एकच ‘शिवतांडव’ स्तोत्र उरलेलं होतं. ‘धगद्धगद्धगज्ज्वलल्लाटपट्टपावके/ किशोरचंद्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम’ अशा त्याच्या रचनेचे शब्दसमूह अंगावर काटा काढत. आप्पांना माझं वाचन, उच्चार आवडे. त्यांनी ते स्तोत्र मी सांगावं असं सुचवलं. मी ते स्तोत्र सांगायचा आणि इतर सारे पाठोपाठ म्हणायचे. त्या म्हणण्याचा घोष सर्वत्र भरून राही. वीज नव्हतीच. कंदिलाच्या मंद उजेडातच ती स्तोत्रं वाचावी लागत. त्या मंद उजेडात एक शीतल शांतता भरून राहिलेली असे. इंदूताई टिळकांना माझं हे म्हणणं इतकं आवडे, की त्यांनी नंतर माझं अक्षर पाहिल्यावर ते माझ्याकडून लिहून घेतलं. या संध्याकाळच्या कार्यक्रमात कधी कधी आप्पा त्यांना नवीन काही सुचलेलं सांगत. एखादी लिहिलेली कविता वाचून दाखवत. मला म्हणत, ‘तू कविता लिहितोस. कवितेशिवाय आणखी काही लिहिलं आहेस का?’ मी त्यांना ‘होय’ म्हटलं. ते म्हणाले, ‘ते घेऊन ये आणि इथं वाच.’ मी ते लिहिलेलं वाचलं आणि आप्पांना आणि सर्वाना ते इतकं आवडलं, की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला सुंदर पांढऱ्या कागदाचे चतकोर दिले. त्यांनी त्यांचं हिरवं पार्कर पेनही दिलं आणि ते चांगलं उतरून काढायला सांगितलं. हे स्वच्छ पांढरे मोहोरदार कागद त्यांचे प्रकाशक केशवराव कोठावळे पाठवत असत. मी हे लेखन उतरायला रोहिडेश्वराच्या मंदिरात जावं, तिथं चांगली शांतता मिळेल असं आप्पांनी सुचवलं. ते म्हणाले, ‘लेखन इतकं चांगलं आहे, की मी गड उतरल्यावर मुंबईला जाणार आहे. तेव्हा मी ‘मौज’कडे जाईन आणि ते रामकडं देईन.’ राम म्हणजे ‘सत्यकथे’चे संपादक राम पटवर्धन. ‘रामला मी सांगेन, की हे लेखन तुला आवडलं तर सत्यकथेत छाप. नाही आवडलं, तर मी ते ‘सत्यकथे’त जाहिरात म्हणून छापून घेईन.’ ही जूनच्या पहिल्या आठवडय़ातली गोष्ट. ऑगस्टच्या ‘सत्यकथे’च्या अंकात ‘मनातल्या उन्हात’ हे माझं लेखन राम पटवर्धनांनी छापलं. तेच माझं ‘सत्यकथे’तलं पहिलं लेखन.
एकदा मध्यरात्री उठलो आणि बाहेर पाहू लागलो तो खडकवासल्याचे दिवे लकाकत होते. आणि अंगणात पाहिलं तर काजव्याच्या प्रकाशासारखा एक मोठा, वाटोळा प्रकाश अंगणात चालत असलेला. मी आप्पांना उठवलं आणि म्हटलं, ‘हे पाहा, अंगणात काय चाललेलं आहे. काजवा नव्हे. तो उडत तर नाहीये, पण त्याचा प्रकाश काजव्याच्या प्रकाशासारखाच आहे. आकारानं बराच मोठा. आणि तो हळूहळू कोठे अंगणातून खाली उतरत, चालत  निघालेला आहे.’’
