भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहील, अशी अंदाजवाणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्याने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली आहे. मित्र पक्षाचाच एक नेता अशी विधाने करीत असल्याने मतांवर परिणाम होण्याची भीती काँग्रेसच्या गोटात व्यक्त केली जाऊ लागली आहे.
आजच्या घडीला भाजपचे सर्वाधिक तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहण्याबाबतचा अंदाज पवार यांनी ‘लोकसत्ता’ दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला होता. या विधानाचा पुनरुच्चार रायगड मतदारसंघात सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यावर अलिबागमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतही केला. भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येण्याची शक्यता असली तरी सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही, असे मतही त्यांनी मांडले. पवार यांच्या खास शैलीतील या विधानाने राजकीय जाणकारही  बुचकळ्यात पडले आहेत.
भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केल्याने पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या यशालाच दुजोरा दिल्याचे मानले जाते. काँग्रेसचे नेते आधीच पराभूत मानसिकतेतून जात आहेत. पी. चिदम्बरम, मनीष तिवारी, वासन यांच्यासारख्या नेत्यांनी पराभवाच्या भीतीने लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. मोदी यांच्या प्रभावापुढे आपला टिकाव लागेल की नाही, याबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. काँग्रेसचे अनेक नेते खासगीत आमचे काही खरे नाही, हे मान्य करतात.
काँग्रेससमोर आधीच विविध आव्हाने आहेत. अशा वेळी पवार यांनीच काँग्रेस दुसऱ्या क्रमाकांवर राहिल, असा अंदाज व्यक्त केल्याने काँग्रेसच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नाही तरी पराभूत होणार आहे तर या पक्षाला मते कशाला द्यायची, असा सर्वसामान्यांमध्ये मतप्रवाह निर्माण होऊ शकतो. मात्र पवारांच्या या अंदाजवाणीने राष्ट्रवादीचे काहीच नुकसान होणार नाही.