महाराष्ट्रातील एका धूर्त नेत्याचा एक किस्सा राजकीय मैफिलींमध्ये नेहमी सांगितला जातो. एकदा कुणीतरी या नेत्याला एकदा सहज प्रश्न केला, ‘दोन अधिक दोन किती?’..
यावर उत्तर देण्याआधी हा धूर्त नेता क्षणभर गप्प राहिला, आणि पुढच्या क्षणी त्यानेच उलटा प्रश्न केला, ‘द्यायचे की घ्यायचे?’..
निवडणुका आल्या, की राजकीय गणिताची सूत्रे कशी बदलतात, त्याचे हे उदाहरण.. म्हणजे, एका राजकीय पक्षाची ‘बेरीज’, ती दुसऱ्या पक्षाची ‘वजाबाकी’ होते.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता बेरीज वजाबाकीच्या या गणितांची रंगतदार सुरुवात झाली आहे.
मतदारांच्या भाषेत, या गणिताला ‘आयाराम गयारामांचा खेळ’ म्हणतात. राजधानी दिल्लीपासून एखाद्या लहानशा मतदारसंघापर्यंत सर्वत्र या खेळाची आता सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे ‘गयाराम’ नेते खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये ‘आयाराम’ झाले.. शिवसेनेची ‘वजाबाकी’ झाली, काँग्रेसची ‘बेरीज’ झाली. परवा सांगलीचे संजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आर. आर. आबा यांच्या राजकारणाला कंटाळून पक्ष सोडला आणि भाजपचा तंबू गाठला. ही भाजप राष्ट्रवादीमधील वजाबाकी आणि बेरीज.
बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजद आमदारांनी नितीश कुमारांचा तंबू गाठला, तर राजदचे आमदार नवलकिशोर यादव यांनी भाजपला जवळ केले. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज आणि गांधी घराण्याचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे जगदंबिका पाल यांना आपल्या तंबूत आणून भाजपने काँग्रेसला दणका दिला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांची नातेवाईक असलेल्या माजी खासदार करुणा शुक्ला यांनाच थेट आपल्या गोटात ओढले. करुणा शुक्ला यांनी गेल्या वर्षीच भाजपला रामराम केला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल होऊन त्यांनी भाजपमधील अपमानाच्या अनुभवाचे उट्टे काढले.
म्हणूनच, राजकारणाच्या या गणितांचे उत्तर, वरवर वाटते तितके सरळ नसते. म्हणूनच, ‘दोन अधिक दोन किती’ या प्रश्नाचे उत्तर कधी ‘तीन’ इतके येते, तर कधी ‘पाच’ इतकेही होते. परिस्थितीनुरूप ते चूक किंवा बरोबरही असते.
अशा गणितांची चर्चा तर होणारच!
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2014 रोजी प्रकाशित
आयाराम, गयाराम आणि रामराम!..
महाराष्ट्रातील एका धूर्त नेत्याचा एक किस्सा राजकीय मैफिलींमध्ये नेहमी सांगितला जातो. एकदा कुणीतरी या नेत्याला एकदा सहज प्रश्न केला, ‘दोन अधिक दोन किती?’.. यावर उत्तर देण्याआधी हा धूर्त नेता क्षणभर गप्प राहिला,

First published on: 28-02-2014 at 01:28 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politcs of aaya ram gaya ram and ram ram again