नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केल्यापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उतावळ्या नवरदेवासारखे त्याचे वागणे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरूवारी शहापूर येथील प्रचार सभेत केली. पवारांनी शहापूर बरोबर डोंबिवलीतही सभा घेतली. मोदी फॅसिस्ट प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर विश्वास असलेल्या प्रत्येक विचारी माणसाने फॅसिस्ट प्रवृत्तीचा पराभव केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी डोंबिवली येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी आनंद परांजपे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
पंडित नेहरू ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत कोणीही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मते मागितली नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पंतप्रधानाची निवड केली जाते. याउलट निवडणुकीचा पत्ता नसताना गुडघ्याला बाशिंग बांधून नरेंद्र मोदी देशभर पंतप्रधान होण्यासाठी मते मागत आहेत. धनशक्तीच्या बळावर ते दररोज आपली भूमिका मांडून वृत्तवाहिन्यांवर झळकत आहेत. ज्यांना देशातील स्वातंत्र्य चळवळ कुठून सुरू झाली ते ठाऊक नाही, स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अभ्यास नाही; ते देशातील विविध प्रांत, महाराष्ट्र व मुंबईतील जनतेच्या हिताचा काय विचार करणार, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींचा समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना पवार यांनी, सेनेचे खासदार, पदाधिकारी राष्ट्रवादीच्या विचारधारेकडे का ओढले जात आहेत, याचा मूलभूत विचार शिवसेना नेतृत्वाने करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.
जिल्हा नेतृत्वावर टीका  
गद्दार म्हणून हिणवण्यापलीकडे शिवसेनेकडे प्रचारासाठी एकही विषय नाही, असे सांगत  आनंद परांजपे यांनी आमदार एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. २००९ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपणास शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाण्यापासून रोखण्यात आले. जाहीरपणे शिवसेनाप्रमुखांना दैवत मानायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासमोर माथा टेकण्यापासून रोखायचे, अशी खेळी आपल्याबाबत करण्यात आली.
गौप्यस्फोट करण्याची आव्हाडांची धमकी
आनंद परांजपे यांना गद्दार म्हणणाऱ्यांनी परांजपे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या दारात किती वेळा चकरा मारल्या, हा हिशेब आम्ही येत्या काळात जाहीर करणार आहोत, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांचे पत्ते उघड करण्याची धमकी दिली.