देशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुमधडाका १० मेला शांत होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी २५ राज्यांमध्ये ४३७ सार्वजनिक सभांना हजेरी लावली असून भारतीय निवडणुकीच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा प्रचार असल्याचा दावा भाजपने केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ सप्टेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान चार हजारहून अधिकवेळा ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून देश-विदेशातील १० लाखांपेक्षा अधिक लोकांशी चर्चा केल्याचेही भाजपने म्हटले आहे. सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणारा मोदींचा दिनक्रम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असतो.
लोकांचे मिळणारे भरपूर प्रेम आपला उत्साह वाढवत असल्याचे मोदी आपल्या प्रचारसभांमध्ये बोलून दाखवतात. त्यामुळेच यंदाचा मोदी यांचा प्रचार विक्रमी ठरेल असा दावा भारतीय जनता पक्ष करीत आहे.