बाळासाहेब ठाकरे हा एक अंगार आहे. (मी ‘होता’ असं लिहीत नाही, कारण त्यांच्याकरता मला भूतकालीन क्रियापदे वापरताना खूप त्रास होतो. पण तसं नाइलाजानं या लेखात वापरावं लागणार, हेही खरंय.) साहेबांची आणि माझी नाळ लगेचच जुळली. त्याचं कारण आमच्या शीख समाजाचा लढाऊपणा साहेबांच्या कट्टर मराठी मनाला भावला असणार! बाळासाहेबांची अंगकाठी सडपातळ होती. पण छातीतील आत्मविश्वास बुलंद होता. त्यांची माझी भेट झाली तेव्हा ते ‘द बाळासाहेब ठाकरे’ नव्हते झाले. ते तेव्हा ‘फ्री प्रेस’मधले अत्यंत प्रतिभाशाली व्यंगचित्रकार होते. त्यांनी त्यावेळी ‘मार्मिक’ही सुरू केलेला होता. मला मराठी बोललेले कळते, पण मराठीत बोलता मात्र येत नाही. मला ‘मार्मिक’ न समजण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते प्रामुख्याने व्यंगचित्रे प्रसिद्ध करणारे साप्ताहिक होते. बाळासाहेबांची आणि श्रीकांतजींची मर्मभेदक व्यंगचित्रे मला महाराष्ट्राची आणि देशहिताची जाणीव करून देत असत. त्यांतील आशय जाणिवा समृद्ध करीत असे.

तेव्हा आमच्या ‘पार्क वे’जवळच बाळासाहेब आणि श्रीकांतजी राहत असत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी या दोन भावांपैकी कोणाची तरी ‘पार्क वे’त फेरी व्हायचीच. बाळासाहेब किंवा श्रीकांतजी यांच्यापैकी कोणीही आलं तरी मला ‘पार्क वे’मधला आमचा स्टाफ निरोप देई. मग मी लगेचच ‘प्रीतम’मधून ‘पार्क वे’त पोहोचत असे आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करीत असे. या दोन्ही भावांबरोबर माझा स्नेहबंध कसा आणि कधी जुळला हे मात्र आज नीटसं आठवत नाही. कोणाच्या स्नेहाच्या गाठी कुठं, कशा बांधल्या जातील याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. त्या बांधल्या जातात, हे मात्र खरं! तर- त्यांचं कोपऱ्यातलं एक टेबल ठरलेलं असे. त्यावरच ते बसत असत. श्रीकांतजींबरोबर त्यांचं कामासंबंधात काही बोलणं होई. तिथंच ‘मार्मिक’बद्दलच्या चर्चा चालत. त्यावेळीसुद्धा बाळासाहेबांबरोबर नेहमी कोणी ना कोणी असायचंच. तेव्हा शिवसेनेचा जन्म झालेला नव्हता. पण त्यांच्या मनातला शिवसेनेचा विचार आकार घेत होता. बाळासाहेब संध्याकाळी चार-पाचच्या सुमारास येत. त्यांना हानिकेन बीअर आवडायची. गंमत म्हणजे ते गरम बीअर घेत. शांतपणे त्यांच्या ठरलेल्या टेबलावर बसून ते तासाभरात पेय संपवत. कधी कधी ते त्यांच्याकडे असलेल्या कागदावर एखादं व्यंगचित्र किंवा रेखाचित्र रेखाटत. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की एकदा का साहेबांनी कागदाला पेन्सिल किंवा पेन लावलं की त्यात जराही खाडाखोड नसे. ते चित्र झटक्यात पूर्ण करत आणि ते संपवून हातावेगळं करत. त्यांनी सांभाळलेल्या वा जोडलेल्या नात्यांचंही तसंच असे. जोडलं की जोडलं. संपवलं की संपवलं! त्यांचं चित्र म्हणजे त्यांचा विचारच असे. तो विचार पूर्ण विचाराअंतीच पक्का होत असे. पक्का झाला की मग मात्र तो बदलत नसे. त्यांच्या स्वभावाचं ते प्रतीक होतं. साहेब कुटुंबवत्सल होते आणि तेवढेच समाजवत्सलही. म्हणूनच काळाच्या ओघात पाच-सात जणांचं त्यांचं कुटुंब हे पाच-सात कोटी लोकांचं कुटुंब बनलं. मी नेहमी विचार करतो की, बाळासाहेबांकडे अशी कोणती जादू होती की ज्यामुळे ते एवढे जनप्रिय झाले? मग लक्षात येतं की, ते आपल्या लोकांवर अतीव माया करत. त्यांची सुखदु:खं ते आपली मानत. बाळासाहेबांचा कणखरपणा आणि ताठपणा सर्वाच्याच परिचयाचा आहे. पण मला दिसतात ते त्यांचे काळ्या चौकोनी चष्म्याआडचे नितांत प्रेमळ डोळे. त्या नितळ, प्रेमळ डोळ्यांनी त्यांना महाराष्ट्राचा मोठा नेता बनवलं.

