महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मागील निवडणुकीपूर्वी देशात मतदारसंघांची फेररचना झाली. त्यामुळे आता या दोन जिल्ह्य़ांमध्ये मिळून हा मतदारसंघ अस्ताव्यस्त पसरला आहे. येथील वाडय़ा-वस्त्यांवरील मतदारांपर्यंत पोचणं हे उमेदवारासाठी मोठं आव्हान असतं. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मागील निवडणुकीत ते यशस्वीपणे पेलत चिरंजीव नीलेश राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतरच्या गेल्या पाच वर्षांत अनेक रंगतदार राजकीय घडामोडी, प्रसंगी आघाडीतील साथीदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संघर्षांचेही प्रसंग घडले आणि आता त्या सर्व संदर्भासह राणे पिता-पुत्र नव्या आव्हानांना तोंड देत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मागील निवडणुकीपेक्षा यंदाची लढाई खूप वेगळी आहे. हे वेगळेपण केवळ भाजपा-सेना युतीचा उमेदवार बदलण्यापुरते मर्यादित नाही, तर इतरही अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. उच्चविद्याविभूषित सुरेश प्रभू यांच्याऐवजी पक्षाचे सचिव विनायक राऊत यांना सेनेने उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीच्या डावपेचांच्या दृष्टीने सेनेची संघटनात्मक पकड जास्त मजबूत झाली आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, मागील निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत प्रचारात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजच्या घडीला तरी अपेक्षित सहकार्य सोडाच, उघड विरोधाचा सामना राणेंना करावा लागत आहे. सावंतवाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष बाळ भिसे, माजी आमदार पुष्पसेन सावंत इत्यादी मंडळी त्यामध्ये आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघातील समाजवादी गटांनी राणेंना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला होता. या वेळी त्याबद्दल चक्कपश्चात्ताप व्यक्त करत सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे अॅड. दीपक नेवगी हे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आम आदमी पक्षातर्फे अभिजित हेगशेटय़े आणि बसपाचे राजेंद्र आयरे यांची उमेदवारी निवडणूक निकालावर थेट परिणाम करणारी नसली तरी काँग्रेसच्या दृष्टीने दखल घेण्याइतकी नक्की आहे. मागील निवडणुकीच्या वेळी तुलनेत या वेळी मतदारसंख्येत सुमारे ७७ हजारांनी वाढ झाली आहे. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विविध प्रकारच्या सुमारे वीस प्रकल्पग्रस्त संघटनांची स्थापन झालेली समन्वय समिती सत्ताधाऱ्यांसाठी आणखी एक डोकेदुखी ठरू शकते.
प्रचाराची सारी सूत्रे राणे एकहाती सांभाळत आहेत. पण या प्रदेशातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, दांडगा सर्वपक्षीय संपर्क आणि महत्त्वाचे म्हणजे, प्रतिपक्ष पोखरण्याचे कौशल्य त्यांच्याकडेच आहे. या वाटेवरील काटे दूर करणे ही त्यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची लढाई आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2014 रोजी प्रकाशित
राणेंसाठी प्रतिष्ठेची बनलेली लढाई
महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. मागील निवडणुकीपूर्वी देशात मतदारसंघांची फेररचना झाली
First published on: 06-04-2014 at 08:13 IST
TOPICSनारायण राणेNarayan Raneलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane sindhudurg constituency