मुंबईतील पाणीपुरवठा, कचरा, खड्डय़ांत गेलेले रस्ते आदी अनेक प्रश्न दीर्घकाळ रेंगाळले असताना पालिका अधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयाबाहेरील नामफलक काढल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करीत उपमहापौरांना पालिका सभागृह तहकूब करण्यास भाग पाडले. पक्ष कार्यालयाबाहेरील नामफलक काढणाऱ्या पालिका अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देत उपमहापौरांनी सभागृह तहकूब केले.
कुलाबा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील १४ वर्षे जुना नामफलक रविवारी काढून टाकणारे पालिका अधिकारी ए. सी. मोरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच ए विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु यापैकी एकानेही फोन घेतला नाही. कुलाब्यातील एकही होर्डिग अथवा नामफलकावर पालिका अधिकाऱ्यांनी रविवारी कारवाई केलेली नाही. केवळ राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पक्षाचे नाव असलेला फलक काढण्यात आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे. तसेच नगरसेवकांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभागृह तहकूब करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पालिका सभागृहात केली. मात्र या विषयावर सभागृहात चर्चा घडवावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी धरला होता. मात्र उपमहापौर मोहन मिठबावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देत सभागृह तहकूब केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना त्यांच्या दालनात घेराव घातला़ या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन सीताराम कुंटे यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2014 रोजी प्रकाशित
महापालिका सभागृह तहकूब
मुंबईतील पाणीपुरवठा, कचरा, खड्डय़ांत गेलेले रस्ते आदी अनेक प्रश्न दीर्घकाळ रेंगाळले असताना पालिका अधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयाबाहेरील नामफलक
First published on: 04-03-2014 at 01:58 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anger ncp leader adjourn municipal house