लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित व वर्णवर्चस्ववादाचा पगड असलेल्या राजकीय पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता ज्या पक्षांनी ओबीसींची जनगणना करण्यास नकार दिला, त्यांना मतपेटीतून चोख उत्तर द्या, असे आवाहन सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केले आहे. ओबीसींच्या सर्व समस्यांचे उत्तर हे त्यांच्या जनगणनेत आहे. परंतु वर्णवर्चस्ववादाचा पगडा असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना, भाजप या पक्षांनी आतापर्यंत अशी जनगणना होऊ दिली नाही. २०१० मध्ये संसदेत ओबीसींची जनगणना करण्याचा ठराव झाला, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्याला प्रस्थापित पक्षच जबाबदार आहेत. त्यामुळे आता आम्ही ओबीसींचे तारणहार आहोत, अशा भूलथापा देतील, त्याला बळी न पडता ओबीसींचे शत्रू कोण व मित्र कोण हे ओळखून मतदान करावे, असे उपरे यांनी म्हटले आहे.   ओबीसींची जनगणना झाली तर केंद्राच्या व राज्याच्या अर्थसंकल्पातील त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात आर्थिक हिस्सा मिळेल. त्याचबरोबर तेवढय़ा जागांवर राजकीय आरक्षण मिळेल. त्यामुळे ओबीसींच्या जनगणनेचा विषय ज्या पक्षाच्या अजेंडय़ावर असेल आणि त्याबद्दल तो पक्ष किती प्रामाणिक आहे, याचाही विचार करा असे आवाहन त्यांनी केले आहे.