देशात सर्वत्र पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या नावावरून गदारोळ उडालेला असताना असे काही सुरू आहे. हे  ‘ती’ च्या गावीही नाही. इतकेच काय पण ती राहात असलेल्या लोकसभा मतदारसंघातून माणिकराव गावित हे नऊवेळा निवडून गेले आहेत. त्या गावितांविषयी ‘ती’ पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
ही स्थिती आहे महाराष्ट्रातील मतदार क्रमांक एक असलेल्या सुमित्रा वांगऱ्या वसावे यांची. मणिबेली या गावचा इतिहास सर्वाना परिचीत. सातपुडय़ाच्या दऱ्याखोऱ्यात गुजरातच्या सिमेलगत असलेले व सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित जालेले हे गाव. या गावातच सुमित्रा राहाते. नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेलीची मूळची रहिवासी. परंतु अककलकुवा तालुक्यातील धनखेडी गावात राहणारी सुिमत्रा महाराष्ट्रातील मतदारांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सुमित्राचा विवाह विक्रम वसावे यांच्याशी झाला आहे. मणिबेलीतील जीवनशाळा हे सुमित्राचे मतदान केंद्र.आघाडीचे शासन असलेल्या महाराष्ट्रातील मतदार क्रमांक एकच्या घरी जाण्याचा मार्ग मात्र नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून सोईस्कर ठरतो. अक्कलकुवा, सागबारा, डेडियापाडा, राजपिंपला, केवडिया कॉलनी असा सुमारे २०० किलोमीटरचा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवास केल्यानंतर सरदार सरोवरातून बोटीने मणिबेली ग्रुपग्रामपंचायतीतील या पहिल्या मतदाराला भेटता येते. या क्रमांक एकच्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी जसा खडतर प्रवास करावा लागतो. तसेच जीवनही खडतर जगावे लागते. सरदार सरोवराच्या किनारी राहणाऱ्या हजारो आदिवासींना गुजरातने विस्थापीत केले. आणि महाराष्ट्राने दुर्लक्षित, असे वाटते. सुमित्राची व्यथाही काहीशी तशी. सुमित्राने आतापर्यंत पाच वेळा विविध निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. परंतु पाचही वेळा कोणाला मतदान केले, याची बिल्कूलही माहिती सुमित्राला नाही.  या भागात वीज नसल्यामुळे टीव्हीचा प्रश्नच नाही. फक्त आदिवासी बोली जाणणाऱ्या सुमित्रा यांना रेडिओवरील हिंदी व इंग्रजीतील बातम्या समजणे अशक्य. शासनाच्या विकासाचा गवगवा महाराष्ट्रातील मतदार क्रमांक एक असलेल्या सुमित्रामुळे कसा पोकळ आहे हे लक्षात येईल.
सुमित्राच्या अपेक्षा फार काही नाहीत. पटकन प्रवास करून जवळचे मोलगी गाव गाठता येईल असे रस्ते व्हावेत, अशी तीची अपेक्षा आहे.