भाजपमधील अंतर्गत कलह आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची राजभेट यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबई व ठाण्यातील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसेला अंगावर घेण्याची रणनीती शिवसेनेने निश्चित केली आहे. मनसेने मुंबई व ठाण्यात शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार उभे केल्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेकडे भाजपची मते वळून शिवसेना उमेदवाराला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी नवी मुंबईत थेट राज यांनाच लक्ष्य केले आहे.
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांमुळे सेना-भाजपचा मुंबई-ठाण्यातील सर्व जागांवर पराभव झाला होता. त्यामुळे सुरुवातीला मतविभाजन टाळण्यासाठी उद्धव यांनी टाळीसाठी हात पुढे केला तर भाजपचे नेते शेवटपर्यंत राज यांनी महायुतीत यावे यासाठी प्रयत्न करत होते. महायुतीत मनसे येण्याची शक्यता मावळल्यानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज यांनी ‘गुप्त’ भेट घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा सल्लाही दिला. याचाच फायदा घेत राज यांनी मनसेच्या आठव्या वर्धापनदिनी नरेंद्र मोदी यांना माझे खासदार पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील, असे सांगून चलाख खेळी केली. यामुळे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये कटुता निर्माण झाली. त्यानंतर राज यांनी मुंबई व ठाण्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मनसेचे उमेदवार जाहीर केल्यामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांना वारंवार आम्ही सर्व शक्तिनिशी महायुती म्हणून लढत असल्याचे वारंवार जाहीर करण्याची वेळ आली. मात्र केवळ भाजपवर विसंबून न राहता मनसेच्या विरोधात तलवार उपसण्याचा निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाने घेतला असून नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट ‘राज हे मोदी के नाम पे दे दे बाबा’ म्हणत मत मागणार असले तरी हे राष्ट्रवादीच्या मदतीसाठीचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. स्वत:चा चेहरा दाखवून काही मिळत नाही, म्हणूनच मोदींचा मुखवटा घेऊन मते मागण्याचा उद्योग मनसेकडून केला जाणार असल्याचे सांगत राज यांच्यावर उद्धव यांनी टिकास्त्र सोडले आहे.
‘गद्दार, कलंकित चेहरा तसेच राष्ट्रवादीच्या मदतीचे षड्यंत्र’ असा उल्लेख करत मनसे व राज यांच्यावरोधात शिवसेना आक्रमक प्रचार करेल हे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनला अद्यापही मनसेची भीती असल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार मनसेकडे उमेदवार नाहीत आणि त्यांना मतेही मिळणार नसल्यामुळेच मोदींच्या पाठिंब्याचा मुद्दा राज यांनी काढला असला तरी आता जनता फसणार नाही.