वडोदऱ्यात जाहिरातींच्या मोक्याच्या जागा पटकाविण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला आणि त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
वडोदरा येथील काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन मिस्त्री यांनी मोदी यांचे पोस्टर्स फाडून टाकल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने ही तक्रार केली. निवडणुकीच्या जाहिरातींसाठी जागेचे वाटप करताना स्थानिक अधिकारी पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणुका मोकळ्या आणि मुक्त वातावरणात पार पडण्याच्या मार्गातील हाच मुख्य अडसर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
नरेंद्र मोदी आणि भाजपने १००० मोक्याच्या जागा जाहिरातींसाठी पटकाविल्या आहेत. ही बाब निवडणूक आयोगाच्या आदेशाशी विसंगत आहे. त्यामुळे सर्व पक्षांना जाहिरातींच्या जागेबाबत समान संधी मिळाली पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले.