06 July 2020

News Flash

दक्षिण मुंबई ; लढतीत ‘मनसे’ नाहीच!

दक्षिण मुंबई मतदारसंघ एके काळी अस्सल मराठमोळा परिसर होता. मात्र लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते निर्णायक ठरत होती.

| April 23, 2014 04:01 am

टक्कर तर होणारच..!
महाराष्ट्राच्या एक अष्टमांश मतदारसंघ असलेल्या मुंबईने २००९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला साफ नाकारले. राज ठाकरे यांच्या मनसेमुळे युतीचा धुव्वा उडाला आणि काँग्रेस आघाडीचा झेंडा घेऊन सहा खासदार संसदेत पोहोचले. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या या राजधानीत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. नंतरच्या महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युतीचा भगवा पालिकेवर फडकला, मनसेची वाटचालही मंदावली. २४ एप्रिलला पुन्हा मुंबईचे सहा लोकसभा मतदारसंघ आपले खासदार निवडणार आहेत. या निवडणुकीवर महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा पूर्ण पगडा असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षही रिंगणात उतरला आहे. गेल्या निवडणुकीत मनसेमुळे सेना-भाजप युतीला फटका बसला होता, तर या वेळी आपच्या उमेदवारांची सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला धास्ती वाटत आहे. या पाश्र्वभूमीवर, सहा मतदारसंघांत काटय़ाची टक्कर ठरलेली आहे. मुंबईकर मतदार मतदानासाठी सज्ज झाला आहे. काय करायचे हेदेखील त्याने ठरवून टाकले आहे. तरीही, गेल्या दीडदोन महिन्यांत ढवळून निघालेल्या राजकारणाचे सावट त्याच्या निर्णयावरही राहिलेलेच आहे. भाजप-सेना-रिपाइं महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच लढत होणार हे ठरलेले आहे. म्हणूनच ही लढत रंगतदारही ठरणार आहे. कारण या रणमैदानाचा रंग या वेळी काही वेगळाच आहे..

दक्षिण मुंबई मतदारसंघ एके काळी अस्सल मराठमोळा परिसर होता. मात्र लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते निर्णायक ठरत होती. कालौघात मराठी टक्का घटला. मात्र तरीही विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत मराठी टक्काच शिवसेना-भाजप उमेदवारांना विजयी करीत आहे. फेररचनेमध्ये हा मतदारसंघ थेट शिवडीपर्यंत जाऊन पोहोचला आणि गेल्या निवडणुकीत प्रचार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता दक्षिण मुंबई मतदारसंघावर काँग्रेसनेच वर्चस्व राखले आहे. काँग्रेसचे मुरली देवरा चार वेळा, तर मिलिंद देवरा दोन वेळा याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले. त्यामुळे हा देवरा कुटुंबाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा विजय हा एक अपवाद होता. लोकसभेच्या मागील निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेच्या चारी मुंडय़ा चीत झाल्या आणि मिलिंद देवरा यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
दक्षिण मुंबई मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी आणि वरळी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी कुलाबा, मुंबादेवी आणि भायखळ्यात काँग्रेस, मलबार हिलमध्ये भाजप, वरळीमध्ये राष्ट्रवादी, तर शिवडीमध्ये मनसेचा आमदार आहे. दक्षिण मुंबईतील चिराबाजार, गिरगाव, खेतवाडी, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, शिवडी या भागात शिवसेनेचा दबदबा आहे. काही ठिकाणी मनसेने शिवसेनेला खिंडार पाडले असले तरी, जुन्या शिवसैनिकांमुळे शिवसेनेचा जोर ओसरलेला नाही.
या मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले मिलिंद देवरा यांना काँग्रेसने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली. मनसेने शिवडीतील आमदार बाळा नांदगावकर यांना, तर ‘आप’ने मीरा संन्याल यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघातील गुजराती, राजस्थानी आणि मुस्लीम समाजाच्या पाठिंब्यावर देवरा परिवाराने लोकसभा गाठली. मात्र पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजराती आणि राजस्थानी मतदार आकर्षित झाले आहेत. त्यामुळे ही मते अरविंद सावंत यांच्या पारडय़ात पडण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय सेनेची हक्काची मतेही आहेतच. गेल्या वेळी मनसेच्या पारडय़ात मतदारांनी भरभरून मते टाकली होती. मात्र गेल्या निवडणुकीत गेलेली मते मोदींमुळे पुन्हा महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे.

* मोडकळीस आलेल्या चाळी, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याने भरलेल्या घरगल्ल्या, तुंबणारी गटारे अशा अनेक समस्यांनी येथील रहिवासी त्रस्त आहेत.
* या भागात पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहत आहेत. चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे आसपासच्या चाळींचा पाणीपुरवठा आटला असून मलनिस्सारण यंत्रणांवर ताण आला आहे.
ल्लया मतदारसंघाचा मुख्य प्रश्न म्हणजे विकास. सागरी हद्द नियंत्रण कायद्यामुळे या विभागातील शेकडो इमारतींचा विकास रखडला असून असंख्य रहिवाशांचे जीव टांगणीला लागला आहे. परंतु हा प्रश्न सोडविण्यात विद्यमान खासदार सपशेल अपयशी ठरल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. उलट नगरसेवकांच्या पातळीवरील कामांचा सपाटा लावून मतदारांना खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी वर्षभर चालवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2014 4:01 am

Web Title: south mumbai constituency mns not in fight
Next Stories
1 उत्तर मुंबई ; लढत चुरशीची..
2 ‘आप’कडून चमकोगिरी आणि मतांचे राजकारण- इल्मींच्या विधानाचा भाजपकडून समाचार
3 ‘मी कसा आहे ते माझ्या कामातून ठरवा’
Just Now!
X