देशाने याआधी श्वेतक्रांती पाहिली, हरित क्रांतीही पाहिली पण आता देशात सर्वच क्षेत्रात भगवी क्रांती येत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
आमच्या काही चुका झाल्या असतील तर आम्ही नतमस्तक होऊन माफी मागायला तयार आहोत, या भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला एक दिवसही उलटत नाही तोच मोदी यांनी भगव्या क्रांतीची भाषा वापरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
देशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते. मोदी म्हणाले की, देशात भाजपच्या बाजूने जनमताची लाट उसळताना मी पाहात आहे. आपले प्रश्न भाजपच सोडवेल, असा विश्वास लोकांना वाटत आहे. देशभर अवतरणारी ही भगवी क्रांती ऊर्जा क्षेत्रातही येईल आणि या देशातला अंधार दूर होईल.
काँग्रेसप्रणीत सरकारच्या ढिसाळ ऊर्जा धोरणामुळे देशाचा बहुसंख्य भाग अंधारात आहे. कोळशाची कृत्रिम टंचाईही निर्माण केली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच मुस्लिमांना भाजपला एकदा संधी देण्याचे आवाहन करतानाच गतचुकांबद्दल माफीचा सूर आळवला होता.