काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आले होते. अद्याप तरी दिल्लीहून काही निरोप आलेला नाही. सोमवापर्यंत वाट पाहणार आहे, अन्यथा मंगळवारी पुढील भूमिका जाहीर करेन, असे नारायण राणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दहा दिवस उलटले तरी राणे यांच्या राजीनाम्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. राजीनाम्यानंतर राणे यांनी प्रथम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर भेट घडवून आणण्याचे आश्वासन राणे यांना या बैठकांमधून देण्यात आले होते. राहुल गांधी यांची भेट होऊन आठवडा उलटला तरी अद्यापही सोनिया यांच्याबरोबर भेटीचा अद्याप निरोप आलेला नाही. येत्या सोमवारी राजीनाम्याला दोन आठवडे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत वाट पाहणार आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून प्रतिसाद न मिळाल्यास मंगळवारी पुढील भूमिका जाहीर करू, असे राणे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राणे यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट घडवून आणण्याबाबत मुख्यमंत्री चव्हाण हे फारसे उत्सुक नाहीत. मात्र राणे पक्षात राहणार नाहीत, असे चित्र नवी दिल्लीत निर्माण करण्यात आले आहे. राणे यांच्यासारखा आक्रमक नेता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेल्यास त्याचा काही प्रमाणात फटका बसेल, असाही पक्षात एक मतप्रवाह आहे.
काँग्रेसने सर्व मतदारसंघातून अर्ज मागविले
काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी कायम ठेवण्यावरून  धुसफूस सुरू असतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.  इच्छुकांनी ११ ऑगस्टपर्यंत विहित नमुन्यात अर्ज टिळक भवन येथील मुख्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे आघाडी कायम राहण्याबाबत काँग्रेसचे नेते साशंक आहेत. आघाडीचा निर्णय दिल्लीच्या पातळीवर घेतला जावा, अशी शिफारस प्रदेश काँग्रेसने केली आहे.  आघाडीबाबत निर्णय झालेला नसल्याने पक्षाने सर्व मतदारसंघांत निवडणुकीची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.