लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अपक्ष सदस्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचे रावेरचे उमेदवार मनीष जैन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, तर मावळमधील उमेदवार लक्ष्मण जगताप हेसुद्धा राजीनामा देणार आहेत.
अपक्ष आमदारांना कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये सहभागी होता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी स्वीकारल्यास त्यांच्या आमदारकीवर गदा येऊ शकते. कारण अपक्ष आमदाराला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही.
कायद्यातील या तरतुदीमुळेच रावेरमध्ये राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेले विधान परिषदेतील जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले मनीष जैन यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा सादर केला. मावळमध्ये राष्ट्रवादीने अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. अद्याप त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही. विधान परिषदेची निवडणूक लक्षात घेता जगताप यांचा आमदारकीचा राजीनामा लांबवावा, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे.