07 July 2020

News Flash

प्रक्षोभक वक्तव्ये मोदींना अमान्य

मुस्लिमांना हिंदूबहुल परिसरात घर किंवा दुकाने घेऊ देऊ नका, त्यांनी तसे केले असल्यास त्यांना तेथून हुसकावून लावा, या आशयाच्या वक्तव्यांवरून टीकेचे लक्ष्य

| April 23, 2014 02:03 am

मुस्लिमांना हिंदूबहुल परिसरात घर किंवा दुकाने घेऊ देऊ नका, त्यांनी तसे केले असल्यास त्यांना तेथून हुसकावून लावा, या आशयाच्या वक्तव्यांवरून टीकेचे लक्ष्य ठरलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटक प्रवीण तोगडिया यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी फटकारले आहे. भाजपचे हितचिंतक म्हणवणाऱ्यांनी केलेली अशा प्रकारची वक्तव्ये आपल्याला मान्य नसून ते प्रचाराची दिशा भरकटवू पाहात आहेत. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नसल्याचे मोदी यांनी सुनावले आहे.
तोगडिया यांनी भावनगर येथे शनिवारी झालेल्या सभेत प्रक्षोभक भाषण करताना मुस्लिमांविरोधात वरीलप्रमाणे अनुदार उद्गार काढले होते. तसेच बिहारमधील भाजपचे नेते गिरिराजसिंह यांनीही मोदीविरोधकांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. तोगडिया आणि गिरिराज या दोघांच्याही वाक्ताडनाचा मोदी यांनी मंगळवारी समाचार घेतला. त्यांनी केलेल्या ट्विप्पण्यांमध्ये या दोन्ही नेत्यांना अनुल्लेखांनी मोदींनी फटकारले आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्यांपासून आपण चार हात लांबच राहण्यात धन्यता मानत असून अशा व्यक्तींनीही वक्तव्ये करताना भान राखावे, असा उपरोधिक सल्लाही मोदींनी ट्विप्पणीच्या माध्यमातून दिला आहे.
भाजप विकासाच्या मुद्दय़ावर ठाम
तोगडिया आणि गिरिराज यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेला धुरळा बसावा यासाठी भाजपनेही पुढाकार घेत विकासाच्या मुद्दय़ावरच पक्षाने ही निवडणूक लढवली आहे.जातीपातीच्या किंवा धर्माच्या आधारावर निवडणुका लढवण्याला प्राधान्य दिलेले नाही.  काँग्रेसला केंद्रातून सत्ताभ्रष्ट कसे करता येईल या बाबींनाच जास्त महत्त्व देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी येथे स्पष्ट केले.
काँग्रेसचा हल्ला
तोगडिया आणि गिरिराज यांच्या वक्तव्यांमुळे आयतेच कोलीत हाती मिळालेल्या काँग्रेसने भाजपसह संघपरिवार व शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांच्या ध्वनिचित्रफितीच मंगळवारी प्रसिद्ध केल्या.

सुशासन आणि विकासाच्या मुद्दय़ांवरून संपूर्ण देश भाजपकडे आशेने पाहतो आहे ही एक आनंदाची बाब आहे. अशा या आनंदी वातावरणात कोणी गढूळता आणण्याचा प्रयत्न करू नये.
-नरेंद्र मोदी यांची ट्विप्पणी

मुस्लीम संघटनांचे आवाहन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांकडून जातीय विद्वेष पसरवणारी वक्तव्ये केली जात असून त्याची गंभीर दखल घेत अशा वक्तव्यकर्त्यांवर बंदी आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मुस्लीम मजलिस-ए-मुशावराततर्फे करण्यात आले आहे. निवडणूक आयोग अशा वक्तव्यांकडे फारशा गांभीर्याने पाहात नसल्याची टीकाही मुशावराततर्फे करण्यात आली आहे.

तोगडियांविरोधात एफआयआर
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भावनगर येथे मंगळवारी प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. जातीय दंगली होतील असे वातावरण निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. निवडणूक आयोगही तोगडियांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत तपासण्याचे संकेत दिले आहेत.

गिरिराज सिंग यांना बिहार, झारखंडमध्ये प्रचारास बंदी
भाजपचे नेते गिरिराज सिंग यांच्यावर झारखंड आणि बिहारमध्ये प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. जे नरेंद्र मोदी यांना मतदान करणार नाहीत त्यांच्यासाठी भारतात जागा नाही, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य गिरिराज सिंग यांनी केले होते.झारखंड आणि बिहारमध्ये प्रचार करण्यास बंदी घालण्याबरोबरच निवडणूक आयोग गिरिराज सिंग यांच्यावर कारणे-दाखवा नोटीसही बजावणार आहे. सदर दोन राज्यांमध्ये गिरिराज सिंग जाहीर सभा, सार्वजनिक मिरवणूक, मेळावे अथवा रोड-शोमध्ये सहभागी होणार नाहीत, याची जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असा आदेश आयोगाने दिला आहे. आपल्या आदेशांचे पालन होते आहे किंवा नाही या बाबतचा सविस्तर अहवाल गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेशही आयोगाने दोन्ही राज्यांच्या सरकारांना दिले आहेत. या बाबत नोंदविण्यात आलेल्या एफआयआरसदर्भात तातडीने तपास करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2014 2:03 am

Web Title: modi snubs togadia and giriraj for hate speeches
Next Stories
1 पतीवर आरोप झाल्याने प्रियंका व्यथित
2 पुण्यात फेरमतदानासाठी याचिका
3 नरेंद्र मोदी खोटारडे आणि दिवसाला ५०० कुर्ते बदलणारे- मुलायमसिंह यांची टीका
Just Now!
X