देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यावेत यासाठी शिवसेना सर्व शक्ती पणाला लावून युतीधर्माचे पालन करत असताना राज ठाकरे आणि शरद पवार यांचे गोडवे गाणारे भाजप नेते नितीन गडकरी यांना धडा शिकविण्याची गरज असल्याचा सूर शिवसेनेत आळवला जात आहे. प्रदेश भाजपाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतरही, ‘बिनभांडवली धंदा करणारा व्यापारी’ म्हणून गडकरी यांची संभावना शिवसेनेने केली आहे.
महायुतीसंदर्भातील निर्णयांबाबत केवळ गोपीनाथ मुंडे यांच्याशीच चर्चा होईल, असे स्पष्ट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या नावावर फुली मारली आहे. महायुतीत मनसेने यावे ही भूमिका कधीच मागे पडली असून मनसेला दारे बंद असल्याचे यापूर्वीच सेना-भाजप नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र राष्ट्रीय नेते असलेल्या गडकरी यांनी नाशिक येथे गोदापार्क या राज यांच्या स्वप्नातील प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थित राहून महयुतीला एक धक्का दिला. हे कमी ठरावे म्हणून मुंबईत राज यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणूक महायुतीसाठी न लढविण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांना अनावश्यक महत्त्व देत महायुतीला अपशकुन करणाऱ्या गडकरी यांना धडा शिकविला पाहिजे, अशी भूमिका सेनेच्या काही नेत्यांनी खाजगीत मांडली. शिवसेनेच्या मुखपत्रातून गडकरी यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली असून त्यांची तागडी, माल आणि गल्ला सांभाळणारा व्यापारी म्हणून संभावना करण्यात आली आहे. नागपूरमध्ये लोकसभा निवडणूक लढवताना काही अघटित घडण्याची भीती गडकरी यांना वाटत असल्याकडे लक्ष वेधून सूचक इशारा सेनेने दिला आहे. आतापर्ययतच्या राजकारणात एवढा मस्त व स्वस्त सौदा झाला नसेल व त्याबद्दल गडकरी यांच्या व्यापार कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असा शालजोडीतील टोलाही मुखपत्रातून हाणण्यात आला आहे. शिवसेनेच्या एवढय़ा जोरदार हल्ल्यानंतर भाजपतून गडकरी समर्थनाची एकही प्रतिक्रिया आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
शिवसेनेची गडकरींवर वक्रदृष्टी!
देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यावेत यासाठी शिवसेना सर्व शक्ती पणाला लावून युतीधर्माचे पालन करत असताना राज ठाकरे आणि शरद पवार यांचे गोडवे गाणारे भाजप नेते नितीन गडकरी यांना धडा

First published on: 06-03-2014 at 04:53 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena disappointed to nitin gadkari