आप्पांनी झोपेतून उठून बाहेर येऊन पाहिलं. तेही तो प्रकाश पाहून चकित झाले. म्हणाले, ‘सृष्टीत काय काय अद्भुतं असतात! पण या प्रकाशाला आपण हात लावायला नको. तो कदाचित विषारीही असू शकेल.’ त्या प्रकाशात त्या प्रकाशगोलाचे डोळेही वेगळ्या रंगात लकाकत होते. मी आणि आप्पा तो प्रकाशगोल दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिलो. नंतर त्या प्रकाशगोलापेक्षा कितीतरी लहानशा प्रकाशाचे काजवे आमच्या पुढून हवेत इकडून तिकडे गिरक्या मारत राहिले. का, कुणास ठाऊक!
बघता बघता एप्रिल महिना संपत आला. १ मे’ला स्वतंत्र महाराष्ट्र होत होता आणि महाराष्ट्र राज्याचा पहिला दिवस मोठय़ा उत्साहानं मुंबईत आणि महाराष्ट्रभर साजरा होत होता. आप्पा म्हणाले, ‘आापणही गडाच्या पूर्वेला तोंड करून उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं महाराष्ट्रगीत म्हणू या. ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ महाराष्ट्रगीत आम्ही सर्वानी मोठय़ांदा म्हटलं. आप्पा म्हणाले, ‘कुणाला ऐकू न येऊ दे, पण आपण म्हटलेल्या महाराष्ट्रगीताचे सूर आकाशातून सर्वत्र पोचणार.’ आश्चर्य म्हणजे त्या संध्याकाळी मशाली घेऊन आणि लेझमा घेऊन गडाखालचे रहिवासी सिंहगडावर आले. त्यांनी त्यांची पारंपरिक गाणी म्हणायला सुरुवात केली. काच्या कसून आप्पा त्यांच्यात मिसळले. त्यांनी एकाच्या हातातला ढोल काढून वाजवायला सुरुवात केली. मग नीराताई आल्या. त्यांनीही त्यात भाग घेतला. आणि आम्ही सगळेच त्या कार्यक्रमात मिसळलो. १९६० मधल्या आमच्या गडावरल्या वास्तव्याची अविस्मरणीय अखेर पहिला महाराष्ट्रदिन साजरा करून झाली.
१९६१ मध्ये आप्पांनी पुन्हा सिंहगडावर तीन आठवडय़ांचा मुक्काम गेल्या वर्षांप्रमाणं करायचा बेत आखला. त्यांनी सगळ्यांना निरोप दिले व पत्रंही लिहिली. मला त्यांचं पत्र आलं. मी ज्या नोकरीत होतो तिथं वर्षांला एक महिन्याची रजा मिळत असे. ती आताच संपवून काय करायचं? मी आप्पांना तसं लिहिलं. तर त्यांनी कृतक कोपानं मला लिहिलं, ‘तुम्ही आलात तर तुमच्यासवे, नाही तर तुमच्याविना आम्ही सिंहगडावर राहायला जाणारच.’ तो त्यांचा निर्धार वाचून मी आप्पांना जाऊन मिळायचं ठरवलं. मी सिंहगडावर पोचलो. मी पोचणार तो दिवस आप्पांना कळवलेला होता. त्या दिवशी माझ्या स्वागतासाठी सगळी मंडळी पुणे दरवाजापाशी येऊन थांबलेली होती. मी आलो ते चांगलंच झालं असं वाटलं.
गतवर्षीप्रमाणं इंदूताई लहानग्या दीपकला घेऊन आल्या होत्या. यावर्षीच्या मंडळींमध्ये आणखी एक भर पडली होती- पद्मा निजसुरेची. ती खूप उत्साही, सतत बोलणारी, अमळनेरच्या प्रताप कॉलेजात तत्त्वज्ञान शिकवणारी होती.
