पश्चिम बंगालमधील शालेय अभ्यासक्रमात भारतातील क्रांतिकारक खुदीराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाकी यांचा उल्लेख ‘अतिरेकी आणि दहशतवादी’ असा करण्यात आला आहे. ही बाब शरमेची असून ममता बॅनर्जी यांनी या पाठय़पुस्तकांमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी जदयुचे आमदार नीरज कुमार यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका सविस्तर पत्राद्वारे कुमार यांनी ही विनंती केली बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये ‘क्रांतिकारी दहशतवादी’ नावाचा धडा आहे. लॉर्ड हार्डिग्ज याच्यावर बाँब फेकणारे क्रांतिकारक खुदीराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाकी यांचा उल्लेख या धडय़ात ‘अतिरेकी दहशतवादी’ असा केला आहे. हा भारतीय क्रातिकारकांचा आणि त्यांच्या देशभक्तीचा अवमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नीरज कुमार यांनी व्यक्त केली.