‘राहुल गांधींना निर्दोष का सोडले?’
वाराणसी : अमेठीमधील एका मतदान केंद्रातील मतदान कक्षात प्रवेश करून काँग्रेस उमेदवार राहुल गांधी यांनी ‘मतदान गोपनीयते’च्या नियमाचे उल्लंघन केले आहे. मात्र त्याबाबत तक्रार करूनही निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना निर्दोष म्हणून का सोडले, असा सवाल विचारून ‘आम आदमी पक्षा’चे नेते कुमार विश्वास यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी यांना दोषी ठरविले, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास त्यांनी नकार दिला. हा न्याय आहे काय, असा सवाल विश्वास यांनी विचारला.

मंदिरांच्या शहराला छावणीचे स्वरूप
वाराणसी : भारतासह जगभरात ‘मंदिरांचे शहर’ असा नावलौकिक मिळविलेल्या वाराणसी शहराला सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छावणीचे स्वरूप आले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यातील लक्षवेधी लढतीसाठी वाराणसीत तब्बल ४५ हजार संरक्षण कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानेही येथे विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वाराणसीत उत्तर प्रदेश राज्य सरकार, सीमा सुरक्षा दल, शीघ्र कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल आदींच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. मतदारसंघातील १५६२ मतदान केंद्रांवर मुक्त वातावरणात मतदान व्हावे यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांच्या तुकडय़ा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
 
२५०० ‘नरेंद्र’, ३६०० ‘अरविंद’ आज मतदान करणार
वाराणसी : उभ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वाराणसी मतदारसंघात अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी तसेच काँग्रेसचे अजय राय यांच्यातील सामना रंगणार असतानाच तब्बल अडीच हजार ‘नरेंद्र’ आणि ३६०० ‘अरविंद’ सोमवारी मताधिकार बजावणार आहेत. मात्र काँग्रेस, बसप, माकप आणि समाजवादी पक्ष यांच्या उमेदवारांच्या नावांशी साधम्र्य दाखविणाऱ्या व्यक्तींच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या कमीच असल्याचे मतदार यादीच्या पृथक्करणातून स्पष्ट होत आहे. अजय राय याच नावचे १५ मतदार आहेत, तर केवळ अजय नाव असलेले तब्बल १६ हजार मतदार आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार कैलाशनाथ चौरासिया यांच्याशी नामसाधम्र्य सांगणारे ६६०० मतदार आहेत. बसपचे विजय प्रकाश जैसवाल यांचे ‘विजय’ हे नाव धारण करणारे १७ हजार मतदार आहेत. माकपच्या हिरालाल यादव यांचे संपूर्ण नामसाधम्र्य सांगणारे ३० मतदार आहेत.