साहेबांची व माझी गहिरी दोस्ती होती. ते वयाने व अधिकाराने माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होते. पण त्यांनी मला नेहमीच बरोबरीनं वागवलं. आमच्या गप्पा साध्याच असत. आम्ही राजकारणावर क्वचितच बोलत असू. बाळासाहेबांना शीख समाजाबद्दल फारशी माहिती नव्हती. ती ते नेहमी माझ्याकडून समजावून घेत. मी त्यांना शीख समाजाबद्दल माहिती सांगत असे. ‘गुरुग्रंथसाहेब’ हा शीख समाजाचा सर्वात पवित्र धर्मग्रंथ! त्याचं वैशिष्टय़ म्हणजे तो कोणा एका व्यक्तीनं लिहिलेला ग्रंथ नाही, तर तो काळाच्या ओघात घडत गेलेला, समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी जडवलेला एक देखणा हिरा आहे. सहा गुरू आणि ३६ भक्तांनी त्याला आपल्या वाणीनं सजवलं आहे. त्यात कबीरजी, रवीदासजी, नामदेवजी इत्यादींचा समावेश आहे. ही सारी थोर माणसं उच्चवर्णीय नसून विविध व्यवसाय करणाऱ्या समाजांतली आहेत. हे जेव्हा बाळासाहेबांना मी सांगत असे, तेव्हा त्यांचा चेहरा अभिमानानं उजळून निघत असे. समाजातली जातिभेदांची उतरंड मान्य नसणाऱ्या प्रबोधनकारांचे ते तितकेच, किंबहुना कांकणभर सरस असे पुत्र होते. एकदा बोलता बोलता मी शिखांच्या सहा गुरूंबद्दल व त्यांनी धर्मरक्षणासाठी केलेल्या संघर्षांबद्दल बाळासाहेबांना सांगितलं, तेव्हा ते थरारून गेले होते. गुरू गोविंदसिंगांनी मोगलांविरुद्ध उभारलेल्या लढय़ाविषयी त्यांना माहिती दिल्यावर ते पटकन् म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंजाबात गुरू गोविंदसाहेब. अरे, कुलवंतजी, महाराष्ट्र आणि पंजाबात फक्त भौगोलिक अंतर आहे, पण आपला आत्मा एकच आहे.. जो आपण कधीही विकला नाही.’’ तेव्हापासून अखेपर्यंत बाळासाहेबांनी आम्हा दोघांतलं आपुलकीचं हे मैत्र कायम जपलं.. तेही बरोबरीच्या नात्यानं.

कलानगरजवळ आमच्या ट्रस्टचं एक इस्पितळ आहे. मी त्या ट्रस्टचा अध्यक्ष होतो. त्यामुळे त्या भागात गेलो की मी बाळासाहेबांकडे जात असे. जाताना फक्त एक फोन फिरवायचा. त्यांची उपलब्धता बघायची. त्यांच्या पीएंना वगैरे आमचा स्नेह माहीत होता. त्यामुळे मला कोणी रोखत नसे. मी थेट त्यांच्या लोकांना भेटायच्या दरबारात दाखल होत असे. लोकांना भेटण्याच्या खोलीजवळच खास गुफ्तगू करण्याची त्यांची एक खोली होती. अगदी लहान खोली होती ती. तिथंही मी सरळ जात असे. साहेबांचा तसा सर्वाना आदेश असे. मी बाळासाहेबांकडे गेल्यावर ते हातातलं काम पटकन् संपवून भेटायला आलेल्यांना थोडंसं थांबायला सांगत आणि मग आम्ही बोलत असू.

