राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे, तर भाजपच्या तक्रारीनंतर मनसेकडे विचारणा करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक प्रशिक्षणामुळे महाविद्यालय व विद्यापीठांच्या परीक्षांच्या कामावर परिणाम होत असल्याने प्राध्यापकांना रविवारी व सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दोनदा मतदानाचा दिलेला सल्ला पवार यांच्या अंगलट आला असून हे विधान गंमतीने केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आयोगाला दिले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना याबाबत विचारता आयोगाने अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. भाजपच्या तक्रारीनंतर मनसेकडे आयोगाने खुलासा विचारला आहे. पक्षप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर स्पष्टीकरण सादर करण्यात येईल, असे मनसेच्या प्रतिनिधींनी सांगितले असून त्यानंतर आयोग निर्णय घेईल, असे संपत यांनी स्पष्ट केले. राज्यातील गारपीटग्रस्तांना निवडणुकीच्या कामाचा कोणताही अडथळा न मानता तातडीने मदत द्यावी, मात्र शासकीय यंत्रणेकडून मदतीचे वाटप व्हावे, त्यात अन्य व्यक्तींचा सहभाग असू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे संपत यांनी सांगितले. निवडणूक काळात पैसे, दारू व अन्य आमिषे दाखविली जातात. पोलिस, निवडणूक यंत्रणा व प्राप्तीकर विभागाच्या यंत्रणेकडूनही त्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडीयातील मजकूर व जाहिरातीही निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊनच दिल्या जाव्यात, हिशोब ठेवून उमेदवाराने खर्च केला असल्यास तो त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.
*मतदानाच्या वेळेत दोन तासांनी वाढ
*मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी ६
*गारपीटग्रस्तांना शासकीय अधिकाऱ्यांकडूनच मदतवाटप
* नक्षलग्रस्त भागात विशेष काळजी व बंदोबस्त
*निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध अद्याप पक्षपाताची एकही तक्रार नाही