काँग्रेसमध्ये कोंडी होत असल्यामुळे, तसेच मुलाच्या पराभवामुळे अस्वस्थ झालेले काँग्रेस नेते व उद्योगमंत्री नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. तथापि, नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी स्पष्ट केले.  
काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे यांनीच आपण दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाल्याचे व त्यांना भेटणार होतो, असे सांगितल्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. राणे यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यासमवेत जेवणही घेतले. मात्र राणे यांची नाराजी दूर झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवामुळे अस्वस्थ झालेले राणे यांची त्यांच्याच कोकणामध्ये कोंडी करण्यात आली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडायचे झाल्यास भाजपमध्ये प्रवेश घेण्याशिवाय राणे यांच्यापुढे पर्याय नाही. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची त्यांनी भेट घेतल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. तथापि, राणे यांना पक्षात प्रवेश दिल्यास त्याचा भाजपला कोणताही फायदा होणार नाही. राणेंमुळे शिवसेनेबरोबर भांडण का ओढवून घ्यायचे, असा सवाल भाजपच्या नेत्यांपुढे निर्माण झाला होता. याबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता, राणेंच्या भाजप-प्रवेशाबाबत कोणताही प्रस्ताव नाही व असा प्रस्ताव आला तरी त्यांना भाजपमध्ये प्रवेश देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शिवसेनेने यापूर्वीच राणे यांना दरवाजा बंद केला होता. आता भाजपनेही राणे यांना प्रवेश देता येणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे राणे यापुढे काय करणार हा कळीचा प्रश्न आहे.