माझ्या मुलांवरही त्यांची खूप माया. त्याला एक छोटंसं कारणही होतं. एकदा आमच्याकडे स्नेहभोजन होतं. अनेक मान्यवर आलेले होते. बाळासाहेबही आले होते. त्यावेळी एक तरुण सरदारजी लोकांनी जेवण करून जागेवरच सोडलेली उष्टी ताटं उचलत होता आणि एका मोठय़ा टोपात ती ठेवत होता. बाळासाहेबांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या तरुणाला बोलावलं आणि हिंदीत विचारलं, ‘‘तू कोण रे?’’ त्या तरुणानं मराठीत उत्तर दिलं, ‘‘मी टोनी.. अमरजित! कुलवंतजींचा मुलगा.’’ बाळासाहेबांनी आश्चर्यानं त्याला विचारलं, ‘‘तू तर मालक आहेस इथला! मग हे काम तू कशाला करतोस? आणि तुला इतकं चांगलं मराठी कसं येतं?’’ त्यांचं हे संभाषण सुरू असताना मी मागेच उभा होतो. दोघांनाही हे माहीत नव्हतं. टोनीनं उत्तर दिलं, ‘‘अंकल, आपल्या पाहुण्यांची ताटं उचलण्याची लाज का बाळगायची? आणि मराठीचं म्हणाल तर मी जरी मूळचा पंजाबी असलो तरी माझा जन्म महाराष्ट्रात झालाय. मग मराठी ही माझीच भाषा झाली ना! त्यामुळे ती मला जन्मत:च येते.’’ बाळासाहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी मला हाक मारली. म्हणाले, ‘‘बघ कुलवंत, तुझी मुलं मराठी झाली आहेत. तुलाच तेवढं मराठी येत नाही.’’ मी नम्रपणे हसलो आणि म्हणालो, ‘‘साहेब, मी प्रयत्न केला; पण खरंच माझ्या जिभेला मराठीचं वळण पडलं नाही. माझ्या तिन्ही मुलांना मराठी छानच येतं.’’ तेव्हापासून टोनी बाळासाहेबांचा अतिशय लाडका झाला.

मी सणावाराला बाळासाहेबांकडे सहकुटुंब जात असे व तेही आम्हाला सहकुटुंब भेटत असत. भाऊबीजेला आम्ही त्यांना हमखास भेटायला जात असू आणि त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद घेत असू. नव्वदच्या दशकात एका भाऊबीजेला आम्ही बाळासाहेबांकडे गेलो होतो. त्यांच्या त्या आतल्या खोलीत ते बसले होते. ती खोली अगदीच छोटी होती. अनेकांना माहीत नसेल की त्या खोलीत बाळासाहेब जमिनीवर एक छोटीशी चटई टाकून बसत. तिथं बाळासाहेब खूप रिलॅक्स्ड असत. त्यांच्या समोर जुन्या जमान्यातल्या मुनीमजींसमोर असायचं तसं छोटंसं मेज असे. त्या मेजावर हात ठेवून साहेब बसत. त्यामागच्या भिंतीवर शिवसेनेचं प्रतीक असलेल्या वाघाचं मोठं चित्र होतं. बाळासाहेब त्यावेळी त्यांच्या काही अतिशय जवळच्या सोबत्यांबरोबर बोलत होते. आम्ही आत गेलो तेव्हा साहेबांनी सर्वाना सांगितलं, ‘‘चला, हे माझे मित्र आले आहेत. आपण आता नंतर भेटू.’’ साहेबांनी प्रेमाने ‘‘अरे कुलवंतजी, आईये. दिवाळीच्या तुम्हाला सर्वाना शुभेच्छा!’’ असं म्हणत आम्हा सर्वाना शुभेच्छा दिल्या. माझ्या पत्नीला, मुलांना आणि सुनांना शुभेच्छापर आशीर्वाद दिले आणि मीनाताईंना- म्हणजे मासाहेबांना निरोप धाडला- ‘‘वहिनीसाहेब आल्या आहेत.’’ मी बाळासाहेबांकडे जाताना त्यांच्या आवडत्या पेयाचा क्रेट घेऊन जात असे. तो त्यांना दिला. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आज तुम्ही मला सोबत करायलाच हवी.’’ त्यांनी आवडीनं एक बाटली उघडली. आधीच ते गरम पेय.. त्यात आम्ही आणताना ती हिंदकळलेली. त्यामुळं ते पेय फेसाळून चटकन् बाहेर आलं आणि मेजावर, जमिनीवर सांडलं. ‘‘अरे, अरे..’’ असं म्हणत साहेबांनी स्वत:च बाजूला असलेलं एक टॉवेल उचलला आणि सांडलेलं पेय ते पुसायला लागले. तोवर मासाहेब आल्या. त्यांनी मग कोणाला तरी बोलावून सर्व साफ करून घेतलं. मी गमतीत म्हणालो, ‘‘देखो साब, आप जबरदस्ती कर रहे थे ना, तो गिर गया।’’ साहेब पटकन् म्हणाले, ‘‘नहीं कुलवंतजी, हे तर माझं प्रेम आहे.. बाहेर उफाळून आलेलं.’’ खराखुरा दिलदार आणि राजा माणूस होते बाळासाहेब! त्यांनी मग उद्धवना बोलावलं. (त्यांची मुलं, पुतणे सगळेच जण आजही आमच्या कुटुंबासोबत कायम स्नेह टिकवून आहेत.) उद्धवजी आज शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ती समर्थपणे निभावत आहेत. पण त्यावेळी अगदी तरुण असलेल्या उद्धवना फोटोग्राफीमध्ये रस होता. खरं म्हणजे अख्खा ठाकरे परिवार हा कलावंतांचा परिवार आहे. राजकारण व समाजकारणही ते कलात्मकतेनं करतात. उद्धवजींनी तेव्हा नुकताच एका अभयारण्याचा दौरा केला होता. बाळासाहेबांनी उद्धवजींना त्यांनी काढलेले फोटो दाखवायला सांगितलं. केवढा सुंदर दृष्टिकोन होता त्यांचा फोटोसंदर्भातला. माझ्या अल्प चित्रपटांशी संबंधित कारकीर्दीनं मला चित्रांबद्दल थोडीशी समज दिली होती आणि आयुष्यानंही चित्रं पाहायला शिकवलं होतं. उद्धवना प्राणिमात्रांबद्दल असलेलं प्रेम त्या छायाचित्रांतून सहजपणे व्यक्त होत होतं. ते पुढे राजकारणात येतील असं त्यावेळी मुळीच वाटलं नव्हतं. पण नियतीची गूढं काही वेगळीच असतात.. म्हणून तर जगण्यात गंमत असते. भविष्यात काय होईल हे कळलं असतं तर माणसं जगलीच नसती.

