लोकसभा निवडणुकीचे आव्हान, दौरा-धावपळ या साऱ्यांमध्येही वाचनसंस्कृती जोपासण्याचा अट्टहास. बरोबरच्या सहकाऱ्यांपासून ते पोलीस शिपायांपर्यंत साऱ्यांची काळजी घेण्याची वृत्ती आणि तरुणाईवर असलेला करिष्मा या साऱ्याचे दर्शन राज यांच्या दौऱ्यात सहज दिसून आले.
शिवाजी पार्क येथील ‘कृष्णभुवन’च्या बाहेर सुरक्षारक्षक, सहकारी जय्यत तयारीत उभे होते. साहेब नवी मुंबईतील सभेसाठी निघणार होते. तळमजल्यावरील हॉलमध्ये पुण्याहून आलेले तीन तरुण हॉलमधील पुस्तकांच्या कपाटातील पुस्तक न्याहाळताना भराभर मोबाइलमधील कॅमेरातून हॉलचे.. राज बसतात त्या सोफ्याचे फोटो घेत होते. थोडय़ाच वेळात राज यांनी तळमल्यावरील हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्या तरुणांच्या चेहऱ्यावर साक्षात देव भेटल्याचा आनंद दाटून आला.. त्यातील एक डॉक्टर, तर दोन अभियंते होते. त्यांनी एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले होते. राज यांना भेटण्याची, त्याच्याबरोबर छायाचित्र काढण्याची त्यांची इच्छा होती. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांची माहिती घेऊ न राज यांनी त्यांना छायाचित्र काढू दिले तेव्हा कृतकृत्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले..
कृष्णभुवनच्याबाहेर या तीन चाहत्यांसह अनेक जण राज यांना पाहण्यासाठी वाट पाहात उभे होते. थोडय़ाच वेळात नवी मुंबई व तेथून नाशिकच्या दौऱ्यासाठी राज निघाले. चाहत्यांना हात करत गाडीत बसण्यापूर्वी त्यांच्या मागोमाग आलेल्या बंटी-बबली या रस्त्यावरच्या पाळीव कुत्र्यांची काळजी घेण्यास त्यांनी एकाला सांगितले. अरे, बंटी-बबलीला गेटच्या आत न्या, असे सांगून ते गाडीत बसले आणि पुन्हा दरवाजा उघडत, घरातील टेबलावर ठेवलेली पुस्तके आणण्यास एकाला सांगितले. दुसऱ्या क्षणी त्यांना हवी असलेली पुस्तके आणून देण्यात आली.. सर्व जण बसले का, पाण्याच्या बाटल्या आहेत ना, अशी चौकशी करून निघण्याचे आदेश जारी झाले. मर्सिडिज गाडीच्या पुढे पोलिसांची एस्कॉर्टची गाडी, त्यापाठोपाठ सहा-सात गाडय़ांचा ताफा, त्यामध्येच लँडक्रुझरचाही समावेश.. गाडय़ा नवी मुंबईच्या दिशेने निघाल्या.. थोडा वेळ मोबाइलवर आलेले मेसेज वाचले आणि माझ्याकडे पाहात, प्रवासात मी पुस्तक वाचण्याचे काम करतो, असे सांगत ‘निवडक नरहर कुरुंदकर’ हे पुस्तक तल्लीनतेने वाचू लागले. थोडय़ाच वेळात त्यातील सॉकट्रिससंदर्भात कुरुंदकरांनी केलेले भाष्य वाचून दाखवले आणि काय माणूस आहे, असे सांगत कुरुंदकरांची माहिती सहज सांगून गेले. दुसरे पुस्तकही अर्थातच कुरुंदकरांचेच होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य.’ वाचता-वाचता मध्येच कुठे आलो रे.. असा प्रश्न गाडीचे सारथ्य करत असलेल्या सुरेशला केला. उत्तर आले, ऐरोली.. सभेचे ठिकाण जवळ येत होते. पाठीमागच्या गाडीतून फोन आला, साहेब, उमेदवाराचे भाषण सुरू आहे, हॉटेलमध्ये थांबायचे का, सभास्थानाजवळील एका चांगल्या हॉटेलकडे गाडय़ांचा ताफा वळला. हॉटेलमध्ये स्वागत करण्यासाठी व्यवस्थापकापासून सारेच तयारीत होते. तेथेही फोटो काढण्याचा आग्रह झाला.. फोटो काढण्यात आले.. थोडा वेळ तेथे थांबून राज निघाले तेव्हा लॉबीमध्ये एकच गर्दी झाली होती.. एका परदेशी पर्यटकाने राज यांच्यासमवेत फोटो काढण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि त्याचीही इच्छा पूर्ण करून राज मर्सिडिजमध्ये बसले तेव्हा उभ्या असलेल्या तरुण पोलिसांमधील एक जण सहज बोलून गेला, राजसाहेबांमध्ये दम आहे.. घणसोलीच्या सभास्थानी गाडय़ाचा ताफा आला तेव्हा झिंदाबादच्या घोषणा आणि फटाक्यांची एकच आतषबाजी झाली.. राज यांनी गणेश नाईकांच्या घराणेशाहीवर तोफा डागताच, उपस्थितांनी एकच जल्लोष केला.. भाषण संपले.. कार्यकर्त्यांना नमस्कार करत राज गाडीत बसले.. गाडय़ांचा ताफा धुरळा उडवीत जाऊ लागला तसे शेकडो कार्यकर्ते गाडीमधून हात दाखविणाऱ्या राज यांची छायाचित्रे घेत ताफ्यामागे धावू लागले.. पोलिसांची एकच तारांबळ उडाली.. गाडय़ांचा ताफा आता इगतपुरीच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत एका छोटय़ा हॉटेलपाशी गाडय़ा वळल्या.. तेथील एका दुकानात जाऊन राज यांनी बरोबरच्यांसाठी खाण्याच्या वस्तू घेण्यास सुरुवात केली.. सहकाऱ्यांना तसेच बॉडीगार्डना बोलावून हवे असलेल्या खाण्याच्या वस्तू घेण्यास सांगितले. थोडय़ा दूर उभ्या असलेल्या एस्कॉर्टच्या गाडीतील पोलिसांकडे त्यांचे लक्ष गेले आणि मनोज, ही खाण्याची पाकिटे त्या पोलिसांच्या गाडीत ठेव, असे आदेश त्यांनी दिले.. साहेब, सगळ्यांचीच काळजी घेतात, असे त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहणाऱ्या पप्याने सहज सांगितले, तेव्हा बाळासाहेबही अशीच काळजी सर्व सहकाऱ्यांची घ्यायचे, असे मनोज हाटे सहज सांगून गेला.. प्रत्येकच दौऱ्यात राजसाहेब सर्वाचीच काळजी घेतात.. एक पोलीसही उत्साहाने बोलून गेला.. गाडय़ा इगतपुरी येथील हॉटेल मानसमध्ये शिरल्या तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते. सर्वाना रूम आहेत ना, जेवण करून घ्यायला सांग, तुम्हीही सर्व जण जेवून घ्या.. असे सांगत राज आपल्या खोलीत गेले. तेव्हा पप्याचे म्हणणे प्रत्यक्षातच अनुभवायला मिळाले. थोडय़ाच वेळात त्यांच्या सहकाऱ्याने दरवाजा ठोठावून साहेबांनी बोलावल्याचे सांगितले.. काय जेवणार, असा प्रश्न करून बसायला सांगितले.. पाहता पाहता गप्पाचा फड रंगला. नरहर कुरुंदकर, आचार्य अत्रे, माडगुळकर यांच्यापासून मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यावर भरभरून बोलले, त्यांच्या लेखनवैशिष्टय़ांचे अनेक दाखलेही राज यांनी दिले.. भरपूर वाचले पाहिजे, जग फिरून पाहिले पाहिजे.. असे सांगत ग. दि. मागडगुळकरांचे एक गीत राज यांनी सहज गाऊन दाखवले.. अक्षराची अशी लेणी ही आतून यावी लागतात, असे म्हणत, तुला मी काही पुस्तके देतो ती तू वाच, असे आग्रहाने