राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘अशोकपर्व’ नावाच्या पुरवणीसाठी पैसे देऊन म्हणजेच पेड न्यूज देऊन तो खर्च निवडणूक खर्चात न दाखवल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगापुढे त्यांची सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यांच्याबरोबर मधू कोडा यांनीही चुकीचा निवडणूक खर्च दाखवल्याच्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात चव्हाण यांच्यावर आरोप निश्चित केले असून निवडणूक आयोगाला चौकशीचे पूर्ण अधिकार आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले होते. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत व निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा व एस.एन.ए झैदी यांच्या पूर्णपीठापुढे अशोक चव्हाण व मधू कोडा यांची सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी तक्रारदार असलेले राज्याचे माजी मंत्री माधव किन्हाळकर व भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी व किरीट सोमैय्या यांना सर्व पुरावे प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात ४ जूनपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करण्यास सांगितले होते. आपण सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला सादर केली आहेत असे माधव किन्हाळकर यांनी सांगितले. त्यामुळे आता चव्हाण यांची सुनावणी होणार आहे. अशोक चव्हाण हे आताच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून निवडून आले आहेत. अशोक चव्हाण यांनाही त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावीत असे सांगण्यात आले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांचीही सोमवारी सुनावणी होणार आहे. अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाने दोषी ठरवले तर लोकप्रतिनिधी कायदा १९५१ कलम ७७ व ७८ अन्वये त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवले जाऊ शकते. ही अपात्रता आदेशापासून तीन वर्षांसाठी असेल.