आमच्या अमरदीपवर म्हणजे टोनीवर बाळासाहेबांची अतिशय माया होती. टोनीनं एकदा त्याच्या रोटरी क्लबमध्ये बाळासाहेबांना व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं. आणि आपल्या पुतण्याचा हा हट्ट साहेबांनीही पूर्ण केला. बाळासाहेबांनी रोटरी क्लबमध्ये भाषण दिलं ते राजकारणी म्हणून नव्हे, तर एक व्यंगचित्रकार या नात्यानं. मी आवर्जून त्या व्याख्यानाला गेलो होतो. व्यंगचित्रामागची किती तरी गूढं त्यांनी त्या दिवशी उलगडून दाखवली. ‘‘व्यंगचित्रकार हा केवळ टीकाकार असता कामा नये, तर समाजाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्याच्याकडे असायला हवा,’’ असं ते म्हणाले. ‘‘तो व्हिसल ब्लोअर- म्हणजे समाजहिताआड येणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात उभा ठाकणारा जागल्या असतो. त्यानं केवळ हिणकसपणा दाखवू नये, तर समाजातलं हीन दाखवावं व ते कसं दूर करायचं, हेही सुचवावं,’’ असं ते म्हणाले. बाळासाहेबांना जनमानसाची नाडी चटकन् गवसत असे. ते एका क्षणात सभेशी एकरूप होत आणि सभेला आपल्या तालावर डोलायला लावत. त्याचं कारण त्या दिवशी मला कळलं. ते होतं- त्यांच्या मुळात एक कलावंत असण्यात!

बाळासाहेब हे सत्तेशी कधीच निगडित नव्हते. सत्ता त्यांच्यामागे धावत असे. एक ऐतिहासिक मराठी नाटक मी पाहिलं होतं.. संभाजीराजांच्या जीवनावरचं. मला वाटतं, त्याचं नाव ‘राजसंन्यास’ असावं. त्याची भाषा मला कळण्याजोगी नव्हती. ती अवघड, जुनी मराठी भाषा होती. पण त्यातल्या शेवटच्या वाक्यांचा अर्थ मला कळला पटकन्. ‘‘राजा हा जगाचा उपभोगशून्य स्वामी असतो. राज्योपभोग म्हणजे राजसंन्यास.’’ कारण ती वाक्यं जगणारा बाळासाहेब ठाकरे नावाचा एक महान राजयोगी मोठय़ा मनानं मला आपला स्नेही मानत होता. या राजयोग्याचा स्नेह मला एवढा लाभला, की आज त्यांच्या असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. बाळासाहेबांच्या आणखीन काही आठवणी पुढील आठवडय़ात..

कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर