सलग दोन सभास्थळांना नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर पोहोचण्यात झालेल्या विलंबामागे केंद्र सरकारचे कारस्थान असल्याची शक्यता लक्षात घेत, भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची आयोगाने सखोल चौकशी करावी आणि नागरी उड्डाण मंत्रालयास मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी आवश्यक त्या परवानग्या वेळेवर देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी मंगळवारी हेलिकॉप्टरने दिल्लीहून उत्तर प्रदेशातील बरेली येथे येणार होते. मात्र तेथे जाण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या वेळेत न दिल्या गेल्यामुळे मोदींना सभास्थळी पोहोचण्यास सुमारे तीन तास विलंब झाला. नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आतुर असलेल्या हजारो नागरिकांना यामुळे कित्येक तास खोळंबून राहावे लागले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नरेंद्र मोदी यांनी आपले प्रचारसभेचे स्थान लक्षात घेता यामागे केंद्र सरकारचेच कारस्थान असावे असा आरोप केला होता, तसेच नागरिकांचा वेळ फुकट गेल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली.
भाजपनेही त्या शक्यतेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत ‘विलंब प्रकरणाची’ सखोल चौकशी करावी आणि यापुढे सर्व आवश्यक त्या परवानग्या वेळेवर देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली.