लोकसभा निवडणुकीनंतर संख्याबळ काहीही असो, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. बहुमतासाठी रालोआला काही जागा कमी पडल्या आणि नवे मित्र घ्यावे लागले तर मोदींशिवाय दुसरा नेता निवडणार काय, असे विचारता राजनाथ सिंह यांनी हे स्पष्ट केले.
 देशाचा राज्यकारभार हा केवळ नियमानुसार नाही, तर नैतिक अधिष्ठान असलेल्या नेत्याकडून होत असतो. तोच उमेदवार पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदासाठी घोषित केला जातो. मोदी गोल टोपी घालत नाहीत यावरून अनावश्यक वाद निर्माण करण्यात येत आहे. हे आमच्या विरोधकांचे काम असून हा काही प्रचाराचा मुद्दा असू शकत नाही.
आपण धोतर आणि कुडता घालतो, तर मोदी कुडता आणि पायजमा घालतात. तुम्ही शर्ट आणि पँट घालतात हा काही मुद्दा असू शकत नाही. विरोधक अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित करून जातीयवाद भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी मुस्लिमांशी संवाद साधणार काय, असे विचारता चर्चा सुरूच असते. आता अनेक मुस्लीम मोदींना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला. काँग्रेसच्या राजवटीत प्रामुख्याने दंगली झाल्या, त्याची माफी त्यांनी मागितली आहे काय, असा सवाल राजनाथ यांनी केला. एक मुख्यमंत्री म्हणून दंगली रोखण्यासाठी जे काय उपाय करता येतील ते मोदींनी केले, असा दावाही त्यांनी केला.