सांगितले. वेळेला आणि विषयाला बंधन नव्हते.. वेगवेगळ्या फुलांच्या वैशिष्टय़ापासून खाण्याच्या अनेक जिनसापर्यंत विविध विषयांच्या माहितीचा खजिना राज यांनी उलगडून दाखवला. मला गाडी राजकारणाकडे वळवायची होती.. बाळासाहेब आणि श्रीकांतजींचा विषय निघाला तेव्हा त्यांच्या आठवणींचे अनेक खण राज यांनी उघडले.. बाळासाहेबांसमवेत लहानपणापासून पाहिलेली मोठी माणसे, त्यांची भाषणे.. श्रीकांतजींची (वडील) स्वाभिमानी वृत्ती.. त्यांनी केलेले कष्ट.. पाहता पाहता पाहाटेचे चार वाजले.. समाजकारणापासून ‘राज’कीय तत्त्वज्ञानापर्यंत, विषयांना मर्यादा नव्हत्या.. समाजाकडे, राजकारणाकडे, जागतिक घडामोडींक डे किती डोळस व सजगतेने हा माणूस लक्ष ठेवून आहे, ते सहज दिसून आले. एवढय़ात चला आता झोपा.. असे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला. सकाळी नऊच्या सुमारास नाशिकहून मनसेचे आमदार गीते आणि लोकसभेचे उमेदवार पवार आले होते. त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा करून मानसहून गाडय़ांचा ताफा त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी निघाला.. वाटेत तीन गावांजवळ राज यांचा पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी सत्कार केला. जागोजागी घोषणा सुरूच होत्या.. तरुणाईला राज यांचे असलेले कुतूहल दिसत होते.. मोबाइलवर फोटो काढण्याला खंड पडत नव्हता. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज आले तेव्हा तेथील पुजाऱ्यांपासून अनेकांनी राज यांच्यासमवेत छायाचित्रे काढून घेतली.. पुन्हा दुपारी तीनच्या सुमारास मानसवर पोहोचले तेव्हा सर्वाना जेवण करून घेण्यास सांगून राज यांनीही थोडेसे जेवण घेतले..भात खाल्ला तर झोप लागते असे सांगत भात खाण्याचे टाळले.. सायंकाळी सातच्या सुमारास घोटीच्या सभेसाठी गाडय़ांचा ताफा निघाला तेव्हाही हॉटेलमधील अनेकांनी त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेतली.. घोटीच्या सभास्थानी राज भाषणासाठी उभे राहिले.. लोकांचा एकच जल्लोष, प्रचंड उत्साह, भुजबळ-पवारांवर केलेल्या टीकेला लोकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद.. लोकसभा निवडणूक गंभीरपणे घ्या, हे आवाहन करताना प्रत्येक सभेत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य असल्यानेच त्यांना पाठिंबा दिल्याचे राज आवर्जून सांगत होते.. घोटीचे भाषण संपवून गाडय़ा नाशिकला सिडकोच्या दिशेने जाऊ लागल्या.. तेथेही प्रचंड गर्दी.. तरुणाईचा एकच जल्लोष.. येत्या १९ तारखेला भुजबळांना टराटरा फाडून काढतो, असे सांगताच ‘राज ठाकरे झिंदाबाद’च्या एकच घोषणा निनादतात.. राज ठाकरे आणि गर्दी हे समीकरण प्रत्येक सभेत दिसत होते.. गाडीत बसणाऱ्या राज यांना पाहण्यासाठी, त्यांचा फोटो काढण्यासाठी तरुणांमध्ये एकच धक्काबुक्की.. पोलिसांची तारांबळ.. यातच सर्वाना नमस्कार करत राज गाडीत बसतात आणि गाडय़ांचा ताफा पुन्हा मुंबईला रवाना होतो..