यावेळेला गेल्या वर्षीपेक्षा पावसाळा अधिक जवळ आल्यासारखं वाटत होतं. डोक्यावर अधूनमधून ढग तरळू लागले होते आणि एक दिवस संध्याकाळी आम्ही पश्चिमेकडे फिरायला बाहेर पडलो असताना गडाच्या कडेपाशी उभे होतो.. वर आभाळातल्या ढगांच्या खेळी बघत. हळूहळू अधिकच काळवंडू लागलं. आणि एक चमत्कार आम्हाला दिसू लागला. सगळ्यांचे केस काटकोनात उभे राहिलेले. आप्पांचे, नीराताईंचे, इंदूताईंचे. एवढय़ात आम्हाला टिळकांच्याच बंगल्यात उतरलेल्या जोशी इंजिनीअरांच्या मोठमोठय़ा हाका ऐकू येऊ लागल्या. ‘ताबडतोब पळा,’ असं ते सांगत होते. आम्हाला काही सुचेना. आम्ही बंगल्याच्या दिशेनं पळत सुटलो आणि आमचे डोक्यावरले केस पूर्ववत होऊ लागले. इंजिनीअर जोशी म्हणाले, ‘तुम्ही एका मोठय़ा संकटातून वाचला आहात.’ जोशींचा विजेच्या संदर्भातला काही व्यवसाय होता. ते म्हणाले, ‘तुमच्या डोक्यावरलं वातावरण विद्युतभारित झालं होतं. ती वीज तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून खाली येऊ पाहत होती. तत्क्षणी तुम्हा सगळ्यांचा कोळसा झाला असता. या प्रसंगाला इंग्रजीत सर्ज (२४१ॠी) म्हणतात. ही क्वचितच घडणारी घटना आहे.’ आम्ही ते ऐकून सुन्न झालो. मृत्यूच्या स्पर्शानं आम्ही हलून गेलो होतो.
मध्यरात्री इंदूताईंना कुणीतरी हाका मारत असल्याचं ऐकू आलं. आम्ही सगळेच जागे झालो. ते हाका मारणारे होते जयंतराव टिळक. आणि त्यांच्या सोबत होते व्यंकटेश माडगूळकर. दोघांनी शिकाऱ्याचा वेश परिधान केलेला. डोक्यावर हेडलॅम्प. दोघांच्याही खांद्याला रायफली. दोघे शिकार शोधत आले होते. इंदूताई म्हणाल्या, ‘ते असे अधूनमधून येतातच.’ माडगूळकर म्हणाले, ‘आम्ही दोघे पुष्कळदा इथं शिकारीला येतो. क्वचित एखादी शिकार मिळते. एखादं भेकर मिळतं. एखादं डुक्कर सापडतं. पण आज बंदुकीला काही मिळालेलं नव्हतं. खालच्या लोकांनी आम्हाला बिबटय़ा दिसल्याचं आणि तो वरती सरकत असल्याचं सांगितलं. कदाचित तो आमच्याही मागावर असेल. कुणी सांगावं!’
ते शिकारी शिल्लक असलेलं अन्न आणि खाद्यपदार्थ खाऊन पुन्हा अंधारात गडप झाले.  इंदूताई म्हणाल्या, ‘दोघंही कुणाचं ऐकणाऱ्यांपकी नव्हेत.’
दुपारचं ऊन पसरलेलं होतं. मी एकटाच पुढच्या दालनातून ते बघत उभा राहिलो होतो. एवढय़ात हालचाल झाली आणि एक मोठाच्या मोठा साप संथगतीनं खाली निघालेला होता. मी आप्पांना उठवलं. मी म्हटलं, ‘ते पाहा काय दिसत आहे ते.’ तो जंगी साप चाललेला होता. आप्पा म्हणाले, ‘अजगर आहे. जाऊ दे.’
एप्रिल संपला. आम्ही सगळे गडाच्या तळाशी येणाऱ्या बसनं पुण्याला आलो. पाहिलं, तर पुण्यात सत्यजित रायच्या ‘पथेर पांचाली’, ‘अपूर संसार’ अशा चार चित्रपटांच्या जाहिराती लागल्या होत्या. बíलन महोत्सवात ते दाखवले गेले होते. त्यामुळं चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स होती. अप्पा म्हणाले, ‘हे चित्रपट पाहण्याची संधी पुन्हा येणार नाही.’ ते पाहत मग आम्ही पुण्यात राहिलो.